Saturday, June 9, 2012

पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती

रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम त्यामुळे जमिनीचा कमी होणारा कस आदी बाबी लक्षात घेऊन तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व पटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील पूजा पांडुरंग सावंत यांनी सेंद्रीय व औषधी शेतीचा अभिनव प्रयोग करून आपल्या पूर्वजांचा सेंद्रीय व औषधी शेतीचा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वी जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले.

सुरुवातीला पाला पाचोळ्याचे खत, गांडूळ खत वापरायला सुरुवात केली. त्यामुळे कुंडीतील फळांचा आकार, रंग, चव व फळ पिकण्याचा कालावधी याचा चांगला अनुभव आला. इतकेच नाही तर त्यांनी कुंडीतील पेरूच्या झाडाला सेंद्रीय खत वापरल्यामुळे ७०० ग्रॅम वजनाचे पेरू मिळाले. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचेही लक्षात आले. तर कीड नियंत्रणासाठी गोमूत्र, ताक, कडुनिंब अर्काची फवारणी नियमित केली. परसबागेतील सेंद्रीय खतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांना हा प्रयोग शेतीत राबविण्याची कल्पना सुचली.

यासाठी त्यांना त्यांचे पती पांडुरंग सावंत यांची मोलाची मदत झाली. त्यांनी टाकळी सिकंदर येथील त्यांच्या शेतीमध्ये सहा एकर आंबा, दोन एकर चिकू, एक एकर आवळा, एक एकर कोकण लिंबू तर बांधावर वनझाडे आणि नारळाची लागवड केली.

एवढ्यावरच न थांबता आयुर्वेदिक औषधांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी शेतात अजरुन, नोनी, गुंज, गुडमार, रिठा, निर्गुडी, बेहडा, सर्पगंधा, अश्वगंधा, तुळशी, डिकमल, कडुनिंब, चंदनाची लागवड केली. लागवड करताना एकेरी पीक पद्धतीचा अवलंब न करता एकत्रित पिकांचा अंतर्भावही शेतात केला. एकेरी फळ पीक पद्धत अवलंबिली असता मोठ्या प्रमाणावर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकर्यांणमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजनही केले होते.

गत दोन वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेने आयोजिलेल्या स्पर्धेत त्यांनी मुक्त रचना, बोन्साय, औषधी वनस्पती, परस बागेतील शोभेची झाडे यामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. पारंपरिक शेतीमध्ये थोडा बदल करून सेंद्रीय शेतीचा अवलंब करून बहुपीक पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हे पूजाताईंनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. त्यांच्या शेतीतील कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने गौरविले आहे. केवळ 'चूल आणि मूल' या मध्ये न रमता भोवतालच्या स्त्रियांनी काळ्या मातीतही थोडे रमावे, असे सांगण्यास त्या विसरत नाहीत.

  • फारुक बागवान, माहिती सहाय्यक, उप माहिती कार्यालय, पंढरपूर
  • No comments:

    Post a Comment