Thursday, November 17, 2011

नारळ संशोधन केंद्र भाग १

रत्नागिरी शहराजवळच्या भाट्ये गावातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा प्रथम पुरस्कार मिळाला. कोकणातील शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून नारळाच्या नवनवीन जाती विकसित करण्याच्या केंद्राच्या कार्याला ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता आहे.




भारतात पामवर्गीय महत्त्वाची चार पिके असून त्यात नारळ, तेलताड, पालमेरा (तोडगोळे) आणि सुल्पी (सुरमाड) आदींचा समावेश आहे. या पिकांवर देशातील २२ केंद्रात संशोधन सुरू आहे. यापैकी सर्वाधिक १३ केंद्रांवर नारळावर संशोधन सुरू आहे. या सर्व केंद्रांची द्वैवार्षिक सभा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. त्यामध्ये दोन वर्षात झालेल्या संशोधनावर आधारित शिफारस करण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येते. या वर्षात कासारकोड (केरळ) येथील 'केंद्रीय रोपण पिके संशोधन केंद्र' येथे घेण्यात आली. सभेत उत्कृष्ट काम करणाऱ्या संशोधन केंद्राची निवड करून त्यांना 'कै.अमित सिंग मेमोरीअल फाऊंडेशन पुरस्कार' देण्याचे निश्चित करण्यात आले. या पुरस्काराचा मान प्रथमच रत्नागिरी येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठांतर्गत स्थापण्यात आलेल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मिळाला.



या प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना १ जुलै १९५५ रोजी झाली. डॉ.व्ही.पी. लिमये यांच्यासारखे संस्थापक आणि त्यानंतरच्या अनेक संशोधकांनी हे केंद्र विकसित करण्यात परिश्रम घेतले. केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सदस्य राजाभाऊ लिमये यांचेही मार्गदर्शन केंद्राच्या विकासात महत्वाचे आहे. कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्राचे संशोधन संचालक आणि केंद्रप्रमुख यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नातून गेल्या ५५ वर्षात केंद्राने लक्षवेधक प्रगती केली आणि त्याचा लाभ स्वाभाविकपणे कोकणातील शेतकऱ्यांना झाला.



भाट्ये गावाच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या केंद्राच्या परिसरात सर्वसाधारणपणे वार्षिक ३००० सेंटीमीटर पाऊस पडतो. वालुकामय पोयटा जमीन आणि आवश्यक असणारे तापमान असे अनुकूल वातावरण परिसरात उपलब्ध असल्याने संशोधनाला चांगली चालना मिळते. इथल्या २५.८४ हेक्टर जमिनीवर संशोधन केंद्र उभारले असून २२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. केंद्राची स्थापना भारतीय मध्यवर्ती नारळ समितीतर्फे करण्यात आली होती. १९६९ मध्ये ते राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे आणि कोकण कृषि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर १९७२ मध्ये या विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. केंद्राची ७५ टक्के आर्थिक जबाबदारी अखिल भारतीय तेलताड प्रकल्प आणि २५ टक्के महाराष्ट्र शासन उचलते.



संशोधन केंद्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि संकरित वाणांचा संग्रह करून त्यांचा अभ्यास केला जातो. नारळ लागवडीची आदर्श पद्धती आणि त्यातील मिश्रपिकांबाबत अध्ययनावर केंद्रात भर दिला जातो. किड रोगावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून उपाय सुचविण्यात येतात. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात मसाला पिकांची लागवड करून त्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मसाला पिकांची कलमे तयार करून ती शेतकऱ्यांना केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येतात.केंद्रामार्फत नारळ आणि मसाल्याच्या कलमांची अत्यल्प दरात विक्री करण्यात येते. त्यामुळे केंद्राला महसूल मिळतो.



केंद्रात एकत्रित केलेल्या २७ जाती आणि १३ संकरीत जाती यामधून लक्षद्वीप ऑर्डीनरी, टी x डी-केरासंकरा, प्रताप, फिलीपीन्स ऑर्डीनरी, चंद्रसंकरा, कोकण भाट्ये कोकनट हायब्रीड, केराबस्तर आणि गौतमी गंगा या जाती राज्यात लागवडीसाठी विकसित करण्यात आल्या आहेत. नारळ पिकाच्या मशागतीबाबत अनेक प्रयोग करण्यात येऊन पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण, आंतरपिके आदींबाबत मांडण्यात आलेले महत्त्वाचे निष्कर्ष शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.



नारळासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची शिफारस, उंच नारळासाठी सेंद्रीय खताची शिफारस, कीड नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती, सूक्ष्म सिंचन पद्धती आदी उपयुक्त संशोधनामुळे कोकणातील नारळशेतीला मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी केंद्रातून २० हजार नारळाची रोपे आणि एक लाख बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. केंद्राला वर्षातून २० ते ३० हजार शेतकरी भेट देतात. अनेक शेतीसहलींच्या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येते. पावसाळ्यात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागत असल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ.दिलीप नागवेकर यांनी दिली.



केंद्रात दररोज सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्यानंतर ' खरा तो एकची धर्म ' ही प्रार्थना घेतली जाते. प्राणीमात्रावर प्रेम करताना निसर्गाला समृद्ध करणाऱ्या वनस्पतींवर प्रेम करण्याची प्रेरणा कदाचित या प्रार्थनेतून सर्वांना मिळत असावी. केंद्राने संशोधनाबरोबरच सामाजिकतेचा पैलू सोबत ठेवीत काही उपक्रमही राबविले. केंद्रात तयार होणाऱ्या गवती चहाच्या रोपांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमधून ५० पैशाला रोप वाटण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लागवडीचे क्षेत्र विस्तारलेले असूनही त्यातील स्वच्छता आणि नेटकेपणा तेवढाच आनंद देणारा आहे. बागेत फिरताना पिवळे, नारंगी, हिरव्या रंगाचे नारळ ठिकठिकाणी दिसतात. नारळाच्या मधोमध जायफळ, दालचिनी, अननस, केळी आदी रोपे डौलाने उभी असलेली दिसतात.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment