Friday, May 11, 2012

प्रक्रिया उद्योगातून वाढविली शेतीची प्रतिष्ठा

योग्य नियोजन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून देखील कधीकधी शेती उत्पादनाला बाजारपेठ व योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कमी होतो. मात्र, त्यावर तोडगा काढून उत्पादनावर प्रक्रिया केल्यास शेतीतून मोठा फायदा होऊ शकतो, हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खवणी येथील प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.

कला शाखेची पदवी घेत असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी प्रवीण यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. योग्य नियोजन करून शेती केली तर ती फायद्याची ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे नोकरी-उद्योगाच्या मागे न लागता त्यांनी वडील विलास भोसले यांच्यासमवेत शेतीत लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यांनी आंबा, आवळा, चिकू, लिंबू, डाळींब, सीताफळ अशा फळझाडांची लागवड केली. त्यानंतर जांभूळ, पेरू, मोसंबी व अंजीर या फळांचीही प्रत्येकी एक एकर याप्रमाणे लागवड केली.

आवळ्याचे उत्पादन सुरू झाले. मात्र बाजारपेठेची हमी नसल्यामुळे पुढे प्रश्न आला. तेव्हा कृषीभूषण वि.ग.राऊळ यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी आवळा लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा पावडर हे फळप्रक्रिया उद्योग सुरू केले. शिवाय सारे उत्पादन पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने करण्यावर भर दिला. २००५ मध्ये पुणे येथे भरलेल्या सेंद्रीय कृषीमाल प्रदर्शनास भेट देऊन तत्कालीन कृषीमंत्री गोविंदराव आदिक यांनी कौतुक केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे देखील भोसले यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात.

उत्पादित झालेल्या आवळ्यापैकी पाच टन आवळे बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तर पाच टन आवळ्यावर प्रक्रिया केली जाते. १५ वर्षाच्या आवळ्याच्या झाडापासून प्रत्येकी १८० ते २०० किलो, केशर आंब्यापासून ५०० ते ७५० फळे मिळतात. तर, १० वर्षाच्या लिंबूच्या झाडापासून वर्षभर प्रत्येक झाडापासून तीन क्विंटल लिंबू मिळतात. तण व कीड नियंत्रणासाठी ते एकात्मिक कीड व्यवस्थापन व नियंत्रणाचा वापर करतात. तर खते व गोमूत्र हे ठिबकद्वारे पिकांना देतात. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन करण्याचेही काम प्रवीण करतात.

एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच, प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने आपल्या कृतीतून युवकांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

No comments:

Post a Comment