Friday, December 23, 2011

सफर रत्नागिरीची (भाग-२)

मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्र किनारा लागतो. नारळाच्या दाट झाडी कडून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरुबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून याठिकाणी विविध आकाराचे शंख-शिंपले सापडतात. शांत-निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटता येतो.

केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर परिसरात तळे असून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर सुंदर आहे. संध्यासमयी सनईचे सूर सुरू असतांना पाय मंदिराच्या परिसरातच रेंगाळतात. मंदिराच्या उजव्या बाजूने 'हजरत याकूबबाबा सरवरी रहमतुल्ला दर्ग्या'कडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. याकूबबाबा सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ स्वारीची तयारी सुरू असतांना त्यांची व याकूबबाबांची भेट झाली. याकूबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा 'उरुस' होतो. या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भाविक सहभागी होतात.

केळशीहून दापोलीकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे श्रीगणेशाचे जागृत दैवत आहे. या स्थानाला कड्यावरचा गणपती म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. देऊळ ११ व्या शतकातील असून त्याचा १७८० मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय, मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो. भव्य आणि तेवढीच सुंदर गणपतीच्या मुर्तीवर भाविकांचे लक्ष खिळून राहते. मंदिराच्या समोरच्या बाजूस तळे आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिराची रचनादेखील तेवढीच रेखीव आहे.

श्रीगणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवरच्या पुलावरून सुंदर दृष्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेल्या असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हर्णे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्रतटाचे नयनरम्य दृष्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात दिमाखाने उभा असलेला सुवर्णदुर्गदेखील दूरूनच नजरेस पडतो. दोन्ही बाजूला असणाऱ्या सुरुच्या झाडीतून पुढे जात आपण मुरुडला जावून पोहचतो. समुद्र शांत असला तर याठिकाणी लहान तराफ्यातून जावून डॉल्फीनची जलक्रीडा पाहता येते. सकाळच्या वेळी या भागात 'सी गल' पक्षांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात. सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरून उंच झेपावणाऱ्या पक्षांचे मनोहारी दृष्य पाहायला मिळते. मुरुड गावाकडे जातांना पाणकोंबड्यांचे थवे खाडीवरून उडतांना दिसले. तर इतरही विविधरंगी पक्षांचे दर्शन या भागात घडले.

मुरुड हे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे गाव. गावात त्यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंचच उंच नारळ-पोफळीच्या झाडीतून बीचकडे जाताना मज्जा वाटते. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला पर्यटकांना आवडते. किनाऱ्यावरील स्टॉलवर क्रीडा साहित्य भाड्याने देण्याची व्यवस्था आहे. या परिसरात आने बीच रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सोबतच निवास-न्याहरी योजने अंतर्गत घरगुती राहण्याची व्यवस्थाही बऱ्याच ठिकाणी आहे. 

मुरुडला मुक्काम करून सकाळी लवकर हर्णे बंदरावर गेल्यास इथला मासेबाजार पाहता येतो. सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकामधून ताजे मासे उतरविले जातात. विविध रंग आणि आकाराचे मासे पाहणे ही खास पर्वणी असते. ताज्या कोळंबीच्या भरलेल्या टोपल्या बघून मांसाहार करणाऱ्या पर्यटकांच्या तोंडात पाणी न आले तरच नवल. पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीवनही इथे जवळून पाहता येते. रस्त्याने जाताना कोळ्यांची जाळी कशी विणली जातात तेदेखील पाहायला मिळते. हर्णे बंदराच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक 'सुवर्णदुर्ग'ला लहान होड्यातून भेट देता येते. फतेहगड, कनकदुर्ग आणि गोवा किल्ल्याचे दर्शनही रस्त्याच्या बाजूला घडते. कनकदुर्गला असणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर दीपगृह पाहायला मिळते. हर्णे गावात तोरणासारखी वाळायला घातलेली मासोळी ठिकठिकाणी दिसतात. काळ्या कातळावर वाळत घातलेल्या चमकणाऱ्या मासोळ्यांचे सौंदर्यही वेगळेच असते.

हा फेरफटका करून प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी मुरुडपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूदगावाला आर्वजून भेट द्यावी. गावातील जोशी बागेजवळ व्याघ्रेश्वराचे प्राचिन मंदिर आहे. सुमारे ८०० वर्षापूर्वीचे हे शंकराचे स्थान अनेकांचे कुलदैवत आहे. मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या भातखंडी नदीचा नयनरम्य परिसर भाविकांचा थकवा दूर करतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस कोरीवकामाचा अप्रतिम अविष्कार पाहायला मिळतो. प्रवेशभागाजवळ दीपमाळ आहे. मंदिरा शेजारीच ग्रामदैवत झोलाईदेवीचे मंदिर आहे. इथून पाचच मिनिटात आपण आसूदबागजवळ पोहचतो. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत खातलेल्या सुपाऱ्या, आणि पारंपरिक पद्धतीची कोकणी टूमदार घरे असे सौंदर्य इथे पाहायला मिळते.

आसूदबागला दाबकेवाड्यापासून खालच्या बाजूस पायवाट जाते. गाडी येथेच पार्क करून खालच्या बाजूस पायी जावे लागते. काही सेकंद पायी चालल्यावर स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होईल, असा हिरवागार निसर्ग आपल्या सभोवती असतो. झुळझुळ वाहणारे पाणी, पोफळीची सरळ उभी असलेली झाडे, रस्त्यावर पडलेला गुलाबीशार जामच्या फुलांचा सडा, हवेतला गारवा...या सर्व वातावरणात बाहेरच्या विश्वापासून आपण अलगद वेगळे होतो. सोबत असतो तो केवळ आनंद आणि हिरवागार निसर्ग. या वाटेवरून उतरल्यावर कोटजई नदीचे खळखळ वाहणारे पात्र समोर असते. 

नदीवरील साकव ओलांडून गेल्यावर श्री केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी सव्वादोनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात. दहा मिनिटे चालून आल्यावर हा आकडा ऐकून चढावे की नाही, असा विचार मनात येतो. मात्र एकदा हिमतीने चढून वर गेल्यावर थकव्याचा स्पर्शसुद्धा शरीराला जाणवत नाही. दाट झाडीने वेढलेल्या या मंदिराच्या परिसरात चैतन्याचा अनुभव येतो. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते. उंच डोंगरावरून येणारे हे पाणी हातात घेतल्यावर 'बाजारात मिळणाऱ्या बाटल्यांपेक्षा स्वच्छ' अशी आमची प्रतिक्रीया होती.

दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. परतीच्या वाटेवर निसर्गाच्या सान्निध्यात नि:शब्द होऊन शक्य तितका आनंद हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करावासा वाटतो. वाटेवर गुलाबी फुले हातात घेऊन त्यांचे रुप न्याहाळत काही क्षण घालविण्याचा मोहदेखील आवरत नाही. कडेला असलेल्या घराच्या परसात बसून परिसर न्याहाळताना घेतलेल्या कोकम सरबताची चवही काही औरच लागते. दुरुन दिसणारे सुपारीचे पेंड झाडावर चढून हातात घ्यावेसे वाटतात. खरोखर स्वर्गलोकातली भटकंती यापेक्षा निराळी नसावी, असेच याठिकाणी वाटते. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार एकदातरी अनुभवायला हवा.

No comments:

Post a Comment