Wednesday, March 14, 2012

एकमेवाद्वितीय नेतृत्व

मी व माझ्यासारखे अनेक लोक भाग्यवान आहोत, की ज्यांना चव्हाण साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाचा ठेवा प्राप्त झाला. प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळाली, तरी प्रशासनाला एक मानवी चेहरा असलाच पाहिजे व प्रशासकी यंत्रणेला विश्वास देऊन, तिचा विश्वास संपादन केला पाहिजे. समाजात काम करण्याची जी संधी मिळेल, ती प्रशासनात असो, की अन्य क्षेत्रात, त्यापाठी सामान्यजनांचं समर्थन आहे. त्यांच्या हिताच्या जपणुकीचे विचार कायम ध्यानात ठेवले पाहिजे, हा आदर्श चव्हाण साहेबांनीच आम्हापुढे ठेवला.

असा विविधांगी अनुभव तसेच स्व. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील राजकीय आणि वैचारिक देवाणघेवाण श्री. पवार यांच्याच शब्दांत आपल्यासमोर सादर केली आहे श्री. विजय नाईक यांनी.

सार्वजनिक जीवनात काम करण्याची आवड मला लहानपणापासून होती. शालेय जीवन ते महाविद्यालय असा कालखंड असो, त्यातील क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, स्नेहसम्मेलनं अथवा कुठलाही मोठा समारंभ असो, सार्‍या जबाबदार्‍या माझ्याकडे असायच्या. अभ्यास सोडून अन्य गोष्टीत माझा बराच वेळ जायचा. त्यातील व्यस्तता वाढत गेली. माझं घर, माझे कुटुंबीय यांच्यावर सत्यशोधक चळवळ आणि शेकापच्या कामकाजातून डावी विचारसरणी यांचा पगडा होता. १९६८ साली मॅट्रिकची परीक्षा देऊन पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेजमध्ये आलो आणि वसतीगृहात राहायला लागलो. बाहेर राहाण्यामुळे बाकी सार्‍या गोष्टी करण्यास मुभा मिळाली. त्यात पहिल्या वर्षी कॉलेजमधील निवडणूक लढविली व विजयी झालो.मग महाविद्यालयातील अनेक उपक्रमांत माझा सहभाग वाढला.

१९५८-६० या काळात, महाराष्ट्रात आज जशी प्रत्येक तालुक्यात महाविद्यालये आहेत,तशी नव्हती. बारामतीला महाविद्यालय नव्हतं. आज ती डझनावारी पाहावयास मिळतात. त्या काळात पुणं शैक्षणिक केंद्र होतं. तिथं मुलामुलींना शिक्षणसाठी पाठविण्याचा कल होता. बाहेरून ते यायचे. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात, व्याप्ती व कार्यकक्षा पुण्यात वाढायला लागली व त्याचा विस्तार होत गेला, याचं महत्वाचं कारण या विद्यार्थ्यांना मदत करण्यात मी घातलेलं लक्ष. अहमदनगर, खानदेश, मराठवाडा, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आदी जिल्हावार मित्रमंडळं आम्ही संघटित केली. पुणे महाविद्यालयातील निवडणुकात मी व माझ्या सहकार्‍यांचा पुढाकार होता. परिस्थिती अशी, की आमचंचं पॅनल निवडून यायचं, ज्यानं विद्यार्थ्यात ही भावना वाढली, की यश आमच्या गटाकडेचं गेलं पाहिजे.

१९५६-५८ या कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण केलं. आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, उद्धवराव पाटील, नाना पाटील, शाहीर अमरशेख अशी अनेकांची नावं घेता येतील. या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण केलं. त्यावेळी महाराष्ट्र द्विभाषिक राज्य होणं, याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशंवतराव चव्हाण यांची होती. संयुक्त महाराष्ट्रवाद्यांची, `द्विभाषिक मोडावं व संयुक्त महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये स्वतंत्र व्हावीत,'' ही भूमिका जनमानसात रुजली होती.

