Monday, December 26, 2011

सफर रत्नागिरीची -३

आसूद गावापासून दापोली केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जून भेट द्यावी. विद्यापीठातील अनेक नवे प्रयोग अचंबित करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचना देखील तेवढीच सुंदर आहे. दापोली परिसरात कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते. इथे फळबागामधील भटकंती आणि थकल्यावर मिळणारा कोकणी पद्धतीच्या आहाराचा आनंद काही निराळाच असतो.

दापोली दाभोळ रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २० किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पहायला मिळतो. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मूर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षून घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळीलमार्गे मळे गावात मुख्य मार्गाला आपण लागतो. 

मूळेपासून दापोलीकडे चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. अत्यंत सौम्य स्वभावाच्या कर्तबगार राजा दांडेकरांशी गप्पा मारल्यावर आमचा दिवसभराचा थकवा दूर झाला. एखादे मोठे कार्य अडथळ्याची शर्यत पार करून कसे उभे राहते याचे उत्तम उदाहरण आमच्या समोर होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही दाभोळची खाडी गाठली.

सायंकाळ झाल्याने अंडामशिदीचे सौंदर्य पाहता येणार नव्हते. दाभोळला मुक्काम करण्याऐवजी आम्ही गुहागरला जायचे ठरविले. दाभोळच्या खाडीतून फेरीबोटीची व्यवस्था असल्याने आम्ही वाहनासह बोटीत बसलो. पाचच मिनिटात आम्ही गुहागर तालुक्यात आलो. (रस्त्याने गुहागरला येण्यासाठी किमान तीन तास प्रवास करावा लागला असता.) धोपावे गावातून वेलदूरमार्गे १६ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गुहागर शासकीय विश्रामगृहात मुक्कामासाठी पोहचलो. गुहागरला अनेक ठिकाणी निवास-न्याहरी योजने अंतर्गत उत्तम निवास व्यवस्था आहे. त्यामुळे पर्यटकांची चांगली व्यवस्था होऊ शकते.

सकाळी लवकर उठून फेरीबोटने आम्ही दाभोळला चंडिकादेवीच्या मंदिरात गेलो. दाभोळहून दापोलीला जाताना ४ किलोमीटर अंतरावर हे जागृत देवस्थान आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील दगडांमध्ये कोरीव काम करून मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मूर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपांनी प्रकाशित गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक याठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.

श्री चंडिकेचे दर्शन घेतल्यावर दाभोळच्या खाडीला लागून असलेल्या अंडामशिदीचे सौंदर्य न्याहाळता येते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हिने १६५९ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले. त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती याठिकाणी आम्हाला मिळाली.

खाडीच्या पलिकडे गेल्यावर अंजनवेल येथील गोपाळगडला भेट देता आली. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. समुद्राच्या बाजूला असलेल्या दाट गवतातून जात तटबंदीचे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला गेला नाही. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूरहून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दीपगृहेदेखील आहे. परतीच्या प्रवासात विस्तीर्ण परिसरात असलेला प्रसिद्ध रत्नागिरी गॅस ऊर्जा प्रकल्प दिसतो. गुहागरला परतल्यावर नारळाची दाट रांग आपल्या स्वागतासाठी तयार असते. निसर्ग सौंदर्याचे आगर असलेल्या या गावातील मुक्काम खरोखर आनंददायी असतो. खरं तर निसर्गाचे सान्निध्यच मुळात आनंद देणारे असते. व्यवहाराचा विचारही मनात न आणता हृदयाचे कप्पे उघडून मोकळा श्वास घेण्याची तयारी आपली असेल तरच हं!


(क्रमश:)

No comments:

Post a Comment