Thursday, March 1, 2012

कोकणात रबर लागवड .

रविवारची सकाळ. क्षेत्रीय रबर विकास अधिकारी एस के कुडाळकर यांचा फोन आला. साहेब, वेळ असेल तर रबर लागवड पाहू या.. मी तात्काळ होकार दिला. वाहन चालक वेंगुर्लेकर तयारच होते. कॅमेरामन जगताप तयारनिशी गाडीत बसले. गाडी दोडामार्गच्या दिशेने धावू लागली. वाटेत केरळी व्यापाऱ्याकडून अननस ज्यूसचा आस्वाद घेतला. बोचरी थंडी सोबत करीत होती.

सिंधुदुर्गची नैसर्गिक स्थिती आणि हवामान रबर लागवडीला उपयुक्त अशीच आहे. खरं तर रबर लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान भरपूर सूर्यप्रकाश, २१ डिग्री ते ३५ डिग्री सेल्सीअस पर्यंतचे तापमान, ७५ टक्के हवेत आर्द्रता, निचरा होणारी ४ ते ५फूट खोली असलेली लालमाती आणि साधारपणे २ ते ३ हजार मि.मि. पाऊस असला तरी रबर सहज लावता येऊ शकते. अकरा वाजेच्या सुमारास फादर बिबीन जोसेफ यांच्या दिप्ती प्लॅन्टेशन रबर लागवडीच्या शेतीत पोहचलो. प्रथमच रबर लागवड पहात असल्याने प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची प्रक्रिया सुरु होती. मधूनच प्रश्न विचारल्यावर श्री. कुडाळकर माहिती सांगत होते. रबराच्या उंच झाडांमध्ये खाली अंतरपिक दिसत होतं. केळी, अननस, भाजीपाला सारखे आंतरपिक रबर लागवडीपासून तीन वर्षापर्यंत सहज घेता येतं. खरं तर मातीची धूप थांबविणे खूप महत्वाचं असतं. म्हणूनच प्यरेनिया आणि म्युकूना या वेलवर्गीय पीकांची लागवड केलेली दिसली. खोडाला चुना आणि जमिनीत ओल रहावी यासाठी आच्छादन पूर्ण केललं होतं. रबराला पावसाळ्यानंतर किमान चार वर्षाचं झाड होईपर्यंत पाणी द्याव लागतं.

कुडाळकरांनी प्रत्यक्ष रबर कसं केलं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली. रबराच्या झाडाची गोलाई ७ वर्षात ५० से.मी. म्हणजे बुंध्यापासून १२५ से.मी. उंचीवर झालेली होती. सकाळी आडवी चिर करून चिक जमा केला जातो. चिकापासून रबराचे शिट तयार केले जातात. त्याच्यापासून फुगे, ग्लोज, रबर, बॅन्ड तयार होतो. सरासरी १ हेक्टर मध्ये १७०० किलो सुका रबर मिळतो. प्रत्यक्ष रबराचं शिट तयार झालं होतं. जेवणाची वेळ झाली. केरळी पध्दतीचं शाकाहारी जेवण मस्तचं होतं. केळीही भरपूर खाल्ली.. ऊन जाणवत होतं. बागेतून फिरतांना साबुदाणा लागवडीचा प्लॉट पाहिला.

कोकणात आंबा, काजू, कोकमसाठी सर्वच शेतकरी शेती करतात. रबराला आवश्यक असणारे हवामान असतांना मात्र फारसे स्वारस्य जिल्ह्यातील शेतकरी दाखवित नाही. तर पुढील २५ वर्षात रबराचे उत्पादन सहजपणे घेता येते. त्यासाठी वेगळ्या मशागतीची आवश्यकता नाही. उत्पादनाची हमखास खात्री आणि हमखास बाजारपेठ यामुळे शेतकऱ्यांनी याकडे वळण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक रबरापासून अनेक प्रकारची उत्पादन तयार केली जातात. औद्योगिक वापरासाठी रबराची मोठी गरज यामुळे पुर्ण होवू शकेल.


रबर लागवड काजू आणि आंब्यापेक्षा खूप फायदेशीर आहे. पडिक जमिनीचा उत्तर वापर होऊ शकतो. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी रबर लागवड उत्तमच. रबर खेरीज लाकूड, तेल, मध यांचे उत्पादन घेता येऊ शकते. रबर लागवडीमध्ये केळी, अननस, भाजीपाला सारखे ३ वर्षापर्यंत आंतरपीक घेता येते. या पीकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ७ वर्षापासून पुढे २५ वर्षे रबर उत्पादन घेता येवू शकते. शेतकरी यासाठी रबर बोर्डा कडून अर्थसहाय्यासाठी मागणी करु शकतात. प्रति हेक्टरी ३० हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. कुंपनासाठी १२,५००/- प्रति हेक्टर व पाण्यासाठी ३००० रुपये प्रति हेक्टर आर्थिक सहाय्य मिळू शकतं क्षेत्रीय अधिकारी रबर बोर्ड, दोडामार्ग येथे संपर्क साधाला तर अधिक माहिती घेता येऊ शकते. एव्हाना चार वाजत आले होते. रबर शेतीचा अनोखा फायदेशिर प्रयोग पाहून रविवार चांगला गेल्याचं समाधान वाटत होतं. गाडी परतीच्या दिशेने सुरु झाली होती.

  • डॉ. गणेश मुळे
  • No comments:

    Post a Comment