Monday, October 31, 2011

निसर्ग प्रार्थना

कोकणातील शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे पारंपरिक शहरांचे रूप पालटत असले तरी विशिष्ट भागात गेल्यावर अस्सल कोकणी निसर्गाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. रत्नागिरीहून पावसमार्गे लांजाला गेल्यास अरुंद वळणदार रस्ते, दाट झाडी, मधूनच दिसणारे काळ्याशार कातळावरील रानफुलांच्या सहवासात या भागातील अनेक प्राचीन मंदिरांना भेट देता येते. इथल्या मंदिरांच्या आकर्षक रचनेबरोबरच परिसरातील शांततेचा अनुभव आणि हिरव्या निसर्गाचे सान्निध्य रोमांचित करणारे असते.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करताना निसर्गाच्या सान्निध्यात मोकळे क्षण घालविण्यासाठी राजापूर आणि लांजा तालुक्यातील काही प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी पावसमार्गे भटकंती सुरू केली. भाट्येच्या समुद्र किनाऱ्याचे नेहमी वेगळे वाटणारे सौंदर्य निरखत आणि पुढच्या टप्प्यात दाट झाडीतून जाणाऱ्या वळणदार रस्त्यावरून प्रवासाची मजा लुटत पावसला पोहचलो. 

स्वामी स्वरुपानंद मठात दुपारची आरतीची वेळ होती. या मठातली स्वच्छता आणि काम करणाऱ्यांची सेवावृत्ती यामुळे पर्यटकांना सुखद अनुभव मिळतो. पर्यटकांसाठी असणाऱ्या सोईंसोबतच मठातली शिस्त चटकन लक्षात येते. आरतीच्या वेळेच्या मांगल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यात असणारा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आरतीनंतर इथल्या प्रसिद्ध खिचडी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मठाच्या बाहेरच्या बाजूस अत्यल्प दरात कोकम सरबत आणि चहा-कॉफीची सोय पर्यटकांसाठी करण्यात आली आहे. इथले पवित्र वातावरण आणि सुविधांमुळे जिल्ह्याच्या भेटीला आलेल्या पर्यटकांना दुपारच्या वेळी याठिकाणी भेट देऊन निवांत क्षण घालविण्यात वेगळाच आनंद मिळतो.

पावसहून कनकादित्य मंदिराकडे जाताना रस्त्यात पावसच्या खाडीचे विलोभनीय दृष्य पाहायला मिळतं. दाट सुरुचं वन, नारळ-पोफळीची दाट झाडी, रस्त्याच्या कडेला काजूची झाडे...'अद्भूत' या एकाच शब्दात याचं वर्णन करता येईल. खाडीवर बांधलेल्या पूलावरून जाताना एका ठिकाणी दाट झाडींच्या कॅनव्हासवर चितारल्या प्रमाणे एक लहान मंदिर पाण्याच्या मधोमध होते. ते दृष्य पाहताक्षणीच कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला गेला नाही.

रस्त्याने कोकणी पारंपरिक वाड्या, लाल मातीच्या डोंगरावरील हिरवा निसर्ग आणि नागमोडी वळणे मागे टाकीत कशेळी गावातील कनकादित्य मंदिरात पोहचलो. पावसपासून हे गाव साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना गावाच्या आणि गावातील मंदिराच्या सुंदरतेविषयी त्यांच्याकडून ऐकले होते. त्या वर्णनापेक्षा जास्त सौंदर्य या भेटीत अनुभवता आले...

... मंदिराची रचना अत्यंत सुंदर पद्धतीची आहे. दारातच तुळशी वृंदावनाची रांग जणू स्वागतासाठी सज्ज असते. महाद्वारातून आत जाताच संपूर्ण मंदिर परिसरात जांभा दगड खाली लावलेला दिसतो. मंदिराच्या सभोवती याच दगडाची भिंत आहे. प्रवेशद्वाराजवळच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंच उभारला आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपासमोर शंकर, विष्णू आणि आर्यदुर्गेची लहान मंदिरे आहेत. सभामंडपातील पताकांची शोभा पाहत राहवीशी वाटते.

कनकादित्याची मुर्ती ९०० वर्षे प्राचीन असल्याची माहिती इथल्या विश्वस्तांनी दिली. गुजरातमध्ये बाहेरील आक्रमणे होत असताना प्रभात पाटण येथून समुद्रमार्गे सुरक्षित स्थळी नेताना ती गावात पोहचल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरात विहीरीच्यावर असलेल्या उंच लाकडी खांबाच्या रचनेकडे पाहून आश्चर्य वाटले आणि तेवढीच उत्सुकतादेखील. त्याला 'इंतर' असे म्हणत असल्याची माहिती मिळाली. झाडाच्या बुंध्याजवळच्या खाचेत मोठा लाकडी खांब व्यवस्थित अडकवून त्याच्या एका बाजूला जांभा दगडाचे ब्लॉक आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाच्या गदेप्रमाणे प्लास्टिक अथवा धातूची रचना केलेली असते. याचा खालचा भाग अर्धा खुला असतो. विहिरीतून पाणी काढण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचे प्रात्यक्षिक अत्यंत रोचक वाटले. महाकालीच्या मंदिरातही अशीच रचना पहायला मिळाली. मंदिरात तांब्याच्या धातूपासून बनविलेले इतिहासकालीन ताम्रपट देखील पहावयास मिळतात. 

कनकादित्याचे दर्शन घेऊन आम्ही साडेतीन किलोमीटरवर असलेल्या आडीवरे गावाला पोहचलो. रस्त्यात व्येत्येचा सुंदर समुद्र किनारा आहे. मात्र वेळेचे नियोजन लक्षात घेता ते सौंदर्य मागे टाकीत प्रसिद्ध महाकाली मंदिरात पोहचलो. मंदिराचा परिसर भव्य आहे. नुकतेच नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. इथे महाकालीसोबत महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या मुर्तींचे दर्शन होते. मंदिराला लागूनच जुन्या पद्धतीची विहीर आहे. कोकणातील मंदिरांच्या वास्तू फारशा भव्य नसल्या तरी त्यांचे सौंदर्य मात्र नजरेत भरण्यासारखे असते आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे परिसरातील स्वच्छता आणि शांतता प्रार्थनेचा खरा आनंद देणारी असते. शहराच्या गजबजाटात मोठ्या वास्तू उभारताना ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या सहवासातील असा अनुभव घेता येत नाही. 

... महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही जाकादेवी येथे पोहचलो. अत्यंत डोगराळ भागातील आर्यदुर्गेचे जागृत देवस्थान म्हणून हे परिचित आहे. मंदिर परिसराचा शासनामार्फत विकास करण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती येथील पुजाऱ्यांनी दिली. मंदिर अत्यंत प्राचीन असून समोर अलिकडच्या काळात उभारण्यात आलेला सभामंडप आहे. दोन दगडी खांब मंदिर प्राचीन असल्याची साक्ष देत उभे आहे. मंदिर परिसरातच भाविकांच्या भोजनाची सोय करण्यात येते. पुण्याच्या भक्तांनी रस्त्याच्या कडेला भक्तनिवासाची उभारणी केली आहे. आर्यदुर्गा मंदिराला लागून गावदेवी श्री जाकादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर हिरव्यागार डोंगरांची रांग दिसते. गार वाऱ्याच्या सुखद स्पर्शात काही क्षण इथे घालविण्याचा मोह आवरत नाही.

जाकादेवीहून लांजामार्गे परतीच्या रस्त्यावर अंजनारी गावातील निसर्गरम्य ठिकाणी आमच्या या सफरीचा सुंदर समारोप झाला. लांजाहून साधारण १५ किलोमीटर अंतरावर डावीकडे अंजनारी नदीच्या तटावर श्रीअवधूतवन दत्त मंदिर मठ उभारण्यात आला आहे. हिरव्यागार दाट झाडीने वेढलेल्या डोंगररांगातून वाहणाऱ्या नदीचे शांत पात्र, पक्ष्यांचे आवाज आणि मंदिर परिसरातील निर्मळता यामुळे प्रवासातील सर्व थकवा दूर सारला गेला. मंदिर परिसरात सुंदर उद्यान उभारण्यात येत आहे. खालच्या बाजूस नदीपात्रात जाऊन थंडगार पाण्याचा रोमांचीत करणारा स्पर्श झाल्यावर वरच्या बाजूस असणाऱ्या कुंडातील गरम पाण्याचा स्पर्श तेवढाच चकित करणारा असतो. निसर्गाची हीच किमया कोकणात वेगवेगळ्या रुपात अनुभवायला मिळते. नदी किनारी काही क्षण शांततेचा अनुभव घेतल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात 'निर्मात्या'च्या आठवणीत काही क्षण घालविणे प्रत्येकाला आवडतं. भक्तीतल्या एकरूपतेचा अनुभव इथले झाडे, वेली, पक्षी, नद्या, नाले आणि लालमातीचे रस्ते क्षणोक्षणी करून देतात. निसर्गाचा प्रेमळ स्पर्श झाल्यावर भावनांच्या सागरावर निर्माण होणारी प्रार्थनारूपी लाट विश्वकल्याणाच्या किनाऱ्याला केव्हा स्पर्श करते ते आपल्यालाही कळत नाही. तीच असते खरी प्रार्थना... निसर्ग प्रार्थना, विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना...एक मात्र खरं की अशा प्रार्थनेची एकरूपता अनुभवीत निसर्गाचा आनंदानुभव घेण्यासाठी शहराचा गजबजाट आणि व्यवहार विसरून सभोवतीच्या झाडे-वेलींनाच सोबती करायला हवं...आणि हो, हा अनुभव घेण्यासाठी कोकणात यायलाच हवं.

2 comments:

  1. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete
  2. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete