Thursday, June 14, 2018

(भाग – ४०) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता सोडली....त्यामुळे स्वार्थ निर्माण झाला...आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वाताहतीला सुरुवात झाली.....गटच गट तयार होऊ लागले...! भगवा ध्वज विचार...तर निळां ध्वज संघर्ष...!


भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला खरा परंतु रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंत पण मजबुत संघटन फार काळ टिकले नाही. पक्षाला लाभलेले नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरां प्रमाणे निस्वार्थी, खंबीर व समाजाला योग्य दिशा दाखविणारे नव्हते. त्यांच्यात वैयक्तिक मतभेद, नेतृत्वाची लालसा व स्वार्थ या दुर्गुणांमुळे पक्षात बेशिस्त निर्माण झाली. त्यामुळे ते नेतृत्व व्यापक व राष्ट्रीय स्वरूपाचे बनू शकले नाही. सामाजिक व राजकीय उत्थानाची पूनर्बाधनी करणे त्यांना शक्य झाले नाही. सत्तेच्या लोभामुळे नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले व पक्षाचे विविध गटात विभाजन झाले.बी.सी.कांबळे यांनी  दि. १४ मे १९५९ रोजी नागपूर येथे आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे अधिवेशन स्वत:च भरविले. यावेळी त्यांनी 'रिपब्लिकन पक्ष दुरुस्त गट' तयार केला. या गटात बी. सी. कांबळे सोबत बाबू हरिदास आवळे, दादासाहेब रुपवते, ए. जी. पवार आले. त्यामुळे दुरुस्त व नादुरुस्त असे दोन गट पक्षात पडले. नादुरुस्त गटाचे नेतृत्व एन. शिवराज यांनी केले.त्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आर. डी. भंडारे यांनी सांगली मतदार संघातून निवडणूक लढविली. यावेळी रिपब्लिकन पक्ष व संयुक्त महाराष्ट्र समितीची युती होती. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार भंडारे यांचा पराभव झाला. पुढे दादासाहेब गायकवाड व भंडारे यांच्यात मतभेद झाले.भंडारेंना मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदावरून कमी करण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला.परिणामी भंडारे यांनी दि. २७ व २८ आक्टोबर १९६४ ला रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन बोलविले. व आपल्या सहका-यांसमवेत बाहेर पडून ‘भंडारे गट' स्थापन केला.१९६५ मध्ये त्यांनी आपला गट बरखास्त करून ते काँग्रेसमध्ये सामिल झाले.आता रिपब्लिकन नेत्यांना कॉंग्रेसचे दरवाजे खुले झाले होते.एक एक नेता कॉंग्रेस पक्षाशी जुडत चाललेला होता.काही कॉंग्रेस मध्ये प्रवेश करीत होते तर काही युतीच्या भानगडीत पडायला सुरुवात झाली. दादासाहेब गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्या प्रित्यर्थ काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा. सु. गवई यांना व बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. १९६८ मध्ये रा. सु. गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे रा. सु. गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली व त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७० ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला ‘गवई गट' असे म्हटले जाऊ लागले. यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वत:ला अखिल भारतीय स्तरावरील रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दलितांच्या मतांची सौदेबाजी करून जास्तीत जास्त राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात तथाकथित नेते मशगुल झाले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली.(क्रमश😊

No comments:

Post a Comment