Friday, May 18, 2012

माणसुकीचा 'झरा'

ढेंगणमाळ… ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक आदिवासी पाडा… नावाप्रमाणेच अगदी उजाड माळरान… निर्जन… रात्री तर अगदी भकास जाणवणारं. असं हे पाडं. मात्र या पाड्याला मंगळवारी रात्री अगदी गर्दीचं स्वरूप आलं होतं. निमित्त होतं पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पाणीटंचाईग्रस्त भागांच्या भेटीचं.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळग्रस्त स्थितीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे या भेटीचं आणि तेही चक्क रात्रीच्या भेटीच्या स्थानिक ग्रामस्थांबरोबर प्रसारमाध्यमांनाही नवल होतं. म्हणूनच दि. १५ मेच्या रात्री शहापूर तालुक्यातील ढेंगण माळ, वाशाळा, पाटोळ, सुसरवाडी या पाड्यांवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही गर्दी केली होती. निरभ्र आकाश आणि टिपूर चांदणं यांच्या साथीनं आदिवासी पाड्यांवरचा गर्द अंधारही तेजाळला होता.

मंत्री महोदय स्वतः आपल्या व्यथा ऐकायला आले आहेत म्हटल्यावर मात्र आदिवासी बांधवांचा बांध फुटला. मग काय तक्रारींचा पाढा आणि समस्या… गाऱ्हाणी… एका पाठोपाठ एक सुरू… पाटोळ, वाशाळा, सुसरवाडी आणि शेवटी ढेंगणमाळ… गाड्यांचा ताफा वेगाने जात होता. मधेच गाडी थांबत होती. गावकऱ्यांची विचारपूस होत होती. शेवटी ढेंगणमाळावर या गाड्या स्थिरावल्या आणि आदिवासी बांधवांच्या शब्दांनी वेग घेतला.

पाणी पुरवठ्यातील अनियमितता, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, टँकर फेऱ्यांची वानवा, कोरड्या पडलेल्या विहिरी… मनात साचलेल्या किती किती भावना आज ओठावर येत होत्या. पण, त्यांनी काही सांगण्या आधीच मंत्रीमहोदयांनी या आदिवासी बांधवांची मनं आणि चेहरे वाचले होते. म्हणूनच तुम्ही माझे मालक, मी तुमचा सालगडी आहे, याची जाणीव त्यांनी आदिवासी बांधवांना करून दिली. कुणी कितीही नाराजी व्यक्त केली तरी वडीलकीच्या नात्याने ती पाठीशी घालत, त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग मंत्रीमहोदयांनी अवलंबला. यावेळी ते कुठलेही मंत्री नव्हते, तर त्यांची भूमिका होती या आदिवासींच्याच एक भावाची.

आदिवासी पाड्यांवरच्या त्यांच्या अंगणात, ओसरीवर आणि प्रसंगी कुठलीही भीडभाड न ठेवता, राजकीय शिष्टाचारांचा आव न आणता चक्क रस्त्यावर बसून या प्रश्नाबाबत गंभीर आहोत, हे स्पष्ट केले. पण, या भेटीत मंत्रीमहोदयांनी आदिवासी बांधवांशी नव्यानं नातं जोडण्याचा केलेला हा प्रयत्न तितकाच महत्तवाचा वाटतो. आदिवासींच्या व्यथा त्यांनी तितक्याच आपुलकीने ऐकल्या, पाहिल्या आणि समजून घेतल्या. रात्री ८ पासून सुरू झालेला हा प्रवास मध्यरात्रीपर्यंत चालला. हे चार तास आदिवासी ताई बहिणींच्या पदरात निश्चितच समाधान टाकणारे होते. या दौऱ्यात मंत्रीमहोदयांचा आदिवासींबाबतचा प्रकर्षाने जाणवलेला लळा-जिव्हाळा परतताना आदिवासींच्या चेहऱ्यावरील समाधानातून दिसत होता. निसर्गाचा झरा आटला असला तरी माणसुकीचा झरा सतत खळखळतोय, हेच यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणु

No comments:

Post a Comment