Tuesday, May 1, 2012

हळदीने घडविली सोनेरी क्रांती



निसर्गाची नवलाई, नयनरम्य हिरवाई तसेच दाभोसा धबधब्याबरोबरच आदिवासींचा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्याची ओळख. कुपोषणाचा शाप मिळालेल्या या तालुक्याचे एक नवे बारसे होऊ घातले आहे. होय... आता हळद उत्पादक तालुका अशी या तालुक्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. आतापर्यंत पारंपरिक भातशेती पिकवणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याच्या मनात हळद लागवडीच्या माध्यमातून नव्या बदलाची नांदी सुरू झाली आहे. त्याला येथील शेतकऱ्यांनीही उत्साहाने प्रतिसाद दिलाय.

ठाण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांची कल्पना, जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधीक्षक आर.एस.नाईकवाडी यांच्या प्रयत्नांनी आणि महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील काळी आई आता हळदरूपी सोन्याने मढवणार आहे. जव्हारचे कृषी अधिकारी, कृषी सहायक अजित घोरपडे, प्रकाश विश्वासराव यांच्या प्रत्यक्ष पुढाकाराने हे स्वप्न सत्यात उतरलेय.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या मार्च महिन्यात जव्हार परिसरातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर हळदीच्या लागवडीची तयारी दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना सातारा, सांगली परिसरात हळदीच्या पिकाची माहिती घेण्यासाठी नेण्यात आले. तर जव्हारच्या कृषी सहायकांनी हळदीचे बियाणे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, महाराष्ट्रात बियाणे न मिळाल्याने त्यांनी थेट तामिळनाडूतील सेलम येथे धाव घेतली. तामिळनाडूतील सेलम परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. तेथील परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आठ दिवसांत चित्रा सेलम जातीचे ५०० किलो बियाणे जमा केले. ते तीन ट्रकमधून जव्हार येथे आणण्यात आले. या दर्जेदार बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना जमीन तयार करणे व बियाणे लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर न्याहाळे, पिंपुर्णा, सारसुन, वांगणपाडा आदी ११ गावांमधील १०२ शेतकऱ्यांनी ६० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली. जिल्हाधिकारी जऱ्हाड यांनी उत्तम पीक येण्यासाठी सेंद्रीय खतांच्या वापराचा आग्रह धरला. शेतकऱ्यांना निधीची अडचण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर प्रती हेक्टर एक लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले. तर, कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व आदिवासी उपयोजनेतून एकरी १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रकाश विश्वासराव यांनी महत्वाची भूमिका बजावली.

शेतकऱ्यांनी केलेली हळदीची लागवड यशस्वी झाली आहे. वांगणपाडा येथील शेतकरी दांपत्याला १२५ क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले आहे. सध्या हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये बॉयलरमध्ये १५ दिवस हळद वाळविली जाते. त्यानंतर पॉलिशिंग आणि या पॅकिंग या प्रक्रिया केल्या जातात. हळदीच्या लागवडीसाठी एक एकर क्षेत्रामागे सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. त्यातून ओल्या हळदीचे १०० क्विंटल उत्पादन होते. प्रक्रियेनंतर वाळलेली व पॉलिश केलेली २४ ते २५ क्विंटल हळद शेतकऱ्यांना मिळू शकते. महिनाभरातच आदिवासी नृत्य असलेल्या तारपा या ब्रँडने जव्हार तालुक्यात पिकलेली तब्बल १ लाख किलो उच्च प्रतीची हळद बाजारात विकली जाणार आहे. सध्या हळदीचा भाव नीच्चांकी आहे. तरीसुद्धा यातून मिळणारे उत्पन्न या शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा निश्चितच अधिक असणार आहे.

या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक भात व नागली पिकांऐवजी हळद पिकांची लागवड करून ही सोनेरी क्रांती घडविली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर
  • No comments:

    Post a Comment