Wednesday, July 27, 2011

उद्योगाची भरारी

हिंगणी हे गाव सेलु तालुक्यातील बोरधरण रोडवर बसलेले आहे. त्या गावाची लोकसंख्या २००० पर्यंत आहे. गावात एकूण ४० ते ४५ गटांची स्थापना झालेली आहे. त्यापैकी माविम अंतर्गत त्या गावामध्ये ५ गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच उन्नती स्वयंसहाय्यता गटाची स्थापना १५ मे २०१० रोजी झालेली असून, त्या गटातील सदस्या सौ.ज्योत्स्ना रमेश उरकुडे हया गटामध्ये येण्यापूर्वी फक्त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्या. तसेच घराबाहेर निघण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण मनात उद्योग करण्याची खूप इच्छा होती, पण काय करणार. असं त्या सांगतात.

माविम सहयोगीनी मार्फत जेव्हा उन्नती बचत गटाची स्थापना झाली. तेव्हापासून त्या गटामध्ये सक्रीय सभासद म्हणून सहभागी आहे. गटाच्या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योजकता जाणिवजागृती प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग करण्याची इच्छा निर्माण झाली. गटातून रुपये ४०००/- कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपडयांच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाच्या उत्पन्नातून गटाच्या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले महामंडळातील योजनेच्या माध्यमातून रुपये २००००/- कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायामध्ये वाढ केली. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून वर्षामध्ये कर्जाची परतफेड झाली. 

ज्योत्स्नाताईची उद्योगातील प्रगती व कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडिया,हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. त्यांनी व्यवसायात वाढ करण्याकरिता बँक ऑफ इंडिया हिंगणी शाखेकडे रुपये ५००००/- कर्जाची मागणी केली. बँकेने रुपये ५००००/- चे कर्ज दिले. ज्योत्स्ना ताईच्या उद्योगाला भरभराट आलेली असून, व्यवसायातून तिला चांगल्या प्रकारे नफा मिळतो.

तिच्या हया आदर्शामुळे गावात झालेल्या गाव विकास समितीमध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली. गाव विकास समितीच्या माध्यमातून सर्व गटातील महिलांच्या सहभागाने गावामध्ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एडस जाणिवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम गावात घेतले.

गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व व्यवसायाच्या माध्यमातून घेतलेली भरारी हे यशस्वी उद्योजक म्हणून आदर्श घडविणारे आहे.

No comments:

Post a Comment