Tuesday, August 7, 2012

आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही योजना आहे.

18 ते 59 वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटूब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजने अंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो.

या विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी 100 रुपये या प्रमाणे असे एकूण 200 रुपये प्रती लाभार्थी वार्षिक विमा हफ्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरणा करण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांला विम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत नाही.
 विम्याच्या अंतिम मुदती पुर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्याच्या वारसाला आश्वासित रक्कम 30 हजार रुपये दिले जातात. तसेच सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास 75 हजार रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये रक्कम भरपाई म्हणून लाभार्थ्याला दिली जाते.

त्याचबरोबर लाभार्थ्याच्या 9 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रती तिमाही प्रती मुलास 300 रुपये इतकी शिष्यवृती देण्यात येते.

आमआदमी विमा योजनेकरिता भूमिहीन मजूर, पाच एकर पेक्षा कमी जिरायती व अडीच एकर पेक्षा कमी बागायती शेत जमीन धारण करीत असलेली व्यक्ती भूमिहीन समजण्यात येते.

आम आदमी विमा योजनेच्या शिष्यवृतीस पात्र असलेला विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्याच्या वडीलांचा एल.आय. सी, आय. डी. आवश्यक असून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे एल.आय.सी, आय.डी. नसेल त्यासाठी मुख्याध्यापक, तहसिलदार, तलाठी यांनी तो प्राप्त करुन घेतल्यास त्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृतेचे दावे तातडीने दाखल करतील.

पात्र लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी त्यांच्या नावाची नोंदणी आपल्या गावातील तलाठी, तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरुन द्यावेत. याबाबत अधिक माहितीसाठी तालुक्यातील तहसिलदारांशी संपर्क साधावा.

राजू धोत्रे, माहिती अधिकारी, बीड.

No comments:

Post a Comment