१९५७ च्या निवडणुकीत काँगेसचा पराभव झाला. परंतु, संयुक्त महाराष्ट्र समितीला बहुमत मिळालं नाही व प्रतिकूल परिस्थितीत राज्य चालविण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर आली. आम्हा तरूण पिढीचा पाठिंबा संयुक्त महाराष्ट्र समितीसाठी होता. त्यावेळच्या लोकांच्या प्रक्षोभाला अत्यंत सामंजस्याने सामोरे जाण्याची यशवंतरावजींची भूमिका होती. मात्र तत्पूर्वीचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांची भूमिका उद्दामपणाची असायची, म्हणून या पार्श्वभूमीवर यशवंतरावजींचं व्यक्तिमत्व सुसंस्कृत दिसत होतं. संयुक्त महाराष्ट्र व्हावा, असं त्यांना वाटत होतं, तरी पंडित जवाहरलाल नेहरू यांना दुखविण्याची त्यांची तयारी नव्हती. ``महाराष्ट्रापेक्षा नेहरू मला मोठे वाटतात,'' हे चव्हाण साहेबांचं एक वाक्य प्रसिद्ध झालं व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड हल्ले केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी जनतेची असलेली प्रचंड आग्रही भूमिका चव्हाण साहेब जाणून होते. एका बाजूनं द्विभाषी राज्य चालवायचं व दुसर्‍या बाजूनं काँगेसश्रेष्ठींचं मन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वळवायचं, असा कार्यक्रम चव्हाण साहेबांनी हाती घेतला होता. त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधी यांची साथ मिळाली व द्विभाषिक मोडायला मोरारजींचा सक्त विरोध असला, तरी नेहरूंचं मन महाराष्ट्राच्या बाजूला वळवायला यशवंतरावजी यशस्वी झाले. १९६० मध्ये नेहरूंच्या हस्ते राज्यनिर्मितीचा सोहळा मुंबईच्या राजभवनावर पार पडला.

महाराष्ट्र निर्मिती होणार हे लोकांच्या ध्यानात आल्यावर राज्यातील वातावरण सपशेल बदललं व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी घेतलेली चव्हाणांची भूमिका जनतेच्या ध्यानात आली आणि यशवंतरावांबद्दलचे गैरसमज दूर होऊ लागले. त्या काळात मी व माझ्या सहकार्‍यांनी युवक काँगेसच्या माध्यमातून पक्षीय कामाची सुरूवात केली होती. यामध्ये चव्हाण साहेबांबाबतचं आकर्षण व उद्याच्या महाराष्ट्राबाबत त्यांची वैचारिक मांडणी, ही आम्हा सर्वांना आकर्षित करावयास कारणीभूत होती.

६२ च्या निवडणुका झाल्या व चव्हाणांच्या काँगेसमधील नेतृत्वासाठी लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला. त्यानंतर, देशाला चीनच्या आक्रमणाला सामोरं जावं लागलं. चीनी सैन्यानं भारतीय हद्दीत केलेला प्रवेश, भारतीय सेनेची झालेली दारूण अवस्था, यांचा भारतीय जनतेच्या मनावर विपरित परिणाम झाला. संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी असलेले कृष्णमेनन यांच्यावर संसदेत चहूबाजूंनी प्रचंड हल्ले होऊ लागले आणि ते हल्ले नेहरू यांच्यापर्यंत जाऊ लागले. ही परिस्थिती सावरण्यासाठी नेहरूंनी मेनन यांना पदावरून दूर करून चव्हाण यांना दिल्लीत पाचारण केलं व संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सुपूर्द केली. समाधानाची बाब म्हणजे, त्यांनी सूत्रं हाती घेतली व चीननं युद्ध विरामाची घोषणा केली. चीनच्या या निर्णयानं देशात सर्वत्र चव्हाण साहेबांबद्दल आस्था व विश्वासाची भावना वाढू लागली.

मानसिकदृष्ट्या खचलेल्या भारतीय सेनेला उभारी देण्यासाठी सर्व सीमांवर फिरून चव्हाण साहेबांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवायला सुरूवात केली. संरक्षणात्मक आयुधांची उभारणी करण्याबाबत पूर्वी झालेल्या दुर्लक्ष्याचे परिणाम त्यांनी पाहिले व त्यावर लष्करी साधनसामुगी उपलब्ध करून सेनेचा आत्मविश्वास वाढविण्यात यशवंतरावजी यशस्वी झाले. माझ्यासारखे लक्षावधी तरूण त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. अधिक जोमानं त्यांच्या विचारांची काँगेसची नवी पीढी उभी करण्याच्या कामाला आम्ही लोकांनी सुरूवात केली.

मला आठवतंय की पुण्याच्या मी शिकत असलेल्या महाविद्यालयात आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. त्या प्रसंगी स्वागताची जबाबदारी माझ्यावर होती. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी अगत्यानं माझी विचारपूस केली. महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र जाणून घेण्याची त्यांची इच्छा असायची. माझं नाव, गाव विचारून घेतल्यावर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी लगेच त्यांच्या लक्षात आली व तरूणांमध्ये काम करण्याच्या माझ्या भूमिकेबाबत त्यांनी मला बरंच प्रोत्साहित केलं. नंतरच्या काळात त्यांची कुठेही सभा, कार्यकम असला, की आम्ही लोक मोठय़ा आनंदानं तिथं उपस्थित असायचो.

दिल्लीमध्ये त्यांचं स्थान व प्रतिष्ठा वाढती राहिली. भुवनेश्वरच्या काँग्रेस अधिवेशनात नेहरूजींची प्रकृती अचानक बिघडली व त्यानंतर २७ मे १९६४ रोजी त्यांचं निधन झालं. नेहरूंजीच्या पदावर लालबहादूर शास्त्री यांची नियुक्ती झाली. त्याही मंत्रिमंडळात संरक्षणपदाची जबाबदारी चव्हाण साहेबांवर आली. यशवंतरावजींनी त्या मर्यादित कालखंडात सैन्याचा आत्मविश्वास वाढविल्याने ते यशस्वी झाले होते. आधुनिक हत्यारांची असलेली कमतरता त्यांनी दूर केली होती. त्याची प्रचीती, त्याच काळात पाकिस्तानने भारताविरूद्ध केलेली आगळीक व त्यास सेनेने भक्कमपणे शिकविलेला धडा, यातून आली.

संपूर्ण भारतीय जनतेचा आत्मविश्वास वाढला व यशवंतरावजींबद्दल गौरवाची व अभिमानाची भावना जनमानसात निर्माण झाली. भारत- पाक युद्धात पाकिस्तानची झालेली स्थिती लक्षात घेऊन हा संघर्ष वाढू नये, या भावनेनं भारताचा मित्र सोव्हिएत रशियानं दोन्ही देशांच्या प्रमुखांना समन्वयासाठी ताश्कंद येथे आमंत्रित केलं. तिथं करार-मदार झाले. त्या करारात पाकिस्तानची घेतलेली भूमी व पकडलेलं सैन्य सोडण्याचा निर्णय घेतल्यानं त्याची प्रतिक्रिया भारतात उमटायला लागली. त्याचवेळी झालेल्या शास्त्रीजींच्या निधनाची बातमी वज्रघातासारखी भारतात पसरली. त्यांच्याबरोबर असलेले यशवंतराव दिल्लीस परतले, ते शास्त्रींचा मृतदेह घेऊन.

पुन्हा पंतप्रधानपद रिकामं झाल्यावर त्या पदासाठी नेतृत्वात चर्चा सुरू झाली. काँगेस कार्यकारिणी व संसदीय मंडळात नेतृत्वाचा मोठा वर्ग चव्हाण यांनी ती जबाबदारी घ्यावी, या मताचा होता. तसं त्यांना सुचविलं गेलं. परंतु, याबाबत स्वत: निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी काँगेस अध्यक्ष इंदिराजींच्या मदतीचं स्मरण त्यांनी ठेवलं व इंदिराजींशी चर्चा केली. इंदिराजींची स्वत: पंतप्रधान बनण्याची इच्छा असेल, तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली असावी. त्यानंतर इंदिराजींचं नाव पक्षानं सुचविलं व त्या पंतप्रधान झाल्या.

या सर्व काळात तरूणांमध्ये काम करण्यास मला चव्हाण साहेबांकडून सतत प्रोत्साहन मिळत होतं. संपूर्ण राज्यातील युवकांची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली. यशवंतरावजींचं मार्गदर्शन मिळू लागलं. त्यांच्याशी जवळून सुसंवाद साधण्याची संधी मला मिळाली. माझ्या मते, माझ्या व्यक्तित्वात, राजकीय प्रगतीमध्ये चव्हाण साहेबांचा सहवास, प्रोत्साहन हे अत्यंत उपयुक्त ठरलं.

महाराष्ट्रात संघटनेच्या वाढीसाठी युवक काँगेसच्या मोठय़ा कार्यकमात चव्हाण साहेबांची उपस्थिती प्रकर्षानं असायची. माझा मुक्कामही मुंबईतील प्रदेश काँगेसच्या टिळक भवनात असायचा. तिथला काही वर्षांचा निवारा, हा राज्यातल्या काँगेसजनांशी व विविध घटकांशी सुसंवाद साधण्यास अतिशय उपयुक्त ठरला.

१९६६ च्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या. मी अर्ज करावा, असं माझ्या सहकार्‍यांनी सुचविलं. माझीही इच्छा होती. पण पुणे जिह्यातील ज्येष्ठ काँगेसजनांचं मला मुळीच समर्थन नव्हतं. मी अर्ज केलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडीची चर्चा झाली, त्यावेळी सर्व ज्येष्ठ काँग्रेसजनांनी, `माझ्यात निवडून येण्याची क्षमता नाही,' असं अत्यंत आग्रहानं मांडलं. या बैठकीस उपस्थित असलेल्या चव्हाण साहेबांनी विरोध करणार्‍या ज्येष्ठ काँग्रेसजनांना सहजच प्रश्न विचारले,की निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, निवडणुकीनंतर राज्यात काय चित्र असेल? कुणी २८८ पैकी २०० जागा मिळतील, तर कुणी त्यापेक्षा कमी-जास्त मिळतील, अशी उत्तरे दिली. त्यावेळी चव्हाण साहेबांनी त्यांना सांगून टाकलं, ``याचा अर्थ साठ, सत्तर मतदारसंघात आपला पराभव होणार अशी स्थिती दिसते, असा तुमचा अंदाज आहे. त्यामध्ये पराभवासाठी आणखी एका जागेची भर घालू व शरदला संधी देऊ.'' चव्हाण साहेब प्रचारासाठी माझ्या मतदारसंघातदेखील आले. मतदारसंघातील सर्व तरूणांनी निवडणुकीची सूत्रं हाती घेतली होती. त्यावेळी पुणे जिह्यात सर्वात जास्त मतांनी माझा विजय झाला. दुसर्‍या दिवसापासून मी मतदारसंघ व राज्यातल्या संघटनेच्या कामात अधिक कष्ट घेण्यास सुरूवात केली.

हल्ली निर्वाचित झाल्यावर अनेकांना लगेचच मंत्रिपदाची स्वप्न अनेकांना पडतात, तो विचार माझ्या मनातही आला नाही. युवक काँगेसच्या प्रमुखापासून ते संघटनेतील ज्येष्ठांमध्ये काम करण्याची मला संधि मिळाली व महाराष्ट्र काँगेसच्या सरचिटणीसपदी माझी निवड झाली. त्या पाच वर्षात मी विधिमंडळ व संघटनेत अतिशय कार्यप्रवण राहिलो. ७२ ची निवडणूक झाली व मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईकांनी मंत्रिमंडळाची यादी करून ती काँगेस अध्यक्षांना सादर करून तिला मान्यता घेतली. माझं नाव त्यात नव्हतं व मी तशी अपेक्षाही केली नव्हती.पण मला नंतर समजलं की नाईक साहेबांनी इंदिराजींकडून मान्यता करून घेतलेली यादी चव्हाण साहेबांना दाखविली. ती पाहून माझं नाव न दिसता, चव्हाण साहेबांनी इंदिराजींशी दूरध्वनीवर संपर्क साधला व ``नव्या पिढीला संधी देण्यासाठी माझं नाव त्यात असलं पाहिजे,'' असं सांगितलं. त्या सूचनेला इंदिराजींनी मान्यता दिली व माझी राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. मला गृह व सामाजिक प्रशासन या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यात काम करण्याची संधी देण्यात आली.

प्रशासनाचे काम करण्याची ही संधी चव्हाण साहेबांनीच दिली होती. नंतर ते मला सतत प्रोत्साहित करीत होते व संघटनेत नवी पिढी आणली पाहिजे, याकडे लक्ष देत होते. पक्षाच्या बैठकीत एकदा त्यांनी सुचविले हेते, की भाकरी फिरविली पाहिजे. ती फिरविली नाही, तर करपली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात भाकरी करपून द्यायची नाही.

आयुष्यात एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील, की आजपर्यंत माझी जी काही वाटचाल झाली, त्याचा भक्कम पाया हा चव्हाण साहेबांनीच घातला होता.`राजकारणात लोक जोडले पाहिजे, समाजाच्या विविध घटकांशी सुसंवाद ठेवला पाहिजे, साहित्य, संगीत, नाट्य, कला-क्रीडा यांच्याशी जवळीक ठेवली पाहिजे. कितीही मोठय़ा पदावर गेलो, तरी सभ्यता, सुसंस्कृतपण व नम्रता यांचं विस्मरण होता कामा नये. आपल्यापेक्षा ध्येय व अनुभव असलेल्या व्यक्तींपेक्षा आपली राजकीय प्रतिष्ठा अधिक असली, तरी जाणकारांच्या समोर आपण विनम्रच राहिले पाहिजे व अशा व्यक्तिंपासून शिकण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे,' ही भूमिका चव्हाण साहेबांनी आमच्यासमोर सतत मांडली. विविध क्षेत्रातील माणसं जोडण्याचं काम यशवंतरावजींनी केलं, तसंच, ग्रंथांशी सुसंवाद ठेवून वाचन संस्कृतीचं महत्व त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवलं.

मी व माझ्यासारखे अनेक लोक भाग्यवान आहोत, की ज्यांना चव्हाण साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाचा ठेवा प्राप्त झाला. प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळाली, तरी प्रशासनाला एक मानवी चेहरा असलाच पाहिजे व प्रशासकी यंत्रणेला विश्वास देऊन, तिचा विश्वास संपादन केला पाहिजे. समाजात काम करण्याची जी संधी मिळेल, ती प्रशासनात असो, की अन्य क्षेत्रात, त्यापाठी सामान्यजनांचं समर्थन आहे. त्यांच्या हिताच्या जपणुकीचे विचार कायम ध्यानात ठेवले पाहिजे, हा आदर्श चव्हाण साहेबांनीच आम्हापुढे ठेवला.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलायचं झालं, तर १९८० च्या निवडणुकीपूर्वी काँगेसमध्ये विभाजन झालं. इंदिराजींनी `काँगेस (आय)' हा पक्ष स्थापन केला. दुसरीकडे स्वरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँगेसमध्ये आम्ही सारे सामील झालो. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. काँग्रेस (स्वरणसिंग) ला यश मिळविण्यासाठी राज्यात कष्टही घेतले होते. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सातार्‍यातून केवळ यशवंतराव विजयी झाले. निवडणुकीच्या निकालानंतर, ``लोकांनी इंदिराजींच्या काँगेसला स्वीकारलं. हा जनतेचा कौल आपण स्वीकारावा,'' अशी मनस्थिती चव्हाण साहेब मांडू लागले.

मला आठवतं, की ९ मे ला सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व आजचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या घरी चव्हाण साहेबांसमवेत आम्ही सारे जमलो होतो. तिथं काँग्रेस आय मध्ये जाण्याची भूमिका चव्हाण साहेबांनी मांडली. बहुतेकांनी तिचा पुरस्कारही केला. काहींना ती पसंत पडली नाही. तरी ``चव्हाणांबरोबर आम्ही जाणार,'' असं मत अनेकांनी मांडलं. मी मात्र वेगळं मत मांडलं. काँग्रेस आय मध्ये चव्हाण साहेबांसारख्या एका कर्तृत्ववान ज्येष्ठ नेत्याला सन्मानाची वागणूक मिळणार नाही, याबाबतची अस्वस्थता माझ्या मनात होती, म्हणून तिथं जायला माझ्या मनाची अजिबात तयारी नव्हती.

आयुष्यात चव्हाण साहेबांच्या विचारापेक्षा मी वेगळी भूमिका घेतली, याच्या मला प्रचंड यातना झाल्या. तशा माझ्यावर सर्वाधिक प्रेम करणार्‍या यशवंतराजींनाही झाल्या. राज्यामध्ये काँगेस एस चं काम वाढविण्यात आम्ही लोक कष्ट घेऊ लागलो. त्यास जरा कुठं चांगला प्रतिसाद मिळाला, की त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान लपायचं नाही. दिल्लीत गेल्यावर माझं त्यांच्याकडे आवर्जून जाणं असायचं. त्याच काळात वेणुताईंचं निधन झालं, आणि हिमालयाच्या उंचीचा निर्णय घेण्यासाठी सह्याद्रीसारखा भक्कम काळजाचा हा नेता स्वत:ला सावरू शकला नाही. राजकारणातल्या चढउतारांचा सामना त्यांनी नेहमीच केला, पण जन्मभर सर्व परिस्थितीत साथ देणार्‍या वेणुताईंचं गैरहजेरी ते कधीच सहन करू शकले नाही. घरी गेल्यावर ताईंचा विषय निघायचाचं अवकाश, की त्यांचे डोळे डबडबलेले असायचे.

शब्दांकन : विजय नाईक

No comments:

Post a Comment