Saturday, August 4, 2012

ज्ञानभाषा मराठी सक्षमीकरण


अव्वल इंग्रजीच्या शिक्षणातूनच त्या पिढीतील संशोधकांना मराठीच्या जतनासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचं भान आलं. ते भान घेऊन पूर्णत: देशी पद्धतीने ही माणसं काम करत राहिली. मराठीला ज्ञानभाषा म्हणून सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल म्हणून ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे तुरळक प्रयत्न वगळता पारतंत्र्यामुळे भारतावर इंग्रजी लादली गेली व देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली.

 
संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना होताच ज्या उद्दिष्टांसाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली होती, ती साध्य करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पहिले द्रष्टे मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी त्वरित पावले उचलण्यास सुरूवात केली. मराठी ही केवळ शासनाच्या कामकाजाची भाषा होणे पुरेसे नाही तर ती व्यवहारभाषा व ज्ञानभाषा झाली पाहिजे, तसेच बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम झाली पाहिजे यासाठी त्यांनी भाषा संचालनालय स्थापन केले तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची उभारणी केली. या शिवाय लोकसाहित्य समिती, साहित्य परिषदा, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ यासारख्या अनेक संस्था शासनाच्या पुढाकाराने अथवा मदतीने भाषा-संवर्धनासाठी स्थापन झाल्या.

 
मराठी ही ज्ञानभाषा व्हायची असेल तर ती केवळ प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर न राहाता उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणूनही तिचा वापर व्हावयास हवा. आधुनिक शास्त्रे ही प्रामुख्याने पाश्च्यात्य देशात उदयास आली व विकास पावली. त्यामुळे इंग्रजी व तत्सम भाषांत जी परिभाषा त्या-त्या शास्त्राबरोबर सहजगत्या निर्माण झाली व विकास पावली ती कृत्रिमपणे घडवण्याची गरज होती. त्यासाठी आधुनिक शास्त्रांच्या परिभाषा निर्मितीचे काम भाषा संचालनालयाने केले. आज मितीस, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, मानविकी, विज्ञान इत्यादी विद्याशाखांमधील विषयांचे २७ परिभाषा कोश संचालनालयाने प्रकाशित केले आहेत. १९८० च्या दशकात राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना झाली. राज्य मराठी विकास संस्था स्थापन करण्यापूर्वी जी समिती नेमली होती तिने आपल्या टिप्पणीच्या शेवटी म्हटले आहे, भाषेचा विकास हा अखेर भाषिकांचा विकास असतो. परिभाषा, साक्षरताप्रसार, शुद्धलेखनसुधारणा या किंवा अशा मोजक्या व अतिपरिचित विषयांमध्येच भाषेच्या विकासाचा विचार अडकून पडणे हिताचे नाही. राज्य मराठी विकास संस्थेची उद्दिष्टे ठरवताना याचा निश्चितच विचार केला गेला. कृषी, वैद्यक, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे इ.व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री विकसित करणे तसेच भाषिक वापराची यांत्रिक उपकरणे, संगणकीय आज्ञावली यांच्या वापरात सुसूत्रता व सुबोधता आणण्यासाठी शासनाला मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे माहिती तंत्रज्ञानविषयक गरजा लक्षात घेऊन मराठीत अनुरूप आज्ञावली विकसित करणे मराठी भाषेतील माहितीचा पाया विस्तृत करणे ही संस्थेच्या स्थापनेमागील महत्त्वाची उद्दिष्टे होती. याशिवाय मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मराठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत.

