Wednesday, July 27, 2011

संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना ( भाग-२ )

आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.

राज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. 

या राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे. 

ही योजना खालील तपशीलानुसार सन २०११-२०१२ मध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.

दुधाळ जनावरे खरेदी समिती- 
• दुधाळ जनावरे खरेदी समितीमध्‍ये संबंधित तालुक्‍याच्‍या पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार), कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्‍याचे संस्‍थाप्रमुख (सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन/पशुधन विकास अधिकारी/सहायक पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक), गावातील प्राथमिक सहकारी दूध संस्‍थेचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी आणि लाभार्थी यांचा समावेश असेल.

• दुभत्‍या संकरित गाई/म्‍हशींची खरेदी शक्‍यतो राज्‍याबाहेरुन केली जाईल, त्‍यानुसार आवश्‍यक ते नियोजन केले जाईल.

• दुधाळ जनावरांच्‍या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च लाभार्थ्‍यास करावा लागेल. 

• या योजनेखाली वाटप करण्‍यात येणा-या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्‍ह्यातील जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या संयुक्‍त नावे ३ वर्षांसाठी विमा उतरविण्‍यात येईल. 

• योजनेमध्‍ये वाटप केलेले जनावर मृत झाल्‍यास विम्‍याच्‍या पैशातून व खात्‍याच्‍या संमतीने लाभार्थ्‍यांना दुसरे जनावर खरेदी करुन पुरविण्‍यात येईल. 

• सदर योजना राबवितांना प्रथमत: तीन दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्‍यात येईल. 

• सहा महिन्‍यानंतर किंवा सदरची तीन दुभती जनावरे आटल्‍यानंतर (यामधील जो कालावधी कमी असेल तदनंतर) उर्वरित तीन दुधाळ जनावरे पुरविण्‍यात येतील.

• या योजनेंतर्गत लाभ दिलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी संबंधित पशुधन विकास अधिकारी(विस्‍तार) हे कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्‍था व संबंधित ग्राम पंचायत स्‍तरावर उपलब्‍ध करुन देतील. 

• पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) हे कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्‍थांनी लाभार्थ्‍यांची नोंद पशुधनाच्‍या तपशीलासह स्‍वतंत्र नोंदवहीत घेणे तसेच इतर बाबतीत पाठपुरावा करतील.

• दुधाळ जनावरांचे वाटप केलेले लाभार्थी ज्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रात असतील त्‍या तालुका लघुपशु सर्वचिकित्‍सालयाचे सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय दवाखान्‍यावरील पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक यांच्‍याद्वारे सदर दुधाळ जनावरांना आरोग्‍यविषयक आणि पैदाशीच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील व त्‍याची नोंद स्‍वतंत्र नोंदवहीत घेतील. 

• तसेच सदर अधिकारी/कर्मचा-यांमार्फत दर तिमाहीस वाटप केलेल्‍या दुधाळ जनावरांची लाभार्थी/पशुपालक यांच्‍या घरी जाऊन १०० टक्‍के पडताळणी करतील व त्‍याचा अहवाल पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) यांच्‍यामार्फत वरिष्‍ठास सादर केला जाईल. 

• पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) हे तालुक्‍यात वाटप केलेल्‍या एकूण दुधाळ जनावरांच्‍या २५ टक्‍के जनावरांची प्रत्‍यक्ष पडताळणी करतील. 

• जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त हे जिल्‍ह्यात वाटप केलेल्‍या एकूण दुधाळ जनावरांपैकी प्रत्‍येकी १० टक्‍के जनावरांची प्रत्‍यक्ष पडताळणी करतील व तसा अहवाल वरिष्‍ठास सादर करतील.

• योजना कालावधी संपल्‍यानंतर ६ महिन्‍यांनी पशुसंवर्धन आयुक्‍त हे प्रत्‍येक विभागासाठी प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसंवर्धन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमून या योजनेचे मूल्‍यमापन सदर समितीद्वारे करतील. 

• या अहवालानुसार पशुसंवर्धन आयुक्‍त अभिप्रायासह सदर योजनेचा मूल्‍यमापन अहवाल शासनास सादर करतील. 

• या अहवालानुसार सदरची योजना १२ व्‍या पंचवार्षिक योजना कालावधीत राबविण्‍यासंदर्भात शासनस्‍तरावर निर्णय घेण्‍यात येईल.

• लाभार्थ्‍यांस हा व्‍यवसाय किमान ३ वर्षे करणे आवश्‍यक राहील. 

• लाभार्थ्‍यांनी योजनेंतर्गत दिलेल्‍या शासकीय अनुदानाचा गैरविनियोग केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास अनुदानाची व्‍याजासह एक रकमी वसुली महसूली कार्यपध्‍दतीने लाभार्थ्‍यांकडून केली जाईल. 

• लाभार्थ्‍यांना विहीत नमुन्‍यातील बंधपत्र दुय्यम निबंधक यांच्‍याकडे नोंदणीकृत करुन भरुन द्यावे लागेल. याशिवाय लाभार्थ्‍यांकडे ६ दुधाळ जनावरांचे पालन करण्‍यासाठी पुरेशी जागा उपलब्‍ध असावी. 

• लाभार्थ्‍याने दुग्‍ध व्‍यवसाय/गो/म्‍हैस पालन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्‍यक राहील.

• सदर योजनेचे अंमलबजावणी अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी संबंधित जिल्‍ह्याचे जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त हे राहतील. 

• विभागीय स्‍तरावर संबंधित प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसंवर्धन व राज्‍याकरिता आयुक्‍त पशुसंवर्धन हे सनियंत्रण अधिकारी राहतील.


  • राजेंद्र सरग 
  • No comments:

    Post a Comment