Sunday, August 26, 2012

मोडी लिपीचे संवर्धन

महाराष्ट्रात दर 10 कोसानी भाषा बदलते असे म्हणतात. संस्कृत, पाली, प्राकृत, मोडी या सारख्या भाषांमधून विकसित होऊन आजची मराठी भाषा उदयास आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालया तर्फे जनतेसाठी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. या संदर्भात 1 जून 2012 च्या शासन निर्णय आहे. अस्तंगत होत असलेल्या मोडी लिपीच्या संवर्धनासाठी पुराभिलेख संचालनालयाच्या हा स्तुत्य प्रयत्न आहे. याच अनुषंगाने नागपुरात 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत मोडी लिपी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याची ही माहिती महान्यूजच्या वाचकासाठी.

कधी काळी महाराष्ट्रात 12 व्या शतकापासून मोडी लिपी ही राजदरबारी विराजमान झाली होती. न मोडता न थांबता अत्यंत जलद गतीने झरझर लिहिल्या जाणाऱ्या या लिपीस मोडी लिपी असे संबोधिण्यात आले. आजची स्टेनोग्राफरची जशी सांकेतिक लिपी आहे, तशाच प्रकारचे स्वरूप या लिपीतील लेखनमागे होते. यादव काळापासून सुरू झालेल्या हा मोडीचा प्रवास शिवकाळात बहरुन आला होता. मराठी भाषा जरी असली तरी तिची लिपी हो मोडी असल्याने तिला फार महत्व प्राप्त झाले आणि या मोडीचा सर्रास वापर राजदरबारात तसेच लोकांच्या दैनदिंन जीवनातून 20 व्या शतकाच्या अखेरपर्यत अगदी 1960 पर्यत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतून शिक्षणात तिचा समावेश होता. मात्र छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सीमित झाल्याने कालौघात ही लिपी हळूहळू मागे पडली. राजदरबारातूनच नव्हे तर व्यवहारी जीवनातूनही ही मागे पडली. इतकेच नव्हेतर ती हळूहळू मोडीतच गेल्यात जमा झाली.

मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार झाला तो शिवकाळापासून. शिवकाळ किंवा पेशवाई काळामध्ये ज्यांचे अक्षर सुरेख असेल त्यांना चिटणीशी फडावर प्राधान्याने नोकरी दिली जात असे. आज आपण या काळातील व पेशवाई काळातील कागदपत्रांवर नजर टाकल्यास त्यातील बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच आहेत हे दिसेल. तसे आजही अनेक खाजगी संस्थांकडे तसेच शासकीय व निमशासकीय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, नगर पालिका येथील जुने दस्तऐवज मोडी लिपीमध्ये आहेत. यामध्ये प्रामुख्याने जन्ममृत्युच्या नोंदी, क, ड, बोटखत इत्यादी अभिलेखांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुरालेखागारातील पुणे पुरालेखागाराचे उदाहरण द्यावयाचे झाले तर या ठिकाणी पेशवा दप्तरातील 1590 पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आलेले आहेत. या पुणे पुरालेखागाराचे वैशिष्टय सांगावयाचे झाल्यास, एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील व एका राज्याची इतिहास सांगणारी 1590 ते 1865 म्हणजे सुमारे 250 वर्षाची ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे इतिहास संशोधकांची प्रतिक्षा करीत आहेत. अशा प्रकारची व मोठया संख्येची कागदपत्रे अन्यत्र दुसरीकडे कोठेही आढळून येत नाहीत. नागपूर पुराभीलेख कार्यालयाकडेही जवळपास 1873 पासूनचे जुने दस्तावेज आहेत.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या सत्राचे उदघाटन मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात माजी सांस्कृतिक कार्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते झाला. या प्रथम संत्रात फक्त 50 विद्यार्थी अपेक्षित होते. असे असतांना मुंबईतील इतिहास प्रेमी नागरिकांनी या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि 50 नंतर 100 आणि पुढे ही संख्या जवळ जवळ 150 पेक्षा अधिक झाली.

या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाची आणखीन एक खासियत अशी आहे की, यामध्ये तीन प्रकारचे मोडी लिपी प्रशिणार्थी असतात. पहिला ज्याला आपण पौढ शिक्षित वर्ग असा आपण उल्लेख केला. अशा प्रशिक्षणार्थीनी मोडी लिपी शिकलेली असते. परंतु त्यांची मोडी लिपी विस्मरणात गेलेली असते. काहींना ती चांगल्या प्रकारे येत असते. अशाप्रकारच्या एक यामध्ये सहभागी होत असतो. दुसरा म्हणजे जे जमीन विषयक कज्जे चालवितात अशी वकील मंडळी या प्रशिक्षण वर्गामध्ये सामील होतात. याचे कारण असे की, जमीन विषयक जुनी कागदपत्रे ही मोडी लिपीमध्ये असतात आणि या मोडी लिपीचे लिप्यंतर करून पक्षकाराचे हक्काचे पुराव्याचे कागद म्हणून त्यांना दाखल करावयाचे असतात आणि या ठिकाणी अशाप्रकारचे लिप्यंतराचे कागदपत्र दाखल केल्यानंतर त्यांना सादर केलेल्या कागदपत्राचे कशावरून लिप्यंतर बरोबर झाले की नाही, लिप्यंतर करणाऱ्याला मोडी येते का असा प्रश्न उपस्थित होतो.

सहाजिकच या वकिल मंडळीनी या प्रशिक्षण वर्गात भाग घेऊन, मोडी लिपीची परीक्षा उर्तीर्ण होऊन आपणासही मोडी लिपी येते हे शाबीत करून मोडी लिपीतील कागदपत्रे सादर करण्याची चांगली संधी त्यांना या मोडी लिपी प्रशिक्षणामुळे मिळाली. अशांचा एक दुसरा गट होतो. आणि तिसरा गट म्हणजे जे उत्स्फूर्तपणे मोडी लिपी जिज्ञासापोटी शिकून इतिहासाचे वाचन करतात, अशांचा तिसरा गटामध्ये समावेश होतो. थोडक्यात अनेक उद्दिष्टे मनात ठेवून मोडी लिपी समजून घेण्याचा उद्देशाने या प्रथम वर्गात अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला आणि या मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसादामुळे मलाही हा मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठेवून शिकवायची इच्छा प्रबळ झाली.

यापूर्वी महाराष्ट्रातील काही खाजगी संस्थांनी व व्यक्तीनी आपापल्या धोरणनुसार व क्षमतेनुसार मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करून या लिपीला अल्पांशी का होईना जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र या उपक्रमामध्ये सातत्य राहत नव्हते. आता शासन स्तरावर पुराभिलेख संचालनालयाने हा उपक्रम सुरू केल्यापासून महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी जनतेचा या मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

यामध्ये इतिहास विषय घेतलेले इतिहासाचे अभ्यासक, प्राध्यापक याखेरीज इतिहास विषयाशी संबंधितांपेक्षा इतर क्षेत्रातील लोकांचाच भरणा अधिक होता. वकिल, इंजिनिअर, वास्तुशास्त्रज्ञ, डॉक्टर, अक्षर रेखाटक, गृहीणी तसेच मोडी लिपी विषयी उत्कंठा व आवड असणारे अगदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले अनेकजण उत्साहाने सहभागी झाले होते. पुणे येथील प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या उपक्रमास माणिक म्हणावे की मोती म्हणावे असे कौतुक करुन पुराभिलेख संचालनालयास धन्यवाद दिले.

पुराभिलेख संचालनालयाने सन 2003 पासून ते आजपर्यंत सातत्याने हा उपक्रम चालविला आहे. यामध्ये साधारणत: 10 ते 12 दिवसांमध्ये ही मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातो आणि त्यामध्ये केवळ 25 तासांमध्ये मोडी लिपी शिकविली जाते. या 25 व्याख्यानांमध्ये सुरुवातीला मोडी लिपीची पार्श्वभूमी व महाराष्ट्राचा इतिहास आणि मोडी लिपीच्या इतिहासाचा अद्ययावत आलेख. त्यानंतर पुराभिलेख संचालनालयातील प्रशिक्षक सुरुवातीला मोडी लिपीतील आणि देवनागरी लिपीतील समान असलेल्या अक्षरांवर आधारीत पहिला धडा आणि मग चढत्या क्रमाने ही मुळाक्षरे शिकविली जातात. यामध्ये परंपरागत पद्धतीने आणि मग प्रशिक्षणार्थींना जोड शब्द, मग जोड वाक्य, एका गंमतीदार विषयावर मोडी लिपीतील निबंध लिहिणे आणि शेवटी मुसलमान कालमापन पद्धती, हिंदू कालमापन पद्धती त्याचप्रमाणे घड हे अक्षर कशाप्रकारे अर्थ बदलू शकते, त्याच्या करामती इत्यादी बाबींची गमतीदार उदाहरणे देऊन प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये या विषयी गोडी निर्माण करुन हलक्या फुलक्या शब्द रचनेतून ही मोडी लिपी शिकविली जाते.


