Tuesday, March 20, 2012

'ते' दोन दिवस...

संपूर्ण देशभरात 'व्हिजन २०२०' बददल जागृती निर्माण करण्याबरोबरच विदयार्थ्यांना देशप्रेम अन सर्वधर्म, भाषा समभावाचे धडे देणारे 'वर्तमानातील ऋषी' भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नुकतेच सोलापूर जिल्हयाच्या दोन दिवसाच्या दौ-यावर आले होते. माजी राष्ट्रपती या पदाचा कुठेही बडेजाव न मिरवता ते विद्यार्थ्यांमध्ये इतक्या सहजतेने मिसळले की जशी दुधात साखर विरघळावी. 

थोरा मोठयांना काही सांगण्यापेक्षा, जी पिढी नवा भारत घडविणार आहे. त्याच पिढीला मोठी स्वप्ने दाखविणे, त्याच्यांत आत्मविश्वास निर्माण करणे आणि बलशाली भारत घडविणे हे ध्येय उराशी बाळगून वयाच्या ८१ व्या वर्षातही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संपूर्ण देशभर दौरे करीत आहेत. त्यांच्या व्याख्यानात टार्गेट असते ती फक्त युवा पिढी. या युवापिढीला आपला अधिक वेळ मिळावा यासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात. याला सोलापूरचा दौराही अपवाद नव्हता.

'सुयश गुरुकुल' या शाळेचा संपूर्ण राज्यभर आदराने उल्लेख होतो. या शाळेला भेट देण्यासाठी डॉ. कलाम यांचे आगमन होताच संपूर्ण माहोल 'कलाममय' झाला. तिथे उपस्थित असणा-या प्रत्येकाच्या चेह-यावरुन आनंद अक्षरश: ओसंडून वाहत होता. या गुरुकुलात येणारा प्रत्येक जण हा डॉ. कलाम यांना पाहण्यासाठी नाही तर ऐकण्यासाठी आल्याची साक्ष या जनसागराला पाहुन मनोमन पटत होती. 

इथे उपस्थित असणाचा प्रत्येक विद्यार्थ्यांशी 'फेस टु फेस' संवाद व्हावा यासाठी डॉ. कलाम आग्रही होते. या कार्यक्रमामध्ये भविष्याचा वेध घेणा-या विद्यार्थांच्या प्रश्नांना डॉ. कलाम यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्याचबरोबर व्यक्तिगत चारित्र्य, देशबांधणी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला तसेच मुलांना ज्ञानाचे सूत्र सांगताना, ज्ञान म्हणजे सृजनशीलता, हृदयाचा सच्चेपणा आणि धैर्य यांची बेरीज म्हणजे खरे ज्ञान होय. असे ते म्हणाले. त्यांच्या या सुत्राचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर अंमल करावा असे आवाहनही करण्यास ते विसरले नाहीत.

या दोन दिवशीय दौ-याचा शेवट करताना त्यांनी मातृसत्ताक पध्दतीचे महत्व सांगितले. या दोन दिवसात आदरणीय कलाम चाचांचे वय '८१' न जाणवता '१८' जाणवत होते आणि हेच डॉ. कलाम यांच्या दौ-याचे वैशिष्ठ होते.

या मंतरलेल्या दोन दिवसांनी सोलापूरच्या तरुणाईला एक नक्कीच वेगळी दिशा दाखविली यात शंका नाही. या तरुणाईचा एक प्रतिनिधी होण्याची मलाही संधी मिळाली..... मी या मंतरलेल्या दोन दिवसांचा ऋणी आहे.....

  • फारुख बागवान
  • No comments:

    Post a Comment