Thursday, October 13, 2011

चांदवडी माळरानावर फुलविली आमराई


तीन गावांच्या सरहद्दीवर वसलेले वेलंग (चांदवडी)(पु.) हे वाई तालुक्यातील गाव. येथील सुनंदा पाटणे या प्रगतीशील शेतकरी महिलेने आपल्या स्वत:च्या खडकाळ जमिनीत खडक फोडून आमराईचे स्वप्न साकार केले आहे. श्रीमती पाटणे यांचा आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून हा एक आदर्श प्रयोग म्हणून पंचक्रोशीत ओळखला जावू लागला आहे.

सौ. पाटणे यांचे पती हिंदूराव पाटणे राज्य परिवहन महामंडळाकडे वाहक पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांना शेतीकडे पुरेसा वेळ देता येत नाही. पूर्वीचे हे गाव धोम धरणात गेल्यामुळे जांब, खडकी, मर्ढे या गावांच्या माळावर या प्रकल्पग्रस्तांना वसविण्यात आले आहे. पुनर्वसित मंडळींना थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या गावात शेतजमिनी मिळाल्यामुळे प्रयोगशील शेती करता येत नव्हती. हीच अवस्था सुनंदा पाटणे यांची होती.

वेगवेगळ्या ठिकाणी जमीन मिळाल्यामुळे एकटीने पाहायचे कुठे व शेतीची आवड पूर्ण कशी करायची हा प्रश्न सौ. पाटणे यांना सतावत होता. पण या समस्येवर मात करण्याचा निर्णय त्यांच्या मनाने घेतला आणि घरालगत असणाऱ्या दोन एकर क्षेत्राची शास्त्रोक्त पध्दतीने आंबा लागवडीसाठी त्यांनी निवड केली. शेतात मजुरांच्या सहाय्याने २ एकर क्षेत्रावर १०० खड्डे २०X२० च्या अंतरावर ४ फूट खोल खोदले, खडकाळ क्षेत्र असल्यामुळे माती, झाडांचा पालापाचोळा, बी.एच.सी, थायमेट बुरशीनाशकांनी व शेणखताने खड्डे भरण्यात आले. रत्नागिरी येथून तोतापुरी, राजापुरी हापूस या जातीची रोपे आणून शास्त्रशुध्द पध्दतीने आंबा रोपांची लागवड केली. सौ. पाटणे यांनी आंब्याच्या लागवडीकामी स्वत: व्यक्तीश: लक्ष केंद्रीत केल्याने त्यांना यशही लाभले.

शेतजमीन खडकाळ आणि माळरान असल्याने योग्य मशागतीव्दारे त्यांनी आंब्याची लागवड केली. याकामी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. जमिनीची प्रत हलकी असल्यामुळे ८ दिवसांच्या अंतराने पाणी दिले. आंतरपीक म्हणून ज्वारी व भूईमूग, आदी पिके घेतली. अनेकवेळा गावाजवळील नळावरुन मुलांच्या सहाय्याने डोक्यावरुन पाणी आणून झाडाला घातले.

आषाढ महिन्यात झाडांची खोदणी करुन कुजलेले शेणखत देऊन भर देण्यात येते. याचबरोबर रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचाही वापर करण्यात आला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. मोहोर टिकवून ठेवण्यासाठी एम ४५, एंडोसल्फान, बाबीस्टिन आदी औषधांची फवारणी करण्यात आली. यानंतर वातावरणातील बदलांमुळे मोहोर टिकवून ठेवण्यासाठी औषधांच्या धुराळ्ण्या कराव्या लागल्या. सुनंदा पाटणे यांनी बांधावरील नारळांचा आणि टिश्यू कल्चर केळीचा प्रयोगही आंब्याच्या लागवडीबरेाबरच यशस्वी केला.

आज परिसरातील शेतकरी आंब्याची बाग तसेच अन्य आंतरपीकांची पाहणी करण्यासाठी येत असून वाई तालुक्यातील आदर्श महिला शेतकरी बनण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

No comments:

Post a Comment