Friday, March 30, 2012

मागोवा स्त्रीच्या जगण्याचा

नुकत्याच झालेल्या आठ मार्चच्या निमित्ताने स्त्रीजीवनाला भिडणारं, तिच्या जगण्याचा वेध घेणारं लेखन मांडावं असं मनात आलं. स्त्रीजीवनाबद्दल, स्त्रीचळवळीबद्दल तशी बरीच पुस्तकं आजवर लिहिली गेलीत. बाईच्या जगण्याचे प्रश्न मांडणारं लेखन या पुस्तकांनी समोर आणलं आहे. पण थेट स्त्रीच्या आजवरच्या जगण्याशी संबंधित असलेलं एक पुस्तक म्हणजे ‘स्त्रीपर्व’. मंगला सामंत यांनी लिहिलेल हे पुस्तक प्रकाशित केलं आहे ते पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने. आदिम स्त्रीपासून ते थेट आजच्या सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या ग्लॅमरस स्त्रीपर्यंतचे स्त्रीच्या आयुष्यातले विविध पदर यात त्यांनी उलगडून दाखवले आहेत. स्त्रीचा, स्त्रीमुक्तीचा इतिहास शोधून काढण्याच्या प्रेरणेने त्यांनी केलेलं हे लेखन आहे.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि विवेचक पद्धतीने केलेल्या या लिखाणात मानवी उत्क्रांतीतील मातृवंशीय व्यवस्थेपासून लेखिकेने सुरुवात केली आहे. त्यानंतर विवाहसंस्था, पुरुषप्रधानता, पुरुषवादी सुधारणा ते स्त्रीमुक्तीच्या वेगवेगळ्या चळवळी असा विस्तृत पट मनात धरून पुस्तकाची आखणी केली आहे. स्त्रीजीवनाच्या या वाटचालीत लेखिकेने एकूणच मनावी जीवनातले टप्पे व बदल टिपले आहेत.

निसर्गाशी जवळकीच्या नात्याने जोडली गेलेली मानवी संस्कृती सुरुवातीला मातृवंशाच्या प्रभावाखाली होती. वंशाचा विस्तार करण्याचं काम हे तेव्हा सर्वस्वी स्त्रीच्या निर्णयावर अवलंबून होतं. तिच्या कर्तृत्वावरच मानवी जीवन फुलत होतं. स्त्रीप्रधानता ही त्यातली अपरिहार्य बाब होती. मुळात निसर्गामध्ये ‘पिता’ ही संकल्पना नाही. तिथे माता हीच आपल्या अपत्याच्या अस्तित्वाची खूण आहे. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे मानवातही तेच तत्त्व स्वाभाविकपणे जोपासलं गेलं. पण पुढे नांगराचा शोध लागला, क्षेत्र-बीजाचं तत्त्व उघड झालं आणि पुरुषाच्या हातात नांगराच्या रूपाने सारी सत्ताच गेली. या सर्व वाटचालीचं चिकित्सक विवेचन लेखिकेने सुरुवातीच्या प्रकरणांमधून केलं आहे.

स्त्रीजीवनाच्या वाटचालीतले अनेक टप्पे, वेगवेगळे स्तर तिने पुस्तकाच्या ओघात समोर आणले आहेत. विवाहसंस्थेमागील उद्देश आणि त्यामागची कारणं, जीवनाकडे बघण्याची स्त्री-पुरुषांची विभिन्न नजर याबरोबरच लेखिका साहित्यादि कलांमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या पुरुषकेंद्री दृष्टिकोनाबद्दलही मांडणी करताना दिसते. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे भोगवाद वाढला आणि लैंगिकतेपासून ते उत्पादनं व सांस्कृतिक बाबींपर्यंत भोगवादाची पाळंमुळं पसरलेली दिसतात ती याचमुळे. पंडिता रमाबाई, रखमाबाई, कर्वे, आगरकर अशांच्या स्त्रीमुक्तीला प्रेरक व पूरक कार्याचा यथोचित उल्लेखही या पुस्तकात आहे. कायदा, सामाजिक सुरक्षितता अशाही विषयांबद्दलचं विवेचन लेखिका करते. रूढ नैतिक चौकटींपलीकडची स्त्रीमुक्ती लेखिकेला अपेक्षित आहे. पण म्हणूनच यातली लेखिकेची मतं अनेकांना वादग्रस्त वाटू शकतील.

स्त्रीच्या नजरेने स्त्रियांकडे पाहा आणि शेवटी मनातली माणूसपणाची नजर कधीही मिटून घेऊ नका, हाच या पुस्तकाचा गाभ्याचा संदेश आहे. स्त्री जीवनाचा शतकांचा प्रवास मांडणं हे एक आव्हानच होतं आणि ते पेलताना मंगला सामंत यांनी सतत निरोगी दृष्टी बाळगलेली दिसते. स्त्रीबद्दल, तिच्या धारणांबद्दल मनमोकळं विवेचन करणारं हे लेखन म्हणून तर महत्त्वाचं आहे. आजच्या स्त्रीसमोर धरलेला हा एक आरसाच आहे.

नंदिनी आत्मसिध्द

No comments:

Post a Comment