Monday, November 28, 2011

अभ्यास, मनन, चिंतन त्रिसुत्री महत्वाची

दहिवडी सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या व उच्च माध्यमिक शिक्षण मंचर येथे पूर्ण करुन पुण्यातील बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. सचिन ओंबासे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये २२८ वा नंबर पटकाविला आहे.या परीक्षांबाबत त्यांच्याशी महान्यूजने केलेली ही बातचित 

प्रश्न- एक डॉक्टर आहात तरी देखिल आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय का घेतला? 
उत्तर : माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन असे वाटले की, मी जे डॉक्टर म्हणून काम करतो आहे त्याचा अंतीम प्रभाव खूप आहे. पण तेवढेच काम जर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून केले तर त्याचा इम्पॅक्ट समाजातील मोठय़ा घटकावर पडेल आणि आपले जे निर्णय आहेत, ज्या शासकीय योजना आपण राबविणार आहोत त्याचे इम्प्लिमेंटेशन खूप योग्य त-हेने करुन समाजासाठी जास्तीतजास्त उपयोग होईल. आधीपासून समाजाची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून मी या सेवेकडे वळलो.

प्रश्न- पूर्व परीक्षेला नेमका कसा अभ्यास केला? 
उत्तर : सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे पूर्णपणे विश्लेषण झाले पाहिजे. पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय हे वेगवेगळे घटक असतात. माझा वैकल्पिक विषय भूगोल होता. त्यात स्पेसिफिक अशी ट्रेंड असतात. ती लक्षात आली पाहिजे. या परीक्षेत पास होण्यासाठी काही महत्वाची पुस्तकेही असतात. ठराविक पुस्तकांचे सतत वाचन केल्यामुळे त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये ते खूप डीटेलमध्ये प्रश्न विचारतात. प्रश्नांचा एकंदरीत अंदाज मला आला की, कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि त्यामुळे मी पूर्व परीक्षेत यशस्वी होऊ शकलो. 

प्रश्न-मुख्य परीक्षेचा नेमका अभ्यास कसा केलात? 
उत्तर : काही क्लासेसकडून मार्गदर्शन घेऊन मी विषय निवडला. काही महत्वाच्या सात-आठ पुस्तकांचा मी व्यवस्थित अभ्यास करुन ठेवला. तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचाही अभ्यास केला. सविस्तर वाचनावर भ्‍र दिला. अभ्यास, मनन, चिंतन या तीन सूत्रानी अभ्यास होतो. अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा असा मार्गदर्शक लागतो. आपण वाचलेले मनन करणे गरजेचे आहे आणि सर्वात शेवटी चिंतन महत्त्वाचे आहे.

प्रश्न:- या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात काही गैरसमज असतात, की आपल्याला आता दिल्लीला जावे लागेल. यासंदर्भात आपला अनुभव काय आहे?
उत्तर:- दिल्लीला जाणे फायदेशीर नाही, असे माझे ठाम मत आहे. दिल्लीत क्लास करणार्‍यांची उत्तरे लिहिण्याची एक विशिष्ट पध्दत होऊन जाते. उत्तर तपासताना कळते, की हे अमुक क्लासचे उत्तर आहे. पण युपीएसला हे चालत नाही. तुमची स्वत:ची ओरीजनॉलिटी हवी. इंटिग्रिटी, तुमचे विचार हवेत. त्यामुळे आपण दिल्लीपासून लांब राहतो तेव्हा आपण स्वत:चा वेगळा विकास करतो. त्यामुळेच दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्राचा टक्का वाढत चालला आहे.

प्रश्न- ग्रामीण भागातील मुलांना काय मार्गदर्शन कराल? 
उत्तर : जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आणि मुख्य म्हणजे आपण ग्रामीण भागातून मातृभाषेतून शिक्षण घेत आहोत हा मनातील न्युनगंड ग्रामीण भागातील मुलांनी मनातून काढून टाकावा. मग यश आपलेच आहे. फक्त आपली अभ्यास आणि परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. 

No comments:

Post a Comment