Friday, July 29, 2011

देशभक्तीचा जागर


युवा पिढीच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीबाबत बरेच बोलले जाते. आजच्या युवकांची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील युवापिढीशीदेखील केली जाते. मात्र शनिवारी सकाळी रत्नागिरीतील कोसळणाऱ्या पावसात लोकमान्य टिळकांच्या नावाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने 'स्मरणयात्रे'त सहभागी झालेल्या युवकांना पाहणाऱ्यांना ही तुलना निरर्थक असल्याचे निश्चितच जाणवले असणार आणि आजच्या युवापिढीबद्दल त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असणार हे नक्की...

...२३ जुलै हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतील गोरे यांच्या वाड्यात झालेला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ते याच वाड्यात रहात होते. त्यानंतर वडिलांना पुणे येथे नोकरीनिमित्त जावे लागले. टिळकांच्या जन्मभूमीचे महात्म्य नवयुवकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून लोकमान्य टिळकांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी साजरी करण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष देव यांच्याकडून लोकराज्य वाचक मेळाव्याचेवेळी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी वर्णन केलेला 'चैतन्याचा सोहळा' अनुभवण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर महाविद्यालयात सहकारी किलजे यांच्यासह दाखल झालो.

पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने 'कॉलेज'चे विद्यार्थी येतील का, अशी सहज शंका मनात आली. महाविद्यालयाच्या मैदानावर पांढऱ्याशुभ्र वेशातील युवक पडत्या पावसात एका रांगेत उभे होते.मात्र फारशी गर्दी नव्हती. मात्र काही वेळातच युवक-युवती पावसाची पर्वा न करता इमारतीच्या बाहेर पडू लागले,तेदखील शिस्तीत..एका रांगेत. प्राचार्य देव यांच्या हस्ते 'स्मरणयात्रे'चा शुभारंभ झाला. टिळकांच्या जयघोषाशिवाय कुठलाही आवाज त्या प्रभातफेरीत नव्हता. पाऊस सुरू असूनही एकाही विद्यार्थ्यी किंवा प्राध्यापकाच्या हातात छत्री दिसली नाही. स्वत: प्राचार्य प्रभातफेरीच्या अग्रभागी होते. येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचे कौतुक वाटत होते. रहदारीला अडथळा न होऊ देता ही फेरी टिळक जन्मस्थानाजवळ पोहोचली.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचा हा वाडा देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडे आहे. वाड्यातील घरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूस टिळकांचा जन्म झालाती खोली आहे. खोलीत टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर समई लावलेली होती आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली होती. याच खोलीच्या भिंतींना टिळकांच्या जन्माच्यावेळी स्वातंत्र्य गर्जनेचा पहिला स्वर ऐकण्याचे भाग्य लाभले होते. खोलीतील एका काचेच्या पेटीत त्याकाळची आठवण असणाऱ्या काही वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. इतर घरातील इतर भागात टिळकांची काही छायाचित्रे आणि हस्ताक्षर पहायला मिळतं. मागील बाजूस विस्तीर्ण वाड्यात बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे...

...एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. वाड्यात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याच्या सभोवती कुठलाही गोंधळ न करता सर्व विद्यार्थी शांततेत उभे राहीले आणि लोकमान्य टिळकांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
'आरती ओवाळू लोकमान्य टिळकांना
घ्याहो जन्म पुन्हा करण्या सुराज्य स्थापना'
आरती टिळकांची असली तरी युवकांच्या मनात दडलेल्या देशभक्तीला केलेले ते आवाहन असल्याचे आरतीचे शब्द ऐकतांना जाणवले. आरतीनंतर प्राचार्य डॉ.देव यांनी कार्यक्रमाची भूमीका विषद करतांना महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टिळक जन्मस्थानाचे महात्म्य कळून त्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. लोकमान्य टिळकांना संस्कृत भाषेविषयी असणारे प्रेम आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाची सांगड घालत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जीजीपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय सादर केला. त्यानंतर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. प्रा.चव्हाण यांनी आदल्या दिवशीच रचलेले टिळकांच्या जीवनावरील सुंदर गीत विद्यार्थ्यांनी एका दिवसात चाल लाऊन सादर केले.
'रत्नभूमी ही पावन सुंदर, देखणी आपल्या जन्माने
गीताईचा अंश मनोहर आला आपल्या रुपाने
देशक्तीचा शेला लेवूनी, लोकमान्य तो जाहला
सरस्वतीचा वरदहस्त हा महाराष्ट्राने गौरवीला'
अशा प्रेरक ओळी सादर होत असताना पावसाच्या सरीदेखील या जन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरीकदेखील भारावून याठिकाणी थांबले. साधारण सात-आठशे युवक-युवती असूनही त्या स्थानाचे पावित्र्य राखत शांत वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमानंतर टिळक आळीतील नानासाहेब भिडे यांनी परंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.('पेढे वाटले' असा मी उल्लेख करताच त्यांनी 'जन्मदिवस आहे, त्यामुळे तोंड गोड करतो आहे' अशी दुरुस्ती केली.) परततानाही विद्यार्थ्यांमधली शिस्त कायम होती. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये या स्थानाला भेट देऊन निर्माण झालेली ऊर्जा उत्साहाच्या रुपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अकरावीच्या विक्रांत पाटीलला कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला संस्कार तरुण पिढीतील टिळक निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे वाटते. तर त्याचा सहकारी असलेला जयंत अवेरे याने या स्थानाला भेट दिल्याने देशासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. स्नेहा जोशी हिला आपल्या युवा सहकाऱ्यांनी दाखविलेली शिस्त आवडली. त्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश गेल्याचे तीने सांगितले.

राम नाक्यापासून जयस्तंभापर्यंत विद्यार्थ्यांची एक सरळ आखलेली रेष दिसत होती. महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची टिळक जन्मस्थानाला असलेली ही पहिलीच भेट त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्याचबरोबर ज्या परिसरात टिळकांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या रुपाने झालेले संस्कार विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा देतील. महाविद्यालयात अनेक उपक्रम होतच असतात. पण रत्नागिरीचं स्थानमहात्म्य लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 'देशभक्तीचा जागर' होता.


  • -डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment