Thursday, March 29, 2012

विकासाचे गाव पिंपळखुटा

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा तालुका तसा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील मोलगीपासून २१ कि.मी. अंतरावरील पिंपळखुटा गावाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा कायापालट घडवून आणला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या गावात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतअंतर्गत एक कोटी ३ लाख रुपयांची कामे सेल्फवर घेण्यात आली आहेत. या गावात होत असलेली विकासकामे पाहून जिल्हाधिकारी डॉ.ए.टी.कुंभार यांनी देखील या गावास भेट देऊन कौतुक केले आहे.

पिंपळखुटाची लोकसंख्या ७ हजार १४० आहे. पिंपळखुटा, बर्डी, वेहगी, जुगलखेत, खुडसबार, सुरगस, बरी सुरगस या पाड्यांचा यामध्ये समावेश आहे. पिंपळखुटा गावच्या सरपंच निर्मलाताई सितारात राऊत सुशिक्षित महिला असून उपसरपंच दिलवर पाडवी तर ग्रामसेवक म्हणून रोहिदास दगा पवार कार्यरत आहेत. दुर्गम भागातील गावामध्ये काम करण्यास कर्मचारी सहसा तयार होत नसतात परंतु पवार मात्र दुर्गम भागात आदिवासी भाषेत शासनाच्या विविध योजना आदिवासी बांधवाना समजावून देत आहेत.

या परिसरात वृक्ष लागवड व्हावी म्हणून दोन रोपवाटिका तयार करुन त्यात दीड लाख वृक्ष लागवड केली आहे. दोन गाव तलाव बांधले असून याद्वारे या परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने बागायती शेती निर्माण झाली आहे. दहा वैयक्तिक विहिरी या परिसरात खोदण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये यशस्वीरित्या कामे पूर्ण झाली आहेत. गावात सतत आनंदी व सलोख्याचे वातावरण असल्याने गाव तंटामुक्तही झाले आहे.

गावाच्या विकासासाठी व गावातील लोकांना सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव वळवी विशेष लक्ष देतात. पिंपळखुटा हे सातपुड्यातील शेवटच्या टप्यातील गाव असून काही अंतरावर नदी वाहते. गावाच्या आजुबाजूला डोंगर तसेच सर्वत्र हिरवेगार जंगल आहे. या जंगलामध्ये राष्ट्रीय पक्षी मोराचेही वास्तव्य आहे. त्यांना कुणीही त्रास देत नाही हे ही विशेष. शहरी भागातील नागरिक या भागात आल्यास निसर्गरम्य चित्र पाहून भारावून जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला थेट मुक्कामीच भेट दिली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ.कुंभार यांनीही आदिवासी वाद्याच्या तालावर ताल धरला होता. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन जेवढा आनंद मला मिळाला तेव्हढा आनंद या भागात भेट दिल्यानंतर मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून येथील विकासामध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले.


  • मेघश्याम महाले

  • No comments:

    Post a Comment