Saturday, May 12, 2012

सहकारातून जलव्यवस्थापन

सांगरुळ ....कोल्हापूरच्या पश्चिमेला २० कि.मी.वरचं गाव.... संपूर्ण परिसर हिरवागार... सर्वत्र मोठ्या डोलानं डौलणारा ताड माड ऊस आणि नजरेत भरणारी ऊसाची श्रीमंती. हे सारे चित्र आजच्या काळात अनुभवायला मिळते आहे. पण या परिसरात लहानपणापासून वावरल्याने पूर्वीचा काळ आठवल्याशिवाय रहात नाही. ६० -७० वर्षांपूर्वी आज दिमाखानं मिरवणारा हा ऊसपट्टा म्हणजे केवळ ऊजाड, उघडा.... बोडका माळ होता.

नोव्हेंबर ते जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न येतोच कुठे ? ३-४ कि.मी. पर्यंत बाया-बाप्‍यांची पाण्यासाठी वणवण चालायची. गावाशेजारुनच कुंभी नदी वाहते पण तीही नोव्हेंबरनंतर रुसलेलीच. नदीपात्रात खोलवर खड्डे काढून त्यात पाझरणारे पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. एक दिवस गावातील कै. बळीराम खाडे, कै. डी. ए. सावंत, कै. डी. आर. नाळेमास्तर कै. स. ब. खाडे यांनी नदीवर बांध घालायचे ठरविले आणि श्रमदानातून साकारला देशातील सहकारी तत्वावरील पहिला बंधारा.

पावसाचे पळणारे पाणी प्रथम अडविले आणि अडविलेले पाणी मग शिवारातून खेळवले. म्हणूनच हा भाग ' शुगर बेल्ट ' अर्थात ' ऊसपट्टा ' म्हणून ओळखला जातो. सहकाराचा महामंत्र देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राने सहकारातून जल व्यवस्थापनाचा आदर्श स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ बंधाऱ्याच्या माध्यमातून द्यावा हे निश्चित आदर्श आणि भूषणावह आहे. संपूर्ण देशाला कोल्हापूर टाईप बंधारा या नावाने जलव्यवस्थापनेची देणगी देण्याऱ्या संकल्पनेचा उद्गम कोल्हापुरातील राजाराम बंधारा व सहकारी तत्वावरील सांगरुळ बंधाऱ्यांपासून झाल्याचे मानन्यात येते.

परिवर्तन हे अपघाताने किंवा योगायोगाने घडत नाही. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. समाजाने त्याला होकार भरावा लागतो आणि नियोजनपूर्वक परिश्रमांची जोड द्यावी लागते. त्यातून 'आदर्शा'ची निर्मिती होते. कुंभी नदीवर बंधारा बांधण्यासाठी हाच पुढाकार कै. बळीराम नाना खाडे यांनी त्यावेळी घेतला. त्याला कै. डी. ए. सावंत, कै. डी. आर. नाळेमास्तर, कै. स. ब. खाडे या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि गावाला साद घातली. संपूर्ण गाव त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हातात पाटी, कुदळ, फावडे घेऊन बंधारा बांधण्यासाठी सज्ज झाला. श्रमदानातून माती गोळा करणे, बैलगाडीतून ती वाहून आणणे, रेड्याच्या पाठीवरुन दगड वाहून आणणे, लाकडी फळ्या तयार करणे अशी कामे सुरु झाली. काही दिवसातच कुंभी नदीवर श्रमदानातून बंधारा घातला गेला. यामुळे नाव्हेंबर ते मे अखेरचा शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सोडविला गेला. पावसाळ्यात हा बांध वाहून जाई त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम चाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी तत्वावरील हा पहिला बंधारा ठरला आहे.

पुढे काही वर्षांनी १९५० साली कामाची देखभाल व धरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुंभी धरण या नोंदणीकृत सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. सतत वाहून जाणाऱ्या बंधाऱ्याचा त्रास कमी व्हावा यासाठी संस्थेने पक्के धरण बांधण्याचे ठरविले. सुरुवातीला १०० रु.चे शेअर्स विकून संस्थेने पैसा उभा केला. २३ मार्च १९५२ साली मुंबई राज्याचे चीफ इंजिनिअर श्री. चाफेकर यांच्या हस्ते कुंभी नदी सांगरुळ धरण सहकारी सोसायटीतर्फे बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. याचा उल्लेख पायाभरणीसाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या थापीवर आढळून येतो. ही थापी आजही संस्थेने जपून ठेवली आहे. धरणासाठी सुमारे ३ लाख ४७ हजार ३१७ रुपयांचा खर्च केला गेला. यामध्ये ५० टक्के भाग भांडवल सांगरूळ आणि उर्वरित ५० टक्के भागभांडवल शेजारील गावांचे होते. सहकारी तत्त्वावरील या पहिल्या धरणाला त्यावेळी पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील शिष्टमंडळांनी भेटी देवून पाहणी केली आहे. तत्त्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी या धरणाला भेट देवून या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत, अशी आठवण आवर्जून ग्रामस्थ देतात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे शाळेच्या बालचमूतील कृष्णात बापू मेटे (वय-७०) हेही या प्रसंगाबद्दल भरभरुन माहिती देतात.

धरणात पहिल्यांदा जेव्हा पाणीसाठा झाला ते पाणी गाडी-बैलं जूंपून वाजत-गाजत मिरवणुकीनं आणून ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालण्यात आला. पाण्यासाठी वणवण थांबली तसेच या धरणावरील रत्यामुळे कोल्हापूरच्या-दिशेने वाहतुकीची दळणवळणाची सुविधाही निर्माण झाली. ही आठवण सांगताना सुभाष ज्ञानदेव तळेकर यांच्या डोळ्यात आजही चमक दिसत होती. त्याकाळी धरणातील पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पट्टेवाला रखवालदार ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी धरणातील पाणी उपशावर बंदी होती. विचारपूर्वक व काटेकोरपणे पाणी वापरले जायचे त्यामुळे पाणी कमी लागायचे, पाणी म्हणजे जीवन या जीवनाचे मोल समजून खऱ्या अर्थाने ते जपून वापरले जायचे. आज या संस्थेचे ३००० सभासद आहेत. ४०० शेतकरी पंपधारक आहेत. ऊस, सूर्यफूल, भात, भुईमूग, सोयाबीन अशी नगदी पिके घेतली जातात. सांगरुळसह परिसरातील कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे, मरळी, सावर्डे, मल्हारपेठ या गावांना कृषीसाठी पाणीपुरवठा केला जातो. निवडणूकही सामंजस्याने होते. सध्या वसंत पांडुरंग पाटील अध्यक्ष तर सुनिल कापडे हे उपाध्यक्ष आहेत. पाणी आकारणी प्रतिअश्वशक्ती केवळ ८० रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब शेतकऱ्यालाही हा दर परवडणारा आहे. तोही या धरणाचा लाभधारक आहे.

तिसरे महायुध्द झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे भविष्यातील विदारक चित्र मांडले जात असताना सहकारातून जलव्यवस्थापन कसे केले जाते यांचा आदर्श निर्माण करण्याऱ्या ग्रामीण भागातील या सहकार पंढरीची माती कपाळी लावून येथील शिकवण प्रत्येकाने आचरणात आणल्यास सहकारातून शांततामय मार्गाने समृध्दी साधता येते हा विश्वास प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल दिलास देणारा आहे हे नक्की.

  • वसंत शिर्के, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

  • No comments:

    Post a Comment