Tuesday, March 20, 2012

मध विक्री व्यवसायातून महिलांचे सक्षमीकरण मध विक्री व्यवसायातून महिलांचे सक्षमीकरण


बचतीचे महत्व लक्षात येऊन प्रगती साधता यावी यासाठी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. महिला बचत गटाच्या माध्यमातून बचतीसोबतच स्वयंरोजगारही सुरु केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण ७८ टक्के असून ६५ टक्के आदिवासी समाज आहे. आदिवासी समाज हा मुखत्वे जंगलावर आधारित उपजीविकेवर अवलंबून असला तरी शेती हा देखील येथील प्रमुख व्यवसाय आहे. याच्या जोडीलाच जिल्ह्यात मधुमक्षिका पालन हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जातो.

अतिदुर्गम व मागासलेला भाग म्हणून जिल्ह्यातील पेरीमिली या गावाची ओळख आहे. मध हा औषधी गुणधर्म असलेला पदार्थ असल्याने त्याला प्रचंड मागणी आहे. यासाठी प्रथम मधुमक्षिका पालन व्यवसायाबद्दल रहिवाशांना तांत्रिक माहिती व्हावी याकरिता ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर, वर्धा यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. याच संस्थेकडून मधुमक्षिका पालनाकरिता लागणारे साहित्य खरेदी केले. या व्यवसायासाठी तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत ८०,००० रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. हा व्यवसाय करण्याकरिता या गावातील संतोषी माँ आणि जीवनज्योती महिला बचत गटातील एकूण २४ महिलांनी पुढाकार घेतला.

सुरुवातीला पेट्यांमधील मधमाशा उडून गेल्या परंतु महिलांनी धीर सोडला नाही. त्यातील एक पेटी यशस्वी झालेली होती. एका पेटीपासून दुसरी पेटी तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना मिळालेले असल्याने त्यांनी एका पेटीपासून दुसरी अशा प्रकारे एकूण १५ पेट्या यशस्वी केल्या. त्यानंतर महिलांना पॅकेजिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.

सध्या त्यांनी २०,००० रूपयाचे मध विकले असून त्यांच्याकडे ४०,००० रुपयांचे मध उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सदर बाबीची दखल लोकमत वृत्तपत्राने घेतली व महिलांची जाहिरात वृत्तपत्रात आल्याने महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. विविध ठिकाणाहून मधाची मागणी येत असून तीन गावातील ९५ महिला सदर व्यवसाय करण्यासाठी तयार झाल्या. १८ जिल्ह्यातील ८० सहयोगीनी यांनी सदर व्यवसायाची स्तुती केली. या गटाने बांधलेल्या घरात मध प्रक्रिया युनिट सुरू आहे. मधुमक्षिका पालन करुन संकलन केलेले मध बाजारात विकण्याचे काम महिला करत आहेत. त्यामुळेच महिलांना रोजगारही मिळाला आहे.

No comments:

Post a Comment