Monday, May 14, 2012

पर्याय सौर उर्जेचा

आज सर्वत्र विदयुत भारनियमनचा त्रास जाणवत आहे. यावर उपाय म्हणजे सौर उर्जेचा वापर करणे होय. सौर उर्जेचा वापर करुन गावात पथदीप चालविले जातात. सौर उर्जेचा वापर पंप चालविणेसाठी करता येतो. परंतु ज्या गावात विदयुत पुरवठा नाही अशा गावात सौर उर्जा पंपाचा वापर करुन नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करता येते.

पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची मर्यादित साधनसंपत्ती विचारात घेता, भविष्यात पारंपारिक उर्जा स्त्रोताची क्षमता निश्चित अपुरी पडणार आहे. याचा विचार करुन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करुनच शासनाने विंधन विहिरीवर वीज उर्जेऐवजी सौर ऊर्जा संयत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

विंधन विहिरीवर आधारित पाणी पुरवठा योजना विकसित करण्यासाठी विद्युत पंप व विजेची आवश्यकता असते परंतु ज्या गावात, वाडीत वस्तीत वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकत नाही अशा ठिकाणी पाणी पुरवठयासाठी योजना कार्यान्वित करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी सौर उर्जा पंप बसविल्यास जनतेला नळ पाणी पुरवठा योजनांचा लाभ देणे शक्य होते. म्हणून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत सौर उर्जा पंपाचा वापर करुन विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना ऑगस्ट २०१० पासून राज्य शासनाने सुरु केली आहे.

या योजनेनुसार मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथील कोकणदरा या शंभर टक्के आदिवासी वस्तीत सौर ऊर्जा दुहेरी पंपावर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यान्वित केली आहे. कोकणदरा या वस्तीची लोकसंख्या १७५ आहे. जिल्हा परिषदेमार्फत मिळालेला सौर पथदीप हाच येथील लोकांचा विजेचा सहारा आहे. लोकांना पाण्यासाठी हातपंपावर अवलंबून रहावे लागते. . हातपंपावर व्दारे पाणी घेण्यासाठी महिला व मुलांना फार शारिरीक त्रास होतो. यासाठी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर मोरे यांनी सौर ऊर्जा पंपाचा वापर करुन लघु नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून दरेगाव ग्रामपंचायतीस ही योजना मंजूर करुन कार्यान्वित केली.

या योजनेसाठी ५.१० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सौर ऊर्जा पंपाच्या सहाय्याने विंधन विहिरीतील पाणी ५ हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत साठविले जाते. या टाकीत जमा झालेले पाणी येथील वस्‍तीत स्टॅन्ड पोस्टच्या सहाय्याने लोकांना वितरित केले जात आहे. सूर्यप्रकाश किंवा अन्य कारणाने सौरपंप सुरु न झाल्यास विंधन विहिरीवरच हातपंपारव्दारे पाणी मिळू शकते. म्हणून यास सौरऊर्जा दुहेरी पंप असे म्हणतात.

सौर ऊर्जा पंपाच्या सहाय्याने लघु नळ पाणी पुरवठा योजना कोकणगाव वस्तीत सुरु झाल्याने तेथील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे व शासनाचे आभार मानले. हातपंपाव्दारे पाणी घेण्याच्या त्रासापासून मुक्तता झाल्याबददल गावक-यांनी समाधान व्यक्त केले.


  • रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी, नाशिक
  • No comments:

    Post a Comment