Friday, October 21, 2011

वाघाचे प्रोफाईल

मेळघाट सारख्या विस्तीर्ण संरक्षित जंगलामध्ये वन्य प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना दुर्लभच असते. परंतु निसर्गाची आवड असलेल्या पर्यटकांना वाघासह इतर प्राण्यांच्या अस्तित्वाच्या पुराव्यांच्या नोंदी ठेवून मेळघाटमध्ये सुध्दा वाघ आहे याच्या पाऊलखुणा अत्यंत मेहनतीने संकलित केल्या आणि निसर्गप्रेमींसमोर ठेवल्या तर मेळघाटमध्ये वाघ पाहिल्याचा अनुभव निश्चितच मिळू शकतो.

चिखलदऱ्यापासून सेमाडोहकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या आमडोहपासून बंदरकहूकडे जाणारी निसर्ग पाऊलवाट प्रत्येक पर्यटकांना मेळघाटातील समृध्द जैवविविधतेचं दर्शन घडविणारे आहे. आणि त्यासोबतच वाघासह वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणाही बघताना वाघ पाहिल्याचा आनंद देणाऱ्या आहेत.

वनविभागाचे काम केवळ जंगलाचे संवर्धन करण्याबरोबर या क्षेत्रात असलेल्या जैवविविधतेसह वन्य प्राण्यांच्या प्रत्येक पाऊलखुणावर देखरेख ठेवण्याचेही आहे. अशाच एका बोरखेडी बिटमध्ये वनरक्षक या पदावर कार्यरत असलेल्या राजेश घागरे या युवकाने चक्क वाघाचेच प्रोफाईल तयार केले आहे. संरक्षित वनक्षेत्रात काम करत असताना केवळ शासकीय नोकरी म्हणूनच दिलेली जबाबदारी सांभाळत असतांना वन्य प्राण्यांच्या संवर्धन व संशोधनाची आवड असलेल्या राजेश घागरे यांनी बोरखेडी नियत क्षेत्रामध्ये एक वाघ असल्याचे पुरावे शोधले. या पुराव्यांचा मागोवा घेत वाघाचाही शोध घेतला नव्हे तर येथे बसविलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये. नोंद झालेल्या वाघाचे संपूर्ण निरीक्षण केले आणि या वाघाचे दैनंदिन प्रोफाईलच तयार केले.

बोरखेडी संरक्षित क्षेत्रात सांबर पाणी हा पाणवठा आहे. उन्हाळ्यातही या पाणवठ्यावर पाणी असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या क्षेत्रात वाघाचीही नोंद झाली आहे. या वाघिणीच्या पायाच्या पंजावरील अनामिका हे बोट थोडे कापले असल्यामुळे या वाघिणीला अनामिका हेच नाव दिले. या अनामिका वाघिणीचा ओळख क्रमांक आयडी सीसीबी -०१ असा ठेवण्यात आला आहे. अनामिका बोरखेडी क्षेत्रात कुठे वास्तव्याला राहते इथपासून तिची दिनचर्याही टिपण्याचे काम या प्रोफाईलमध्ये अद्ययावतपणे ठेवण्यात आले आहे. नुकताच एक वाघही या क्षेत्रात आढळल्याची नोंद झाली असून अनामिकेला सोबती मिळाला आहे. वाघाच्या पाऊलखुणा तिचा आवाज, तिची विष्ठा, तिचे खाद्य आदी हालचालीवरही नियंत्रण ठेवून तशा नोंदी या रजिस्टरमध्ये घेण्यात आल्या आहेत. पर्यटकांना अनामिकेचे प्रोफाईल म्हणजे प्रत्यक्ष दर्शनाचाच अनुभव देऊन जाते.

राजेश घागारे वनरक्षक हे तीन वर्षापासून बोरखेडी या क्षेत्रात कार्यरत आहेत. एम.ए. इंग्रजी करुन ते वनरक्षक म्हणून नियुक्त झाले. मेळघाटच्या विविध भागात काम केल्यानंतर वन्यप्राण्यांच्या अभ्यासाकडे ते वळले. राजेश घागरे यांनी तेरा वेळा प्रत्यक्ष वाघ बघितला आहे. मेळघाट हे वन्यप्राण्यांसाठी अत्यंत संरक्षित क्षेत्र असल्याचा असा त्यांचा विश्वास आहे. वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याची त्यांची विशेष आवड असल्यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही ते जंगलावर प्रेम करण्याचं शिकवतात. याच जंगलातील नाल्याजवळ असलेल्या आंब्याचा विशाल वृक्ष आहे. वाघ नेहमी या झाडावर नखे साफ करण्यासाठी येतो. एकच पाऊलवाट असल्यामुळे वाघाचे दर्शनही शक्य होऊ शकते. गवा, सांबर, डुक्कर आदी वन्य प्राणीही याच पाऊलवाटेने विशाल जंगलाकडे जातात.

बोरखेडी परिसरात वन्यप्राण्यांसोबतच समृध्द वनसंपदाही आहे. येथे सागवान, कुसुम, टेंभुरणी, हलदु, धावडा, डुबा, तिवस, मोईल आदी प्राणी आहेत. तसेच गवत व झुडप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. जैवविविधतेचें दर्शन घेतानाच एकाच झाडावर कातीनने विणलेले घरटेही पहायला मिळते.

वनपर्यटनाचा आनंद घेताना केवळ मेळघाटचे दर्शन वाहनातूनच होत नाही तर अंबापाटी ते बंदरकहू यासारख्या वनवाटानेही होऊ शकते. पण यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर चालण्याची तयारी असावी लागते. वनाचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आणि ती सामुहिकपणे स्वीकारली तर समृध्द वनसंपदेची ओळख निश्चितच करुन घेण्यास मदत होऊ शकते.

  • अनिल गडेकर 
  • No comments:

    Post a Comment