Saturday, August 4, 2012

ग्रामपंचायती आता हायटेक

चहा जेव्हा आपल्या देशात आला तेव्हा, या चहाला सर्वजण नाके मुरडीत होते. स्वदेशी चळवळीत या चहावर बहिष्कार टाकला जात होता. परंतु आता हा चहा आपल्या स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक झाला, एवढेच नव्हेतर आता उपवासामध्ये देखील आपण चहा घेतो, अगदी या चहा प्रमाणेच संगणकाचेही झाले आहे. तो आला, त्याने पाहिले आणि जिंकले, याप्रमाणे हा संगणक आता आपल्या जीवनातील स्वायीभाव झाला आहे. अगदी भविष्य कुंडली मांडण्यापासून ते स्वैपाकघरातील रेसीपी सांगण्यापर्यंत हा संगणक आपणाला सांगू लागला आहे,

रेशन दुकान ते कार्पोरेट बँकापर्यंत संगणकाचा वापर होतो आहे. अमेरिकेतील आपल्या नातवाशी कडेगावमधून आजी आता चॅट करु लागली आहे, अहो विवाह देखील या संगणकामुळे जुळत आहे. संगणकाने एवढी सर्व क्षेत्रे व्यापली असताना मग आमच्या सांगलीतील ग्रामपंचायती कशा बरे मागे राहतील. आमच्या सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुद्धा आता या कार्पोरेट युगात जाण्याचे ठरवले आहे नव्हे, प्रवेश देखील केला आहे.

संगणकीय कामकाजामुळे दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता येते आणि कामेही झटपट होवून वेळ वाचतो. यामुळे संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढू लागला आहे, काळ काम वेगाचे गणित अचूक करणार्‍या या संगणकाचा वापर सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुरु केला आहे, याबद्दल अधिक माहिती देताना सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, जिल्ह्यात एकूण ७०५ ग्रामपंचायती आहेत. यासर्व ग्रामपंचायती तसेच तालुका पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालये संगणकाने जोडली गेली आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचा कार्यभार अधिक गतीमान होवून कार्यालयातील नागरिकांचे हेलपाटे वाचले आहेत.

संगणकीय कारभारामुळे व्यवहारात येणार्‍या अडचणी कमी होतात. कार्यालयातील पत्रव्यवहार आता ई-मेलद्वारे होतो, बैठकांचे संदेश, इतिवृत्त आदि व्यवहारही या संगणकीय प्रणालीने केला जात आहे. त्यामुळे मनुष्यबळ तसेच पैशाची बचत होवून कामाचा ताण कमी झाला आहे. बैठकासाठी जाण्यायेण्याचा वेळ वाचून, हा वाचलेला वेळ कार्यालयातील कामासाठी आता देता येणे सहज शक्य झाले आहे.

महत्वाची बाब म्हणजे सर्व ग्रामपंचायतींना आता आपला निधी ऑनलाईन तपासता येवू लागला आहे. निधी म्हणजेच आर्थिक तरतूद किती आली. कोणत्या कामासाठी आणि कोणत्या तारखेला, कुठल्या कामावर किती निधी खर्च झाला, किती शिल्लक आहे, किती रक्कम काढली, कोणत्या कामावर खर्च झाली, कोण कोणत्या कामांचा निधी शिल्लक आहे ही सर्व आर्थिक तरतूदीची मेळ घालणारी माहिती ऑनलाईन मिळत असल्याने अधिकारी, पदाधिकारी तसेच कर्मचारी यांचे काम सोपे झाले आहे. घरबसल्या माहिती मिळत असल्याने या लोकांचा बहुमुल्य वेळ वाचत आहे.

ऑनलाईन पंचायत समित्या जोडल्या गेल्याने निधीची आवक जावक स्पष्ट झाली आहे. यासाठी या सर्व ग्रामपंचायतींची खाती बँकांमध्ये उघडण्यात आली असल्याचे श्री. मुदगल यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती त्यांच्या तरतूदी आदि सर्व माहिती संगणकाद्वारे उपलब्ध होत असल्यामुळे एखादी पंचायत समिती जर कामामध्ये कमी पडत चालली आहे असे निदर्शनास आल्यास तेथे त्वरीत आवश्यक ती ठोस उपाययोजना करुन त्या पंचायत समितीचे काम सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही त्वरीत देता येणे शक्य झाले आहे.

यासाठी आवश्यक असलेल्या प्रणाली जिल्हा परिषदेने वापरल्या आहेत. प्रशासनात पारदर्शकता येवून कर्मचार्‍यांची कार्यक्षमता तसेच गुणवत्ताही यामुळे वाढून प्रशासन अधिक गतीमान होईल यात शंका नाही.


  • अविनाश सुखटणकर

  • No comments:

    Post a Comment