Monday, July 25, 2011

ऑनलाईन रोहयो होणार गतीमान


  1. रोजगार हमी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती तातडीने संकलित करण्यात होणारा कालापव्यय टाळण्यासाठी आता सिमनिक सॉप्टवेअरचा अवलंब करण्यात येणार आहे. हे तंत्र वापरल्यास रोजगार हमी योजनेची तालुकावार परिस्थिती आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. 

    महाराष्ट्राने राबविलेली रोहयो जशी केंद्राने राबविली, तसेच या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने खास विकसित केलेली ही ऑनलाईन प्रणाली संपूर्ण देशभर वापरली जाणार आहे.

    महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज ऑनलाईन नोंदविली जाते. ही नोंदवत असताना अनेक अडचणीचा सामोरे जावे लागते.

    विशेषत: तालुका पातळीवरुन ही माहिती फॅक्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असते. रोजच्या रोज माहिती अपडेट करताना रोहयो कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. यावर उपाय म्हणून सिमनिक सॉप्टवेअर वापरण्याचा निर्णय केंद सरकारने घेतला आहे. 

    रोजगार हमी योजनेचे कोकण विभागीय उपायुक्त डी.एस.डोईफोडे यांनी नुकताच अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोच्या कामाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला. 

    यावेळी जिल्हयातील रोहयोचे कार्यकारी अभियंता डी.वाय.जाधव, सर्व तहसिलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

    या बैठकीत सिमनिक सॉप्टवेअर वापरण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. 

    सिमनिक म्हणजे काय ? 
    स्टेटस् इन्फॉरमेशन मॅनेजमेंट सिस्टिम या तंत्राचा वापरामुळे तालुकास्तरावर रोहयोची किती कामे चालली आहेत, त्यावर किती मजूर काम करताहेत. 

    ही कामे सध्या कुठल्या पातळीवर याची माहिती सर्वांना घरबसल्या मिळू शकणार आहे. 

    सध्या जे एनआयसीचे सॉप्टवेअर वापरले जाते. त्यात केवळ जिल्हास्तरीय माहिती संकलित करण्याची सुविधा आहे.

    ग्रामपातळीवर ही माहिती ऑनलाईन संकलित करण्याचा शासनाचा विचार आहे.

    रोहयोची कामे
    विहिरी, रोपवाटीका, गाळ काढणे, रस्ते, वनराई बंधारे, वृक्ष लागवड, शेततळी, खैसाच्या कामांचा समावेश आहे. 

    त्यासाठी प्रत्येक तालुक्याकरिता १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

    जिल्ह्यात एक लाख १४ हजार ४२३ मजुरांची नोंदणी झाली असून, ८८ हजार १८८ मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहेत.

    'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

No comments:

Post a Comment