Tuesday, July 26, 2011

विना विलंब, विना तारण कर्ज योजना

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि त्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विना विलंब, विना तारण आणि विना जमीन असा क्रांतिकारी मदतीचा हात देऊ केला आहे. या सोनेरी संधीचा रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या धाटाव शाखेचे व्यवस्थापक चंद्रकांत पराते यांनी केले आहे.

भात शेतीच्या कामाची सुरुवात चिखळणीपासून केली जाते. भाताची लागण केल्यानंतर भाताचे पिक जोमात येते. सुगीच्या दिवसांत शेतात उगवलेले डोमदार भात कापून त्याचे भारे बांधण्यात येतात. या भाऱ्यांची नंतर मळणी केली जाते. या मळलेल्या भाताची घरापर्यंत उपलब्ध साधनांद्वारे वाहतूक केली जाते. घरात आलेला भात कणग्यांत भरुन पुढील वर्षभराच्या वापरासाठी ठेवला जातो. चिखळणीपासून ते भात कणगीत भरेपर्यंतचा खर्च एकरी बारा हजार येतो, असा नाबार्डचा दावा आहे. शेतकऱ्यांची शेती अनेक खंडीची असेल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुस्थितीत असेल तर त्या शेतकऱ्याला एकरी वीस हजार रुपये मदत मिळते, अशी माहिती श्री. पराते यांनी दिली.

किसान क्रेडिट कार्ड ऊर्फ पीक कर्ज योजना या नावाने राष्ट्रीयकृत बँकेने सुरु केलेल्या योजनेचा मूळ व्याज दर हजारी नऊ टक्के असा आहे. परंतु शेतकऱ्यांनी सदर कर्जाची फेड जर मुदतीत केली तर त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे तीन टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शिवाय पंजाबराव देशमुख कृषी योजनेतून सुद्धा ४ टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यावर फक्त २ टक्के व्याजाचा बोजा पडणार आहे. 

या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मतदान कार्डाची झेरॉक्स, सातबारा व ८ अ चा उतारा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत घेऊन गेल्यास त्यांना विना विलंब किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकतो.

No comments:

Post a Comment