Thursday, March 22, 2012

नवी पहाट

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करून शेती उत्पादन वाढविले आहे. विशेष म्हणजे महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आधुनिक शेतीतंत्राचा वापर करून या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शीर गावच्या महिलांनी भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल तीन लाखावर नेऊन गावातील इतर महिलांना प्रेरित केले आहे.

शीर गावात शिरल्यावर रस्त्याच्या कडेला आज हिरवीगार शेती दिसते. पूर्वी या भागात भातशेतीचा हंगाम संपल्यावर पुरुष मंडळींना किरकोळ भाजीपाला पिकविताना घर चालविण्यासाठी इतर कामांचा शोध घ्यावा लागे. मात्र कृषी विभागामार्फत शेतीशाळा उपक्रम सुरु करण्यात आल्यानंतर परिस्थितीत बदल घडला. विशेष म्हणजे या शेतीशाळेत पुरुषांच्या सोबतीने महिलादेखील सहभागी झाल्याने पावसाळ्यानंतर परिसरातील शेती बहरू लागली. शीर गावातील भाटले आंबेकरवाडी बचतगटाच्या १९ महिलांनी एकत्रित येऊन अवघ्या दोन वर्षातच यशस्वी शेती करून दाखविली.

ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झालेल्या या बचतगटातील महिला भातशेतीचे काम करण्यासाठी जात असत. आपली स्वत:ची शेती करावी म्हणून या महिलांनी गटाच्या माध्यमातून भातशेतीने सुरुवात केली. प्रारंभीच १५ क्विंटल तांदळाचे उत्पादन त्यांनी घेतले. त्यानंतर मिरचीचे उत्पादन घेतले. अशातच कृषी सहायक आर.के.जाधव यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना कलिंगड आणि भाजीपाला उत्पादनाची माहिती दिली. ग्राम विकास अधिकारी बी.बी.पाटील आणि सरपंच शिवराम अंबेकर यांनी देखील महिलांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले.

बचतगटाने २ एकर क्षेत्रात कलिंगड आणि अर्धा एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली. गटाच्या अध्यक्षा अश्विनी अंबेकर आणि सचिव रोहिणी अंबेकर यांनी सोबतच्या १७ सदस्यांसह शेतीचे योग्य नियोजन केले. कृषी विभागामार्फत बियाणे आणि युरीया ब्रिकेट्स पुरविण्यात आले. तसेच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. करारावर जमीन घेऊन या गटाने शेतीची कामे सुरु केली. घरच्या मंडळींनी सहकार्याची भूमिका घेतल्याने या कामात लक्ष घालता आल्याचे महिलांनी सांगितले. शेतीची योग्य देखभाल केल्याने शेतात पीक बहरले आहे. वांगी, घेवडा, मिरची, कोबी, कलिंगड आदी पिकांनी बहरलेल्या या शेतात पिकाची काळजी घेताना या महिला दिसतात.

विशेष म्हणजे भाजीपाला व्यापाऱ्यांना न देता त्याची विक्री महिलाच करतात. गावाबाहेर असलेल्या या शेताच्या कडेला गवताने बनविलेल्या शेडखाली पाच-सहा पलंग रांगेने दिसतात. ते रखवालदारी करणाऱ्या गडी माणसांचे असतील असा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचा समज होतो. मात्र या महिला वानरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी दिवसा अणि रात्रीदेखील आळीपाळीने पहारा देतात. त्यांच्यातला आत्मविश्वास गटाच्या पुढच्या यशाची शाश्वती देणारा आहे. या वर्षी तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता सदस्यांनी बोलून दाखविली.

गटाच्या महिलांचे विक्री व्यवस्थापनदेखील वाखाणण्याजोगे आहे. दररोजच्या मालाच्या सर्व नोंदी, विक्री, कापणी, शेतीकामे अशा सर्व कामांची विभागणी व्यवस्थितरित्या केली जाते. गटाच्या या यशामुळे गावातील बचतगट चळवळीला बळ मिळाले आहे. तसेच इतरही शेतात भाजीपाला दिसू लागला आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने या महिलांनी सुरुवातीलाच प्रगतीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. कलिंगडाच्या भरघोस उत्पादनामुळे मिळणारा आत्मविश्वास त्यांना नव्या पहाटेचे दर्शन घडविणारा आहे.


  • डॉ.किरण मोघे

  • No comments:

    Post a Comment