या प्रशिक्षणार्थींना मोडी लिपीचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत व्हावे म्हणून याचा अभ्यासक्रम ठरविताना अनेक मोडी तज्ञ लोकांचे सहकार्य घेण्यात आले व त्यामध्ये मुंबईमधील मोडीतज्ञ श्री.मनोहर जागुष्टे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास हवा. या लिपीच्या चांगला सराव व्हावा म्हणून एक सीडी प्रशिक्षण वर्ग पुस्तिका संपादित करण्यात आली. त्यामध्ये मुळाक्षरे, बाराखड्या, जोडाक्षरे, कालगणना, कागदपत्रांचे प्रकार, वाचन सराव, लेखन सराव, शिवकालीन तसेच पेशवेकालीन कागदपत्रांचे उतारे, तत्कालीन पत्रलेखन, मायने इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला.

या प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील दप्तरखाने या विषयावर दोन व्याख्यानेदिली जातात. यामध्ये पुराभिलेख संचालनालय म्हणजे काय? त्याचे कार्य कोणते? अभिलेखांच्या निर्मितीपासून त्यांच्या जतन करण्याच्या पद्धतीची माहिती तसेच मराठी राज्याचा पहिला वहिला शिवछत्रपतींनी निर्माण केलेला दप्तरखाना, रायगडावर संभाजी महाराजांच्या अटकेनंतर झुल्फीकार खानाने 1689 मध्ये दप्तरखाना कसा नष्ट केला? सन 1821 साली महाराष्ट्रातील मुंबई येथील शासकीय पुरालेखागाराची निर्मिती कशी झाली? अभिलेखांचे प्रकार आणि याशिवाय इतिहास संशोधन करताना, ऐतिहासिक कागदपत्रांचा अस्सल पुरावा म्हणून उपयोग करताना कशा प्रकारचे तारतम्य राखावयाचे, त्याचबरोबर इतिहासात न घडलेल्या गोष्टी कशा घुसडलेल्या आहेत, त्याबाबत ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे माहिती देत असतो. या ऐतिहासिक कागदपत्रांची माहिती देत असताना मोडी लिपी प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये एक ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण होते आणि हे प्रशिक्षणार्थी यामध्ये समरस होऊन जातात आणि त्याचा चांगला परिणाम या मोडी लिपी प्रशिक्षणार्थींवर होत असतो.

या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गातून जे विद्यार्थी उर्त्तीण झालेले आहेत. तेच आज मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे व्याख्याने महणून काम करीत आहे. अनेक प्रशिक्षणार्थीना अर्थार्जन करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. पुणे, मुंबई येथील पुरालेखागारात येणा-या संशोधंकाना हे प्रशिणार्थी मोडी लिपीतील अभिलेख मराठीमध्ये लिप्यंतर करून देउून तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील कार्यालयातील मोडी लिपीतील जुने दस्तऐवज गरजूंना लिप्यंतर करून देउन ते काही अंशी रोजगार मिळवू शकतात. आणि त्यापेक्षाही ज्यांना इतिहास क्षेत्रात मूलभूत संशोधन करावयाचे आहे, त्यांनी ही मोडी अवगत झाल्याने ते ऐतिहासिक कागदपत्रे स्वत: वाचू शकतात. त्यांच्यातील योग्य तो अर्थ लावू शकतात. असे केल्याने त्यांच्या संशोधनाचा दर्जा वाढतो. महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय आता ही उपक्रम कायमस्वरूपी राबविणार आहे.

महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी जनतेला माझी अशी नम्र विंनती आहे की, त्यांनी भविष्यामध्ये पुराभिलेख संचालनालयाकडून ज्या ठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व मोडी लिपी संवर्धनास व तिचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आपलाही हातभार लावावा.
शैलजा वाघ-दांदळे , नागपूर

1 comment:

  1. please help me to read a letter which I found in my family old record. Can you help me?? Email: scn8663@gmail.com

    ReplyDelete