Friday, May 11, 2012

कष्टाची द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत.

जिद्दीला कष्टाची जोड दिली की प्रत्येक गोष्ट साध्य होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तारामती विठ्ठल थोरात यांचही आयुष्य याच सिद्धांतावर सुरू आहे. जवळपास ५० वर्षे काळ्या आईशी ईमान राखून तिची सेवा त्या करत आहेत. त्याचं फळही त्यांना मिळत आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तिथे शेतीची काय अवस्था असेल, याची कल्पना मनाला वेदना देणारी असते. पण, याच दुष्काळी भागात तारामती यांनी पिकवलेली रसाळ आणि गोड द्राक्षे आज युरोपच्या बाजारपेठेत विराजमान झाली आहेत.

तारामती यांचा त्यांच्या बालपणीच विवाह झाला. पती विठ्ठल थोरात यांच्याकडे वडिलोपार्जित १-२ एकर शेती होती. विटा येथून काही अंतरावर असणाऱ्या भांबर्डे या खेड्यामध्ये ही शेती होती. ही शेती कसायचा निर्धार त्यांनी केला. त्यावेळी शेतात जाण्यासाठी पुरेशी साधनेही नव्हती. बऱ्याचदा खूप अंतर चालून जावे लागत असे. पण, परिस्थितीशी झुंजत तारामती यांचे हात धरणी आईची सेवा करण्यासाठी राबायला लागले. धरणीमातेनेही त्यांच्या पदरात चांगल्या पिकाचं दान दिलं. ऊस, ज्वारी, लसूण, कांदा अशी अनेक पिके त्या त्यांची मुले, सुनील आणि चंद्रसेन यांच्या साथीने घेतात. पण, त्यांना आर्थिक यशाचा मार्ग दिला द्राक्षांच्या पिकाने.

सहा वर्षांपूर्वी तारामती यांनी तासेगणेश नावाच्या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. त्याला शेणखत आणि इतर खते वेळच्या वेळी दिली. तसेच, पिकाला कीड लागू नये म्हणून वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक औषधांची फवारणीही केली. त्यांच्या या मेहनतीची कल्पना द्राक्षवेलीला लगडलेल्या टपोऱ्या द्राक्षघडांकडे पाहिल्यावर येते. म्हणूनच त्यांच्या या पिकाला युरोपच्या बाजारात चांगली मागणी आहे. गेली चार वर्षे थोरात कुटुंबिय युरोपला द्राक्षमाल निर्यात करत आहे. यावर्षी आतापर्यंत नऊ टन द्राक्ष निर्यात झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिवाय, अजूनही जवळपास पाच टन उत्पादन अपेक्षित आहे. महाग्रेप्स कंपनीचे दलाल येऊन द्राक्षांची छाटणी, पॅकिंग आणि इतर सर्व जबाबदारी घेतात.

सुरुवातीला एक-दोन एकर इतकी मर्यादित असणारी थोरात कुटुंबियाची शेती आज जवळपास ११ एकर इतकी वाढली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्राणीही थोरात कुटुंबिय पाळतात. यामध्ये म्हशी आणि कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. शेतीवर आणि या प्राणीमात्रांवर तारामती किती जीवापाड प्रेम करतात, हे त्यांच्या शेतातून फिरताना जाणवते. पती आणि मुलांच्या सहकार्यामुळेच हा पसारा वाढविणे शक्य झाल्याचे तारामती यांनी यावेळी सांगितले.

जिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तारामती थोरात यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, कडक शिस्त, स्वावलंबन, काबाडकष्टाची तयारी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता यांच्याकडे पुरेपुर आहे. पती विठ्ठल थोरात यांच्या साथीने तारामती यांनी स्वतःच्या जीवनाचा मळा फुलविला आहे. म्हणूनच त्यांच्या गोड आणि रसाळ द्राक्षांच्या रूपाने त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणू
  • No comments:

    Post a Comment