Sunday, May 27, 2012

दोस्ती का सफर आगे बढे...

शासकीय बैठका.. पुरस्कार वितरण..असे अनेकविध उपक्रमांनी सह्याद्री अतिथीगृह व्यस्त असते. मात्र बुधवारच्या (दि.२३ मे २०१२) सायंकाळी या अतिथीगृहाने एक वेगळेच भारावलेले वातावरण अनुभवले.. निमित्तही तसेच होते.. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये अमन आणि भाईचारा वाढीस लागावा या उद्देशाने मुंबईच्या भेटीवर पाकिस्तानमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ आलेले आहे...या पत्रकारबांधवांसोबत चर्चा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केला होता. पाकिस्तानी शिष्टमंडळातील पत्रकारांसमवेत मुंबईतील दैनिकं व विविध वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने सह्याद्री अतिथीगृहातील कालचा हा छोटेखानी सोहळा मात्र अनेकांच्या मनात घर करून गेला..आणि सह्याद्री अतिथीगृहावरील कालची सायंकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली...

ठीक आठच्या सुमारास पाकिस्तानातील पत्रकारांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले..त्यांच्यासमवेत मुंबई प्रेस क्लबचे सदस्य देखील होते. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, मुंबई उपनगराचे पालकमंत्री नसीम खान, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले.. आणि सह्याद्रीतल्या कॅबिनेट हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरवात झाली.. मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांच्या आसनाजवळ जाऊन प्रत्येकाचे स्वागत केले..
दो मुल्क जो पडोसी होते है
उनके सभी रिश्ते
सरहदोको लिपटके खिलते है।

या काव्यपंक्तीने सुत्रसंचालनाची सुरुवात करीत संचालक श्रद्धा बेलसरे यांनी कार्यक्रमाचा `समा` बांधण्यास सुरुवात केली. शिष्टमंडळातील पत्रकारांचा परिचय श्रीमती बेलसरे यांनी करून दिल्यानंतर मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी हितगुज करायला सुरुवात केली. महाराष्ट्राची महती सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे जगातील मोठ्या राज्यांपैकी एक आहे. मुंबईसारख्या शहरामुळे महाराष्ट्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्राबरोबरच बॉलीवुडची क्रेझ यामुळे मुंबई जागतिक आर्थिक नकाशावर आहे. अशा प्रकराच्या अभ्यास दौऱ्यांमुळे दोन्ही देशातील कटुता नाहीशी होऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदतच मिळते, असे मुख्यमंत्र्यांनी आर्वजून सांगितले. यावेळी त्यांनी पाकिस्तान भेटीच्या आठवणीही सांगितल्या.

मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादामुळे सोहळ्याला औपचारीकपणाची झालर न येता स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही सुसंवादाचा पुल भक्कम होण्याचे सांगत भारत-पाकिस्तान मधील पत्रकारांच्या मैत्रीचा दुवा साधण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न झालेत याची माहिती सांगितली. मिडीयातून पाकिस्तानच्या संस्कृतिविषयी लिखाण अधिक प्रमाणावर झाले पाहिजे, असे मतही श्री. केतकर यांनी यावेळी मांडले.

पाकिस्तान पत्रकार शिष्टमंडळातील सदस्य ताहीर हसन खान म्हणाले की, दोन दिवसांपासून आम्ही मुंबईत आलो आहोत परंतू आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की आम्ही परक्या ठिकाणी आलो आहोत..अगदी घरी आल्यासारखंच वाटतयं..दोन्ही बाजुकडच्या पत्रकारांनी आधी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील दरी कमी करण्यासाठी मिडीयाने पुढाकार घेऊन `दोस्ती का सफर आगे बढता रहे` अशी भावनाही ताहीर हसन यांनी व्यक्त केली. या दोन्ही देशांत बंधुता वाढीस लागावी अशी भूमिका असल्याचे सांगून या शिष्टमंडळातील सदस्य महेशकुमार यांनी कराचीमधील आपल्या आठवणी सांगितल्या. मुंबईच्या दौऱ्यावर चालला आहात तर बॉलिवुडच्या स्टार्सच्या ऑटोग्राफ जरुर आणा अशी मागणी माझ्या मुलांनी केल्यांचे महेशकुमार यांनी सांगताच हास्याची लकेर उमटली.

शिष्टमंडळातील ज्येष्ठ सदस्य करामत अली यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंध दृढ होण्याकरीता माध्यमांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे. चीन बरोबर देखील भारताचे युद्ध होऊनही आज भारताचे चीनबरोबर मैत्रीपूर्ण आणि व्यापारी संबंध निर्माण झाले आहेत, असे सांगितले. पाकिस्तान मिडीयातील नवी पिढी अधिक समजूतदारपणे पत्रकारीता करीत आहे आणि मुख्य म्हणजे भारताकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे श्री. अली यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित संपादक व पत्रकारांनी या चर्चेत सहभाग घेत सौहार्दतेचा हा संवाद सेतू अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

पाकिस्तान पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कराची येथून आणलेले `अजरक` हे महावस्त्र पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. चर्चा रंगत गेली..विचारांचे आदानप्रदान सुरू असतानाच सुत्रसंचालक श्रीमती बेलसरे यांनी दरवाजातून भोजनाचा खंमग सुवास दरवळत आहे..आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगताच मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हसून दाद देत सर्व जण भोजन कक्षाकडे वळले..

अजय जाधव, सहायक संचालक, मुख्यालय, मुंबई

No comments:

Post a Comment