 
या उपक्रमात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी एवढ्या शासकीय व व्यावसायिक संस्था कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असता मराठीची ज्ञानभाषा म्हणून भरीव प्रगती होणे अपेक्षित होते. परंतु या उलट मराठी भाषा आज अस्तित्वाचा लढा लढताना दिसून येते. सुरुवातीच्या भरीव कामगिरीनंतर गेल्या पंचवीस वर्षांत शासनाची व त्यामुळेच शासन-स्थापित संस्थांची मराठीबद्दलची आस्था प्रथम कमी होत गेली व जागतिकीकरणाचे वारे वाहू लागताच ती जवळजवळ नष्ट झाली. उद्दिष्ट पूर्तीसाठी काल मर्यादा निश्चित न करणे, ठरवलेल्या उद्दिष्टांचे बदललेल्या परिस्थितीत पुनरावलोकन न करणे, काही वेळा सक्षम नेतृत्त्वाचा अभाव व शासकीय अनास्था यामुळे या संस्था स्थापण्यामागील हेतू साध्य होऊ शकले नाहीत. मराठी ही एक सक्षम ज्ञानभाषा होण्याचा संबंध अनेक शैक्षणिक बाबींशी जोडलेला असतो. महाराष्ट्रातील विद्यापीठांसाठी १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम हा कायदा आहे. त्या कायद्यातील कलम ५ अन्वये मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व विद्यापीठांची आहे. परंतु या तरतुदीचा राज्यातील विद्यापीठांनी वापर केलेला नाही. आणि त्यामुळे ५० वर्षात मराठी भाषा उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये ज्ञानभाषा झालेली नाही.

 
ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. म्हणूनच मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. त्यासाठी सक्ती आणि संधी या दोन्ही मार्गांचा वापर करायला हवा.

 
मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे असेल तर प्रथम ती ज्ञानभाषा होऊ शकते असा जनतेच्या व शासनाच्या मनात विश्वास पाहिजे. या विश्वासाची खात्री पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाचा स्वीकार करून व शासनाने मराठी (वा देशी भाषांचे) माध्यम अनिवार्य करून दिली पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता शासनच (जिल्हापरिषदा, महानगर पालिका, आदिवासी विकास विभाग) इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करू लागले आहे. मराठी माध्यमाच्या गुणवत्तेविषयी पालकांच्या ढासळत्या आत्मविश्वासामुळे महाराष्ट्रातील केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील सुशिक्षित, अर्धशिक्षित वा अशिक्षित जनतेतही मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाविषयी ओढ व मराठी माध्यमाविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. ही ओढ एवढी प्रचंड आहे की भावनिक आवाहन व अस्मितेचा गौरव अशा तकलादू उपायांनी तिला आवर घालणे अशक्य आहे. इंग्रजीकडे झुकलेला हा कल प्रथम थोपवणे व नंतर मराठीकडे वळवणे हे शासनाचे घटनादत्त कर्तव्य आहे. ते पार पाडले नाही तर मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वास असणारा पालकवर्ग व मराठीतून शिक्षण घेऊन भविष्याचा पाया रचू पाहाणारे विद्यार्थी यांचा भ्रमनिरास होईल. शिक्षणाचे माध्यमच मराठी नसेल तर वर उल्लेख केलेल्या संस्थांच्या कामाला काहीच अर्थ राहणार नाही आणि तयार केलेले परिभाषा कोश केवळ गोदामातील अडगळ ठरेल.

 
सध्या आपण ज्ञानभाषा निर्मितीच्या प्राथमिक पातळीवर म्हणजे परिभाषा निर्मितीच्या आणि भाषांतराच्या पातळीवर आहोत. या बाबतीतला अनुशेष झपाट्याने वाढत आहे. तो भरून काढून मराठीतून नवीन ज्ञान व्यक्त करता येईल त्या दिवसाची आपण वाट पाहूया. म्हणजे भावी काळातील हिम्मतराव बावीस्करांना विंचू दंशावरील लसीचे संशोधन ‘लॅन्सेट’ मधे प्रसिद्ध करावे लागणार नाही आणि मराठीतील ज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी परदेशातील विद्यापीठांना मराठीचे अध्यासन निर्माण करण्याची गरज भासेल!

 
  • शरद रामचंद्र गोखले

  • No comments:

    Post a Comment