Friday, March 2, 2012

संस्कृती लोकोत्सव

निसर्ग सौदर्याने बहरलेला समृध्द वनसंपदांनी नटलेल्या सातपूडा पर्वत रांगांच्या कुषीत वसलेल्या विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या चिखलदरा पर्यटन नगरीत प्रथमच संस्कृती जपणारा लोकोत्सव घेण्यात आला. या लोकोत्सव २०१२ मध्ये लोकसंस्कृतीचा मृदगंध दरवळल्याचा आस्वाद पर्यटक तथा स्थानिक नागरीकांनी घेतला.ऐतिहासिक पार्श्वभूमी तथा पौराणिक महत्व असलेल्या भगवान श्रीकृष्ण रूख्मिनी पदस्पर्शाने पावन असलेल्या चिखलदरा पयर्टन नगरीत प्रथमच सांस्कृतीक कार्य संचालनालय मुबई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी अमरावती यांच्या सहकार्याने संस्कृती जपणारा लोकोत्सव २०१२ हा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. तीन दिवस चाललेल्या लोकोत्सव २०१२ मध्ये सुगम संगीत, लावणी, कवीसंमेलन, आदीवासी नृत्य व शास्त्रीय नृत्य, गोंधळ आदी रंगारंग कार्यक्रमाची मेजवाणी पर्यटकासह चिखलदरावासीयांनाही मिळाली. 

जशी राणातली झाडेझूडपी वृक्षवेली साऱ्याच स्वाभाविकपणे आणि सहजतेने वाढतात, बहरतात आनंद देतात जगतात हाच अनूभव संपूर्ण मानवजातीला लोकसंस्कृती आणि लोकोत्सवात अनुभवायला मिळतों. आज विज्ञानाच्या युगात लोककलेचा ऱ्हास होत असतांना दुसरीकडे राज्य शासनाचे सांस्कृतीक कार्य संचालनालाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककल्याण व लोकसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करीत आहे. असेच काहीसे कार्य याविभागाने विदर्भातही केले आहे. राज्यातील विविध लोककलेचा प्रचार व प्रसार करून कला व संस्कृती जोपासण्याचे कार्य सांस्कृतीक कार्य संचालनालय करीत असून लोकोत्सव २०१२ चिखलदऱ्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम ठरेल. 

पहिल्या दिवशी सारेगम अविष्कार संगीत आकादमी नागपूर यांनी सुगम संगीताचा दर्जेदार कार्यक्रम सादर करून सारेगम फेम अनिरूध्द जोशी यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सोलापूर जिल्हृयातील बार्शी येथील अंबीका संजीवनी लखनगावकर यांनी लावणीच्या बहारदार नृत्याने पर्यटकांना मनमोहीत केले. प्रेक्षकांनी गुलाबी थंडीतही भरभरून प्रतिसाद देत लावणीचा आस्वाद घेतला. दुसऱ्‍या दिवशी बोचऱ्या थंडीत हास्य कविची मैफिल रंगली यात हास्य सम्राट डॉ. मिर्झा बेग, कली राजा धर्माधिकारी, प्रा. निरज व्यास, शंकर बुंदले, डॉ. मंगेश वनसोड, प्रा. मनोज बोरगांवकर इत्यादी कविंचा सहभाग होता. 

महाराष्ट्रात गाजलेले परभणीचे गोंधळी राधाकृष्ण कदम यांच्या गोंधळाने चिखलदराही गाजवले. तुळजापूरची आई गोंधळाला आली, चंद्रकांत दारी उभा वेडा आहे, मल्हारी या सारख्या भक्तिरसाने ओथंबलेल्या आणि भावनेने हृदय जिकणाऱ्या निखळ आनंद देणाऱ्या मनोरंजक मोठया पर्यटकांना गदगद करायच्या इतकेच नव्हे तर भक्ती ही लोकजीवनाच्या नसानसात भिनलेली आहे. त्यातही स्त्रिया परंपररेला जपणाऱ्या कोणत्याही प्रकारचे संकट घरादारावर येवू नये म्हणून श्रध्देने परमेश्वराची पूजा करणाऱ्या स्त्रीचे महत्व पटवून देत गोंघळातून राधाविलास सादर केला. तसेच नागपूर येथील किशोर नृत्य निकेतन यांनी भारतीय संगीताच्या तालावर भरतनाटयम शास्त्रीय नृत्य प्रकारातील वेगवेगळे प्रकार सादर केले. त्यामध्ये गणेश वंदना, शिवस्तूती, वंदेमातमरम, श्रीरामचंद्र कपाळ यांचा समावेश आहे. 

भारतीय लोकनृत्यामध्ये राजस्थानी लोकनृत्य, कालबिलीया, चिरमी, आसामचे लोकनृत्य बिहू, सिक्कीमचे लोकनृत्य, गंटू, हरियानाचे लोकनृत्य, हरियानबी या लोकनृत्याचा अनुभव पर्यटकांनी चिखलदऱ्यात प्रथमच अनुभवला. शेवटी लोकोत्सव २०१२ चा समारोप हा सोलापूरच्या मोडबिंब येथील लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर यांच्या लावणीने झाला. हजारो प्रेक्षकांच्या समोर आपल्यातील दिलखेचक अदांनी पर्यटकांना रिझवले. आणि पर्यटकासह प्रेक्षकांची भरभरून दाद मिळविली.

एकंदरीत गांव संस्कृती जगणाऱ्या आणि जपणाऱ्या साध्यासुध्या माणसाच्या भावभावना आणि जगण्याच्या रीतीरिवाजातून चिखलदरावासीयांना ३ दिवसात लोकोत्सव २०१२ मध्ये लोकसंस्कृतीचा मृदगंध दरवळल्याचा अनुभव मिळाला सांस्कृतीक संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने हा लोकोत्सव दरवर्षी साजरा होऊन प्रत्येक वर्षी लोकोत्सवाचा मृदगंध दरवळत राहो असे चिखलदरावासींयाना वाटत आहे. सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक नीलेश धुमाळ यांनी परिश्रम केले. 

  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment