Monday, October 24, 2011

चला करुया आपण सर्वजण मिळून दिवाळीचा एक संकल्प....थांबुया स्रीभूण हत्या.....!

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आज स्त्रियांची संख्या कमी कमी होत आहे. वंशाला दिवा हवा किंवा उतार वयात आधाराला मुलगाच हवा ! अशा खुळचट कल्पनेतून स्त्रियांचा तिरस्कार करणे उचित ठरणार नाही. माहेर व सासर अशा दोन्ही कुळांचे नाव लौकीक करणारी स्त्री आहे. अशा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी लोकचळवळ आजच्या युवक-युवतींनी पुढाकार घेऊन समाजातील अनिष्ठ प्रथा मोडीत काढल्यानंतरच तुमच्या-आमच्या लेकी वाचतील. मुलींचा योग्य सन्मान करुन मुला-मुलीमधील असमतोल थांबविण्याची माहिती या लेखातून ..

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या शोधात नव नवे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहेत. मानवाचे उत्पादित केलेले तंत्रज्ञान मानवाच्या विकासासाठीच आहे की नाशासाठी आहे? याचा अर्थबोध मानवी समाजात रुजला नसावा. आपला स्वार्थ साधण्यासाठीच त्याचा वापर केला असावा, असे दिसून येते. समाज व्यवस्थेतील पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुष श्रेष्ठ. तर महिला दुय्यम असा समज आणि त्यात हुंडा पध्दती अशा आर्थिक अडचणीत सापडलेली कुटुंबसंस्था यामुळे स्त्रीला आजही कुटूंबात व समाजात दुय्यम वागणूक दिली जाते.

“जगा आणि जगू द्या” हा मानवतावादी धम्म विचार गौतम बुध्दानी सर्वप्रथम मानवासमोर ठेवला. धम्माचा प्रचार प्रसारात धम्म उपासक-उपासिका यांना समतेच्या विचार प्रवाहात आणले. यात दुमत नाही. अशा विचारातूनच स्त्री-पुरुषांना आजच्या लोकशाहीत समतेचा अधिकार मिळाला आहे. कायद्याद्वारे स्त्रीला संरक्षण व सवलती देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा मान-सन्मान आजही मिळत आहे, असे असताना सुध्दा नव्या तंत्रज्ञानामुळे समाजातील खूळ कल्पनेचा बाऊ करुन कुटुंबात मुलगा हाच वंशाचा श्रेष्ठ दिवा असा दृढ समज समाजात असल्याने विकसित झालेले नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्त्रीभ्रूण हत्येला कारणीभूत ठरत आहे.

सामाजिक जाणीवेचा अभाव, सामाजिक बांधिलकीला बट्टा लावून पैसे मिळविण्याचा हव्यास यामुळेच स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. वाढत्या लोकसंख्येत स्त्रियांच्या प्रमाणात घट होत असल्याने मानवी समाजाला एक कलंक आहे. स्त्रीभ्रूण हत्यामुळे मुलाच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी होत आहे. याला वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे होऊन बसलेले आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा श्रेष्ठ, वंशाचा दिवा, कुटुंबाचा वारस अशा ह्या रुढ कल्पकतेला बळी न पडता आजच्या तरुण तरुणीची लोकचळवळ म्हणून स्त्रीभ्रूण हत्येला विरोध दर्शवून स्त्रीभ्रूण हत्या करणारी केंद्र बंद केली पाहिजेत. नवतरुण यांनीच पुढे येऊन स्त्री जीवनाचे महत्व समाजाला पटवून देणे अनिवार्य आहे. त्यातूनच समाजाची वंशाचा दिवा मुलगा ही मानसिकता बदलायला हवी.

प्रत्येक कुटुंबातील मुलगी शिकली तर येणाऱ्या भविष्यात दोन कुटुंबाचे नाव उज्वल करेलच. या शिवाय एक स्त्री समाज व्यवस्थेत लोखंडी साखळी सारखी घट्ट व मजबूत अशी अनेक नाती निर्माण करते. कोणाची तरी सर्वप्रथम मुलगी , नंतर सून, पत्नी, आई, चुलती, मावशी, आत्या, बहीण, आजी असे एक व्यक्ती अनेक नाते निर्मितीबरोबरच कुटुंब संस्था, समाज व्यवस्था एका स्त्रीमुळे निर्माण होते.

मुलाच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूण हत्या करणे हे फारच मोठे पाप आहे. कसली संस्कृती, कसले खूळचट विचार या स्त्रीभ्रूण हत्यामुळे येणाऱ्या पिढीला “आई/माता” कशा मिळणार हा एक मोठा प्रश्न राक्षसी आक्राळविक्राळ रुप धारण करुन पुढे येणारा प्रश्न आहे. हे थांबविण्यासाठी तरुण – तरुणीनी लोकचळवळीतून समाजातील अनिष्ठ प्रथा मोडीत काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यातूनच सोनोग्राफी केंद्राचे खरे रुप लक्षात येईल आणि आपोआप बंदही पडतील. हे एक सामाजिक परिवर्तनाचे महान कार्य आहे. आजची लेक उद्याची आदर्श आई समाज परिवर्तनातून पुढे येणारी स्त्री शक्ती आहे.

हिंदू धर्मात सीता, लक्ष्मी, पार्वती , रुक्मिणी, दुर्गामाता, जगदंबा, सरस्वती, सत्यभामा आदी स्त्री रुपे धारण करणाऱ्या देवतेच्या समोर स्त्री-पुरषवर्ग नतमस्तक होत असल्याचे दैनंदिन चित्र पहातोच. परंतु समाजव्यवस्थेत स्त्रीभ्रूण हत्या करणे समाजात मोठा कलंकच आहे. या मागची कारणमिमांसा शोधून नव तरुणांनी लोक चळवळीच्या माध्यमातून मानसिकता बदलली पाहिजे. ही लोकचळवळ घराघरातून सुरु होऊन तिचा विस्तार मुलगी वाचवा या समग्र क्रांतीत आला पाहिजे.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा महाराष्ट्राला लागला आहे. अनिष्ठ प्रथा झुगारणारे, स्त्री चळवळीला प्राधान्य देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. पुरुष प्रधान कुटूंब व्यवस्थेत हुंडा, लग्न कार्य यासाठी लागणारा खर्च आणि वाढती महागाई अशा मानसिकतेमुळे गर्भलिंग चिकित्सा करण्याचे प्रकार वाढतच आहे.

मुलगाच हवा वंशाला दिवा हवा एवढच कारण नाही तर समाजातील खूळ विचारात दडलेली कुटुंबसंस्था बदलली पाहिजे. लेक वाचविण्यासाठी ग्रामीण शहरी भागातील प्रत्येकांच्या घरा-घरातून लोकसहभागातून मोठी चळवळ उभी रहायला हवी. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आदींचे सक्रिय योगदान लाभणे आवश्यक आहे. आता समाजातील सर्वांनीच चिंतन आणि आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. केवळ कायदे करुन कुठलीही गोष्ट शक्य नाही तर कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजाचा पाठींबा मिळावा लागतो. एखाद्या गोष्टीचे महत्व लोकांना पटविणे त्यांच्या गळी उतरवणे हेही महत्वाचे आहे. स्त्रियांनीही आता स्त्री ही समाज-संस्कृतीची जननी आहे याचे भान ठेऊन स्त्रित्व जगविले पाहिजे.

  • प्रकाश डोईफोडे
  • No comments:

    Post a Comment