Tuesday, April 24, 2012

'अळू'ने दाखविला शेती उत्पन्नाचा मार्ग

घराबाहेर किंवा परसबागेत थोडा अळू घरगुती भाजीकरिता लावला जातो. परंतु या अळूची शेतात लागवड करुन शेती उत्पन्नाचा मार्ग शोधून, सासवडचे बाळासाहेब चौखंडे व त्यांच्या पत्नी शंकुतला यांनी यश संपादिले आहे.

शेतीमध्ये नवे नवे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी इतरांना मार्गदर्शक ठरतात. असेच पुणे जिल्ह्यातील सासवडचे शेतकरी बाळासाहेब चौखंडे हे आहेत. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठीही ते नेहमीच तयार असतात. अळूच्या शेतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

सासवड शहराच्या कऱ्हा नदीच्या काठाला असलेल्या माझ्या जमिनीत गावाच्या पाण्याचा निचरा होत असल्याने मला केवळ ११ गुंठेच शेती राहिली. या जमिनीत टप्याटप्प्याने अळूची लागवड केली. काही वर्षांपूर्वी खाण्यासाठी अळूच्या पानाची लागवड करावी या उद्देशाने ४० कोंबांची लागवड दोन वाफ्यात केली होती. घरी खाण्यासाठी राहून शिल्लक राहिलेली अळूची पाने सासवडच्या बाजारात विकत असे. पानाचा दर्जा चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकांची मागणी वाढत गेली. याचा अंदाज घेऊन हळूहळू सर्वच ११ गुंठ्यावर अळूची लागवड करण्याचा मी निर्णय घेतला. मी स्वत: अपंग आहे. त्यामुळे माझी आई दगडाबाई व पत्नी शंकुतला यांच्या मदतीने अळूची लागवड केली.

साताराहून आणलेल्या अळूची वैशिष्ट्ये अशी की ती चवदार आहे. त्याचबरोबर ती घशात खाजत नाही. अळूच्या वड्यासाठी तेल व पीठ कमी लागते. पानांचा दांडा हिरवा नव्हे तर जांभळा असून पानाचा आकार बदामी आहे. या कारणामुळे या अळूला बाजारात मागणी आहे.

अळू लावण्यापूर्वी नांगरट करुन रान तापू दिले. शेणखत, कंपोस्ट खत टाकले. बाकी औषध व फवारण्या टाळल्या कारण या अळूला रोग-कीड नाही. अकरा गुंठ्याच्या शेताचे तीन भाग केले. त्यातील एका भागातील अळूच्या पिकाची फेरपालट करतो. म्हणजे मशागत करुन रान तापू देऊन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा पीक लावले जाते. त्यामुळे ते पीक जोमदार येते.

थंडीच्या पडत्या काळात रोज दीडशे ते दोनशे गड्ड्या सापडतात. एका गड्‌ड्यात पाच पाने असतात तर पावसाळा हा सर्वात अधिक उत्पादन देणारा असतो. या काळात सातशे ते हजार गड्ड्या सापडतात. उन्हाळ्यात २५० ते ३०० गड्डी सापडते. साधारणपणे वर्षभरात ९०,००० गड्डी सापडते. अळू विक्रीतून खर्च वगळता साधारणपणे महिन्याला १० ते १२ हजारापर्यंत उत्पन्न मिळते. आता अळूची शेती हा आमचा आधार बनला आहे, बाळासाहेब अभिमानाने सांगतात.

शासनाच्या कृषी विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला आहे. शेडनेटसाठी सावसवडच्या स्टेट बँकेने १ लाख ३० हजारांचे कर्ज दिले. याचाही उपयोग शेती यशस्वी होण्यासाठी झाला आहे.

कमी पाणी, कमी शेती असली तरी कल्पकतेने शेती केल्यास यश मिळतेच. फक्त कठोर परिश्रम आणि प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment