Saturday, December 17, 2011

लातूरच्या रसिकांची ग्रंथोत्सवावर पखरण..


उदघाटनापासूनच ओतप्रोत प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवसापासून लातूरच्या या ग्रंथालयाकडे अक्षरशः पुस्तकप्रेमींनी रीघ लावली होती.

रविवारची सकाळ तर अनेकांसाठी अनोखा साहित्यरसास्वादाचीच ठरली. ज्येष्ठ लेखिका-कवयित्री डाँ. प्रतिमा इंगोले यांची प्रकट मुलाखत प्रा. श्रीमती ललीता गादगे आणि प्रा.राजा होळकुंदे यांनी घेतली. त्यामध्ये डाँ. इंगोले यांनी आपलं बालपण, साहित्यिक प्रवास आणि त्यातही विदर्भातल्या अनेकविध सामाजिक गोष्टींचा पटच उलगडला. कविता, रिपोर्ताज आणि लघुकथा-कादंबरी यांच्या प्रेरणांविषयी त्या भरभरून बोलल्या. लेखकाने वाचकांसाठी लिहावं. त्यांची प्रतारणा करू नये असे सांगतानाच, लेखकाने लोकशिक्षकाची भुमिकाही चांगल्या प्रकारे बजावावी असेही, डाँ. इंगोले म्हणाल्या. त्यांनी सादर केलेल्या सातबारा या कवितेने तर स्त्रीचं जगणं यावर लख्खं प्रकाश टाकला आणि उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

दुस-या दिवशी या ग्रंथोत्सवाच्या उत्साहात आणखी भर घातली ती सांस्कृतिक कार्यक्रमांनी, बोचऱ्या थंडीच्या साक्षीने सुरु झालेल्या या अविष्कारांनी अनेकांची रविवारची सायंकाळ मनमुराद सांस्कृतिक आस्वादात भिजवून टाकली. लातूरमधील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थींनी यामध्ये सहभागी झाले.

ग्रंथोत्सवात तिसऱ्या दिवशी वाचन संस्कृती मानवी जीवनाचा आधार या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात धीरगंभीर अशी चर्चा झाली. विकाराकडून सकाराकडे नेण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे या डाँ. हृषीकेश कांबळे यांच्या विधानाने ग्रंथोत्सव-ग्रंथप्रेम आणि वाचनसंस्कृती याविषयीचं समीकरण पुन्हा एकदा दृढ झालं. या परिसंवादात अतुल देऊळगावकर, ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस, प्रा.शिवाजी जवळगेकर, डॉ.श्रीराम गुंदेकर, प्रा.राजशेखर सोलापूरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. प्राचार्य नागोराव कुंभार अध्यक्षस्थानी होते.

ग्रंथोत्सवात सहभागी झालेल्या प्रकाशक, संस्थांनाही लातूरमधील ग्रंथप्रेमांची आगळी प्रचिती आली. ग्रंथोत्सवातील उपक्रमांचा आस्वाद घेण्याबरोबरच ग्रंथप्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन आणि खरेदी करणा-यामुळे या तीन दिवसांकाठी तब्बल चार लाख रुपयांची उलाढाल झाली. शासकीय ग्रंथ भांडार-औरंगाबाद, नॅशनल बूक ट्रस्ट, बाल-भारती यांच्यासह सहभागी ग्रंथ विक्रेते-प्रकाशकांना तीन दिवस ग्रंथप्रेमींनी गराडाच घातला होता. विशेष म्हणजे लातूरमधल्या या ग्रंथोत्सवाला सर्व वयोगटातील ग्रंथप्रेमींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांची संख्याही उल्लेखनीय अशीच होती. लातूरमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या पुस्तक-भिशींचा अनोखा उपक्रमही त्यानिमित्तानं चर्चेला आला. बालचमुंची गटा-गटाने या ग्रंथोत्सावकडे वळणारी पाऊलेही खूप आश्वासक वाटून गेली.

ग्रंथोत्सवाचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिंद्र प्रतापसिंह आणि पोलीस अधीक्षक बी.जी.गायकर यांच्या उपस्थितीत झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या, भाग घेतलेल्या शालेय मुलामुलींच्या चमूना रोख बक्षीसे व प्रशस्तीपत्रे वाटप करण्यात आल्याने मुलांमध्ये ग्रंथ आदराचे बीज पेरले गेले. ग्रंथोत्सवात सहभाग नोंदविलेल्यांनाही प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.

ग्रंथाविषयीची आस्था बोलून दाखवता येत नाही...तर ती वाचन संस्कृती जोपासण्यातूनच अधोरेखित होते. हे सुत्रच लातुरच्या ग्रंथोत्सवातून अधोरेखित झाले. या ग्रंथोत्सव २०११ च्या संकल्पनेमुळे महाराष्ट्रभर आगळ्या साहित्यिक आणि मराठी भाषा-ग्रंथ प्रेमांला बहरच आला आहे जणू. त्यातही लातुरच्या ग्रंथोत्सवांनेही आपल्या परीने या बहरात झळाळी आणि सुगंध भारला..असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment