Thursday, March 29, 2012

बचपन हर गम से बेगाना होता है ।


गीत गाता चल या चित्रपटातील उपरोक्त गीताचा प्रयत्य आज विधानभवनात आला.
प्रसंग होता विधान भवन परिसरातील…

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अत्यंत प्रसन्न मूड मध्ये विधानभवन प्रांगणात उपस्थित होते. शालेय गणवेशातील ८ वी , ९ वी ची मुले, मुली आपल्या राज्याच्या सर्वोच्च कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी विधान सभेच्या गॅलरीत उपस्थित होती. गॅलरीत बसून खाली सभेचे कामकाज पाहत असताना त्यांच्या नजरा मा. अध्यक्ष , मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तसेच आपल्या भागातील लाडके आमदार विधानसभेत कोठे बसले आहेत ते शोधत होते. चाललेले कामकाज, प्रश्नोत्तरे आणि मा. अध्यक्षांची हेडमास्तरसारखी शिस्त या सगळया बाबी गंभीर चेहऱ्यांनी ही शाळकरी मुले पाहत होती. वर्गात अगदी परिक्षेच्या दालनात देखील शांत न बसणारी ही मुले अत्यंत शांततेने एकदम चिडीचूप होऊन विधानसभेचे कामकाज मोठया उत्सुकतेने पाहून त्याचे आकलन करत होते.

मात्र खरी मजा आणि गंमत त्यानंतर आली आणि पाहता पाहता या विद्यार्थ्यांच्या गंभीर चेहऱ्याचे रुपांतर त्याच्या स्थायी स्वभावानुसार हसऱ्या चेहऱ्यात झाले. विक्रोळीच्या संदेश विद्यालयाची ही मुले विधानसभेच्या विद्यार्थी गॅलरीतून बाहेर पडून शिस्तीत म्हणजे रांगेत विधानभवनाच्या प्रांगणात आली. विधानसभेच्या गंभीर वातावरणातून एकदम मोकळया मैदानात आल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. या विधानसभा भेटीची उत्सुकता तर संपली होती मात्र या भेटीच्या स्मृती कायम जपण्यासाठी या परिसरात सामूहिक फोटो काढणे बाकी होते. आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या आमदारांनी गोड भेट देतो असे सांगितले होते. त्या भेटीची उत्सुकतादेखील बाकी होती. फोटो सेशनसाठी सर्व मुले, मुली ग्रुप- ग्रुपने जमून फोटो काढू लागली. तोच त्यांचे आमदार राम कदम नामदार छगन भुजबळांना सोबत घेऊन आले. चेक्सचे ब्लेझर आणि त्यावर गळयाभोवती गुंडाळलेली मफलर अशा स्मार्ट वेशभूषेतील भुजबळांना पाहून मुलांना प्रचंड आनंद झाला. एरव्ही एखाद्या कार्यक्रमात वा समारंभात कमीत कमी १०० फूटांपेक्षाही लांब असलेले आपले आवडते नेते प्रत्यक्ष एका बोटाच्या अंतरावर पाहून त्या मुलांना आपला आनंद कसा व्यक्त करावा हे समजेनासे झाले.

एखाद्या आवडत्या व्यक्तीला पाहून आपणांस जो आनंद होतो तसा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोणी विद्यार्थी ऑटोग्राफसाठी तर कोणी सोबत फोटो काढण्यासाठी तर कोणी शेकहॅण्ड करण्यासाठी तर कोणी केवळ स्पर्श करण्यासाठी धडपडत होता. मुख्य म्हणजे मुलांची ही धडपड नामदार छगन भुजबळ साहेब अत्यंत कौतुकाने पाहत होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद जसजसा ओसंडून वाहत होता तसा भुजबळांचा आनंदही वाढत होता. कौतुकाचे भाव द्विगुणीत होत होते. मुलांसोबत रमलेल्या मंत्री महोदयांस पाहून त्यांचा स्टाफ व अंगरक्षक हतबल होऊन थोडेसे बाजूला झाले.

मुलांनी मनसोक्तपणे आपल्या आवडत्या नेत्यासोबत व लाडक्या आमदारासोबत फोटो सेशन केले. मंत्री महोदयांनी देखील मुलांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या मुलांमध्ये मंत्री महोदयांना उदयाचे भावी जबाबदार नागरिक निश्चितच दिसले असतील. पण त्याही पेक्षा त्यांची मुलं, पुतण्या पंकज,समीर वा नातवंड दिसली असतील. म्हणूनच कडक शिस्तीचे, धडाडी, धाडसी असे भुजबळ साहेब या मुलांसोबत एका पित्याच्या व पालकाच्या भूमिकेत विधानभवनाच्या प्रांगणात रमले होते.

राजू पाटोदकर

No comments:

Post a Comment