Sunday, July 17, 2011

महाबळेश्वरमध्ये निसर्गाबरोबरच पर्यटकांचाही बहर

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्राचा काश्मीर म्हणूनही महाबळेश्वरला संबोधले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेश पातळीवर लौकिकास आले आहे. म्हणूनच येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. राज्यात सध्या सर्वात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे येथील सृष्टी हिरवाईने नटली आहे. हा शृंगारलेला निसर्ग डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरला वाढू लागली आहे.

महाबळेश्वर-पाचगणी गिरीप्रदेश सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगांमधील एक भाग असून सिंदोला टेकड्यांमधील विल्सन पॉईन्ट हा देखील सर्वात उंच भाग आहे. पठाराच्या चहुबाजुंनी नद्यांची खोरी, विविध उंचीच्या सुळ्यांच्या डोंगराचा विशाल प्रदेश व येथील उभट डोंगर कड्यांचा भूप्रदेश ही या प्रदेशाची विशेषत: होय. या पठाराच्या पश्चिम व नैऋत्येकडील कोयनेचे आणि उत्तरेकडील कृष्णेचे विशाल खोरे भू स्वरुपाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

महाबळेश्वर-पाचगणीचे पठार व त्याच्या उतारावर कृष्णा, कोयना, सावित्री, वेण्णा व सोळशी या नद्यांचा उगम होतो. महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून १३५० कि.मी. उंचीवर आहे. येथील मुख्य डोंगराचे खडबडीत उभट कडे व त्यातील खोऱ्यामुळे सह्याद्रीचे विशाल दर्शन घडते. डोंगराचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण डोंगरमाथा थेट कड्यापर्यंत विविध वृक्ष व वनराईने व्यापला असून येथील वनराई इतकी दाट आहे की उंचावरुन पाहिल्यास मोठ्या पर्णसंभासच्या लाटांचा भास व्हावा.

ऋतुपरत्वे महाबळेश्वमध्ये निसर्ग सौंदर्य बदलत असते. नैऋत्य मान्सून ओसरल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक सौंदर्य बहरलेले असते. बहुतांश भागावर वनफुलांचा गालीचा अंथरलेला असतो. वनराईच्या मोकळ्या जागा अरारुट आणि लिली फुलांनी भरुन जातात. येथील कडे, चकाकणारे असंख्य ओहोळ, फवारे, इंद्रधनु रंगीबेरंगी तुषारांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

महाबळेश्वर मंदिर प्राचीन असून यादव राजाने १३ व्या शतकात बांधले आहे. विल्सन पॉईंट, मारवारिया पॉईंन्ट, केल्स पॉईंन्ट, ईको पॉईंन्ट, आर्थर पॉईंन्ट, विंडो पॉईंन्ट, कसलरॉक पॉईंन्ट, सावित्री पॉईंन्ट, मार्जोरी पॉईंन्ट, एल्फिस्टन पॉईंन्ट, कॅनॉट पीक हंटर पॉईंन्ट, नॉथकोर्ट पॉईंन्ट, लॉडविक पॉईंन्ट, बॉम्बे पॉईंन्ट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फॉकलंड पॉईंन्ट, इत्यादी पॉईंन्ट पर्यटकांना भूरळ घालतात.

महाबळेश्वरास बाल कवींनी 'निसर्ग देवतेला पडलेले सुंदर स्वप्न' असे म्हटले आहे, याची प्रचिती महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांना निश्चितच येते यात मात्र शंका नाही. म्हणूनच महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन ठरले असून येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. 

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

No comments:

Post a Comment