Monday, December 19, 2011

महालक्ष्मी बचतगटाची धवलक्रांतीतून उन्नती

घरातील स्वयंपाक करणे, मुलांचे डबे, घरातील साफ-सफाई ही गृहीणींची काही केली तरी न टाळता येणारी निकडीची कामेच म्हणता येतील ज्यातून काही केल्या सुटका नाही. मात्र ही कामे करूनही आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी महिला बचतगटांच्या माध्यमातून सिध्द करत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यात आज महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा खूपच महत्वाचा आहे असे आपल्याला सांगता येईल.बचतगटांच्या माध्यमातून महिला आपल्या क्षमता सिध्द करत आहेत यासाठी त्यांना मिळालं आहे ते हक्काचं व्यासपीठ म्हणजे बचतगट. अशाच प्रकारे दुग्धोत्पादनातून प्रगती साधलेल्या महिला बचतगटांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे येथील महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. २००२ मध्ये स्थापन झालेल्या या दारिद्रयरेषेखालील बचतगटाने आपल्या बचतीनंतर इतर उद्योगातून उत्तरोत्तर प्रगती साधत दोन लाखांच्या दुग्धोत्पादन व्यवसाय व पोषण आहारापर्यंत झेप घेतली आहे.

काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व्ही.डी. प्रभूंनी बचतगट योजनेची कल्पना येथील महिलांना करून दिली. २००२ साली गटाची स्थापना झाली. गटप्रमुख मनाली काळसेकर त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने सुरुवातीला छोटे-छोटे व्यवसाय करण्याचे धोरण आखले. गावातील जत्रौत्सवात नारळ, लाडू विक्रीचे स्टॉल लावणे, चतुर्थीला याच वस्तूंची गावात विक्री करणे असे व्यवसाय केले. २००३ साली गटाचे पहिले ग्रेडेशन झाले त्यानंतर बचत गटांने व्यवसायास हातभार लागावा म्हणून २५ हजारांची उचत करण्यात आली. त्या रकमेचा वापर मोठ्या व्यवसायासाठीं करण्यात आला. गटातील सर्व सदस्य महिला शेतकरी असल्याने शेती पूरक व्यवसायात उतरण्याचे ठरवून २००४ साली दोन लाख रूपयांचे बचतगटाचे ग्रेडेशन झाल्यानंतर दुभत्या म्हैशी खरेदी केल्या. हे कर्जही पूर्ण फेडण्यात आले. सध्या दुग्धोत्पादन उद्योगाच्या जोडीला गटाने दोन अंगणवाड्यांचे पोषण आहार शिजवण्याचेही काम घेतले आहे.

या गटाने ग्रामीण विकास यंत्रणेचे दोन वेळा मालवण तालुका प्रथम तर एकदा जिल्हा प्रथम राजमाता जिजाऊ आदर्श गट पुरस्कार पटकावले आहेत. तसेच गटाच्या विद्यमान सदस्या व पूर्वीच्या सचिव चारुशीला काळसेकर या गटाच्या माध्यमातून २००३ मध्ये दिल्ली वारी करून आल्या आहेत. तिथे वर्ल्ड फेअर मध्ये गटाचा स्टॉल होता. तसेच मुंबईलाही गटाच्या स्टॉलने आपल्या नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे गटाची एक वेगळीच छाप पाडली होती.आज बचत गटातील कार्यशील सदस्यांमुळे बचतगटाने आपले नाव गावाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हयातही आपली वेगळी ओळख राखली आहे.

नम्रता माळगावकर गटप्रमुख असून उपगटप्रमुख म्हणून राजश्री घाडी व सचीव म्हणून नम्रता घाडी काम पाहतात. व्यवसायाच्या वेगवेगळया वाटा चोखाळत आज बचत गट ५० रूपयांच्या बचतीपासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत आपली एक वेगळी ओळख करून देण्यासाठी धडपडत आहेत. आणि या धडपडीतून आज दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा येवू लागला आहे.महिलांचं आर्थिक परावलंबन कमी होत असल्याने कुटुंबाचे किंबहुना गावांचे एक एक वेगळेच चित्र डोळयासमोर येत आहे.ज्यातून गावांतील महिलांनाही आपला प्रगतीचा मार्ग गवसला आहे असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment