Wednesday, May 30, 2012

पत्रावळीच्या उद्योगाद्वारे हिराजीबाबा महिला बचतगटाचे अर्थार्जन

स्थानिक स्तरावर उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. याचाच धागा पकडून जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याची दूरदृष्टी महिला बचतगटाला लागली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील (अकलापाडा) पिंपळखुटा येथील हिराजीबाबा महिला बचत गटाने हे प्रत्यक्ष कृतीने दाखविले आहे.

महिला बचतगटाच्या माध्यमातून अनोखे नियोजन आणि वाया चाललेल्या नैसर्गिक साधनांचा वापर करून येथील महिला बचतगटाने वाया जाणाऱ्या वडाच्या पानापासून पत्रावळी बनवून अर्थार्जनाचे साधन निर्माण केले आहे.

पिंपळखुटा हा आदिवासी भाग. फारशा सुविधा नाहीत. परंतु उपलब्ध सुविधांचा वापर करुन गावातील हिराजीबाबा महिला बचतगटातील सदस्यांनी एकत्र येऊन वडाच्या वाया जाणाऱ्या पानांपासून पत्रावळ्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प केला. श्रम हेच भांडवल समजून महिलांनी कामास सुरूवात केली. गट विकास अधिकारी शंकरराव वळवी, ग्रामसेवक आर.डी.पवार, सितारामभाऊ राऊत, बायफ मित्र संस्था यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. संस्थेने पत्रावळ्याची संपूर्ण माहिती संकलित करुन महिला बचतगटाच्या सर्व महिलांना याची माहिती दिली. सर्व महिला कामाला लागल्या. वडाची पाने काढून पत्रावळ्या तयार करण्यापर्यंतची कामे एकजुटीने करु लागल्या. अक्कलकुवा तालुक्यात सर्व दुकानदारांशी संपर्क साधून पत्रावळ्यांचा पुरवठा सुरू झाला.

त्यांनी ८० रुपये शेकडा प्रमाणे विक्री केली. विक्रीत हळू हळू वाढ झाली. प्रतिदिनी स्थानिक मागणी वाढत असल्याने दरही चांगला मिळू लागला. लग्न सराईत तर या महिलांनी चांगली आर्थिक प्राप्ती केली. बचतगटाच्या महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात पत्रावळ्या तयार करीत आहेत आणि त्यातून चांगली आर्थिक प्राप्त होत आहे. याच अनुभवातून अशा इतर व्यवसायांचा अभ्यासही या महिलांनी सुरू केला आहे. या महिलांनी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले आहे.

पुनीबाई टेड्या नाईक अध्यक्ष असलेल्या या गटात सौ.माकतीबाई नोबल्या राऊत या उपाध्यक्ष तर सौ.निर्मलाबाई सिताराम राऊत या सचिव म्हणून काम पाहतात. सौ.कमलाबाई राऊत, सौ.खाटकीबाई वसावे, सौ.हाअटीबाई राऊत, सौ.मिठुबाई राऊत, सौ.बोटाबाई राऊत, सौ.दोहरीबाई राऊत, सौ.शिवलीबाई राऊत, सौ.गिताबाई पाडवी, सौ.खारकीबाई राऊत, विमलाबाई सोन्या तडवी या सदस्यांची त्यांना उत्तम साथ लाभते. सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतेही भांडवल नसताना लहान व्यवसायाच्या माध्यमातून पुरेसा रोजगार निर्माण करण्याबरोबरच ग्रामीण कारागिरांच्या कला कौशल्याला वाव देण्याचे महत्वपूर्ण काम या महिलांनी केले आहे.

  • मेघश्याम महाले, माहिती सहायक, नंदुरबार
  • No comments:

    Post a Comment