Monday, May 14, 2012

बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन


वाशिम जिल्ह्यातील शेजूबाजार पासून जवळच असलेल्या तपोवन गावातील शेतकरी बंडूजी किसन येवले यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पिकास मुंबई-पुण्यामध्ये बटाटा असे नाव आहे. मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हे पीक आलू याच नावाने लोकप्रिय आहे.

श्री. येवले यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे. विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा, हरभरा, लसूण आदी पिके घेतली आहेत. बटाटा पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते याविषयी त्यांनी बरेच ऐकले होते. त्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता होती. यासाठी त्यांनी बटाटा या पिकाविषयी सर्व माहिती गोळा केली. आपल्या शेतात हे पीक घेणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले.

तपोवन परिसरात बटाट्याचे पीक नवीन असल्याने हे पीक घेणे सोयीस्कर ठरणार नाही असे अनेकांनी त्यांना सांगितले. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. सुरूवातीस जमिनीचे माती परीक्षण करून शेत तयार केले. लागवडीपूर्वी जमिनीत सुपर फॉस्फेट व थिमेट पाच किलो प्रमाणे पसरवले. त्यानंतर सात क्विंटल बियाणे खरेदी करुन नोव्हेंबर २०११ च्या पहिल्या आठवड्यात त्याची लागण केली.

पिकाला स्प्रिंक्लर व सरी काढून गरजेनुसार पाणी दिले. पीक मोठे झाल्यावर मालधरणीसाठी वरदान आणि कॅल्शियम यांची प्रती एक पोते या प्रमाणात खताची मात्रा दिली. त्याचबरोबर पिकावर बुरशीनाशक औषधांचे फवारे मारले. चांगले उत्पादन व्हावे म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच त्यांना एका एकरामध्ये १३० क्विंटलचे उत्पादन झाले.

बियाणे खरेदी, लागवड खर्च, शेत तयार करण्याचा खर्च, खत, औषध फवारणी तसेच काढणीपर्यंत एकूण १२ हजार रुपये खर्च झाला. इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे पीक कमी खर्चाचे व कमी मेहनतीचे पीक असल्याचे येवले यांना प्रत्ययास आले. खर्च वजा जाता त्यांना जवळपास ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

येवले यांचा बटाटा पिकाचा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील इतर शेतकरीही आता बटाटा लागवडीकडे वळले आहेत.

No comments:

Post a Comment