Monday, May 14, 2012

अंगणवाडी केंद्रातील बालके झाली कुपोषण मुक्त

संपूर्ण भारतातील कुपोषणाचे प्रमाण भयावह आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एका संस्थेमार्फत देशातील कुपोषणग्रस्त बालके असलेल्या जिल्ह्यांच्या केलेल्या पाहणीमध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील स्थिती गंभीर दर्शविण्यात आली होती. यामुळे पंतप्रधानांनी चिंता व्यक्त करीत देशातील १०० जिल्ह्यांमध्ये विशेष सकस आहार योजना राबविण्याचे ठरविले. यामुळे अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना कुपोषणापासून मुक्ती मिळाली असून त्याचा बालकांमध्ये सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे.

कुपोषणाचे मुख्य कारण कुपोषित माता हे आहे. यामुळे कुपोषित माता व स्तनदा माता यांना सकस आहार पुरविण्यावर शासनाने विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी केंद्राला सकस आहारासोबत आयुर्वेदिक बिस्किटे पुरविण्यात आली. या बिस्किटांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या शेष फंडाचा वापर करण्यात आला.

यानुसार अकोला जिल्हापरिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील १३७३ अंगणवाड्यांना ही बिस्किटे पुरविली. त्यातील २०९ गावच्या ३३३ अंगणवाडी केंद्रातील बालके कुपोषण मुक्त झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यालयाने दिली आहे. यामध्ये अकोला ग्रामीण एक मधील २६ गावांतील ३८ अंगणवाडी केंद्र, अकोला ग्रामीण दोन मधील १२ गावातील ५३, बार्शीटाकळी मधील ३० गावच्या ४२, अकोट मधील ३९ गावातील ४३, तेल्हारा तालुक्यातील १४ गावातील १८, बाळापूर मधील २४ गावातील ४७, पातूर मधील १२ गावातील २८ तर, मुर्तीजापूर तालुक्यातील ५२ गावातील ६६ केंद्रातील सहा महिन्यापर्यंतची बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.

जिल्ह्यातील बालकांमधील कुपोषण पळवून लावण्यासाठी आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त गावात एकात्मिक बालविकास कार्यालयासह बालमृत्यूचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील कुपोषित माता, स्तनदा माता व ० ते ६ महिने वयोगटातील बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीने शेष फंडातून नोव्हेंबर २०११ च्या सभेत कुपोषण मुक्तीसाठी २९ लाख रुपयांचे नियोजन केले. त्यातच शासनाने गोवर्धन आयुफार्म प्रा.लि. कंपनीची आयुर्वेदिक बिस्किटे जिल्ह्यातील १३७३ अंगणवाडी केंद्रांना पुरविली. त्याचा आधार होऊन २०९ गावातील ३३३ अंगणवाडी केंद्रातील बालकांना कुपोषणापासून मुक्ती मिळाली असून हे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची आणि जिल्ह्यात बालकांमध्ये कुपोषणमुक्तीचा सकारात्मक प्रभाव दिसत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment