Saturday, August 18, 2012

कामधेनू योजनेंतर्गत ३२७२ गावे दत्तक : पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले

 शेतीला पशुधनाची जोड मिळावी, यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने कामधेनू योजना सुरु केली असून, त्या अंतर्गत राज्यातील ३२७२  गावे दत्तक घेतली आहेत. यासाठी चालू वर्षासाठी ४३  कोटी ७६ लाख ९३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून निवड झालेल्या प्रत्येक गावाला दीड लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली. 

निसर्गाच्या अनियमिततेचा प्रत्यय वारंवार येत आहे. म्हणूनच शेतीला उत्तम जोड व्यवसाय म्हणून पशुपालनास लोकमान्यता मिळालेली आहे. कितीही अडचणी आल्या तरी शेतकरी पशुधन वाऱ्यावर सोडत नाही याचे प्रत्यंतर अनेकदा आलेले आहे. याच आधारावर पशुसंवर्धन विभागाने ही योजना सुरू केली आहे.  

प्रथम दत्तक गावातील सर्व पशुधनाची शेतकरीनिहाय अद्ययावत गणना करण्यात येईल. त्यामध्ये सध्याचे दुग्धोत्पादन, उत्पादकता यांच्या  नोंदी घेतल्या जातील. त्यानंतर पशुपालकांचे मंडळ स्थापन करुन त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली जाईल. त्याचवेळी ग्रामसभेचे आयोजन करुन त्यात वर्षभराचा लसीकरण, चारा उत्पादनाबाबतचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. पशुपालक मंडळामार्फत या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.जिल्हा पातळीवर सनियंत्रण व दत्तक गावाची निवड करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. त्यात जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सदस्य तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. कारण जनावर आजारी पडल्यास त्याचा थेट परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. परिणामी पशुपालकांचे अर्थशास्त्र कोलमडते. अशी वेळ येवू नये यासाठी जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी लसीकरण, जंतनिर्मूलन, रक्तजल व रोग नमूने तपासणी, जनवरांमधील वंध्यत्वाचे व्यवस्थापन, गोचिडांचे निर्मूलन, दुग्ध स्पर्धांचे आयोजन, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिके व सांसर्गिक रोगांची माहिती या ज्ञानाचा वापर होणे देखील आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सर्व येजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा या दृष्टीकोनातून कामधेनू दत्तक ग्राम योजनेची सुरुवात करण्यात आली असल्याचेही श्री. डवले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment