Friday, October 21, 2011

मिळूनी सार्‍याजणी...

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचतगटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्विकारलेला पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील परटवणे येथील पार्वती महिला बचतगटाच्या सदस्यांची कामगिरी अशाच प्रकारचे महिलांचे यश अधोरेखित करणारी आहे.

या बचत गटाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला फक्त ५ ते ६ महिलांनी एकत्र येवून गट स्थापन करण्याचे ठरविले. गटाच्या अध्यक्षा राजश्री देसाई यांच्या प्रोत्साहनाने व प्रयत्नाने कॅनरा बँकेकडून ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्यांनतर गटाच्या कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कालांतराने वाडीतील महिलांना गटाचे महत्व कळू लागल्यावर आता या गटातील महिलांची संख्या १० पर्यंत वाढली.

दररोज ४ ते ५ तास 'मिळूनी सार्‍याजणी' एकत्रितपणे काम करतात. पापड, मसाले यासाठी लागणारे कच्चे सामान बाजारातून घाऊक स्वरुपात खरेदी केले जाते. मसाल्यासाठी लागणारे पदार्थ उत्तमरितीने वाळविणे, साठवणे आणि त्याची प्रक्रिया झाल्यानंतर विक्री अशा सर्व स्वरुपाची कामे या महिलाच करतात. हळूहळू पॅकींगचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. घरगुती स्वरुपात तयार होणार्‍या पापड, फेण्या, कुरडया, कुळीथ पीठ आदी पदार्थांना देखील त्यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयोगात आणले आहे. परिसरातील गावात आणि शहराच्या ठिकाणी या पदार्थांना चांगली मागणी आहे. कुठल्याच प्रकारचा कमीपणा न वाटू देता प्रसंगी घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री केली जाते. म्हणूनच अधिकाधीक ग्राहकांपर्यंत पोहोचण या महिलांना शक्य झाले आहे.

पावसाळ्यामध्ये पापड, मसाले हा उद्योग करता येत नाही. या कालावधीत रिकामे न राहता अर्थार्जनाची प्रक्रीया सुरुच रहावी यासाठी महिलांनी भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबई येथून एकत्रितपणे भांडय़ांची खरेदी करून ती स्थानिक बाजारात विकली जातात. खरेदी करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा म्हणून रोटेशन पद्धतीने सदस्यांना खरेदीसाठी पाठविले जाते. त्यामुळे सदस्यांना व्यवहार कौशल्याचे चांगले प्रशिक्षण मिळते. गेली सहा वर्षे हा गट अखंडपणे आपले काम करीत असून यामध्ये मिळणार्‍या नफ्यामध्ये गटातील महिला समाधानी आहेत, असे सांगताना श्रीमती देसाई यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बरेच काही सांगून जात होता. बचत गटाच्या कामातून मिळणारं समाधानही त्यात असावं.

जास्त शिक्षण नसले तरी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या संसारासाठी काहीतरी हातभार लावण्याची धडपड या बचतगटाच्या सदस्यांमध्ये दिसून येते. व्यवसायात मिळणारा नफा-तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी, विक्री, उत्पादन ही सर्व कामे या महिला चोखपणे पार पाडतात. दरमहा १५ तारखेला गटाची बैठक होते. या बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या, जमाखर्चाचे हिशोब याविषयी चर्चा केली जाते. दरवषी न चुकता गटातील सर्व महिला एकत्र येवून सण-समारंभ सादर करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा ‍िटकून आहे.

बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरूच ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता खर्‍या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या जोरावर प्राप्त केले आहे, हेही तितकेच खरे!

No comments:

Post a Comment