Tuesday, May 15, 2012

रोजंदार कामगार झाला नर्सरी मालक


कष्ट आणि जिद्द यातून यश मिळवता येते. पुसदजवळच्या वरुड येथील माधव पडघणे या रोजंदारी कामगाराने नर्सरीचे स्वप्न बघितले आणि प्रयत्नातून पूर्णही केले. रोजंदारी कामगार आज निसर्ग नर्सरीचा मालक झाला आहे.

माधव पडघणे पाच वर्षांपूर्वी वरुडच्या नर्सरीत रोपट्यांना पाणी देण्याचे काम करीत होते. रोपट्यांवर प्रेम करता करता आपल्या अवलोकनातून ते रोपट्यावर डोळे बांधून कलमं तयार करण्याचे तंत्र शिकले. एवढ्यावरच न थांबता नर्सरी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यादृष्टीने थोडीफार बचत करीत व मक्त्याने शेती करून त्यांनी पैसा जमविला आणि दीड एकर शेती विकत घेतली. या शेतीत फुलशेती फुलवून माधव यांनी आधी आर्थिक बाजू भक्कम केली. गुलाब, निशीगंध, ग्लॅरेडिया, वॉटर लिली, झेंडू आदी फुलांची लागवड करून ती शहरातील बाजारपेठेत पुरविली. यातून त्यांनी नर्सरीसाठी नागपूर रोडवर जागा विकत घेतली. आज याच ठिकाणी पडघणे यांची निसर्ग नर्सरी बहरली आहे.

पंतप्रधान पॅकेजमधून मदत मिळवून उभारलेल्या या नर्सरीचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांच्या उपस्थितीत झाले. नर्सरीत निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेली दुर्मिळ वनस्पतींची रोपे माधव पडघणे यांनी आवर्जून तयार केली. यात वड, पिंपळ, आवळा, सिताफळ, सिसम यांचा समावेश आहे. याशिवाय, जादा प्रमाणात ऑक्सिजन देणारी तुळशीची हजार रोपे त्यांनी निसर्गप्रेमींना अत्यल्प दरात पुरविली आहेत. दुर्मिळ वनस्पती उपलब्ध करून देण्याचा माधव पडघणे यांचा संकल्प आहे.

पडघणे यांना रोपट्यांचे डोळे बांधून कलम तयार करण्याचे कौशल्य अवगत आहेच. त्यामुळे त्यांनी लखनौ पेरूची लागवड केली असून, त्यापासून असंख्य कलमा तयार केल्या आहेत. हा पेरू अवघ्या सहा महिन्यात फळांनी लगडतो. या पेरूला बाजारात विशेष मागणी आहे. नर्सरीसोबतच फुलशेती करून माधव आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहेत. फुलांच्या विक्रीतून माधव यांना जवळपास चारशे रूपये दररोज मिळकत प्राप्त होते. नर्सरीतून गेल्या वर्षी त्यांना सुमारे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळाले.

पडघणे यांचे सर्व कुटुंब शेतीत व नर्सरीत राबत असून ही नर्सरी आदर्श बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पडघने यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या नर्सरीत येत असून, त्यांच्या श्रमाची फलनिष्पत्ती पाहून अचंबित होतात. आगामी काळात नर्सरीत विविध जातींच्या फुलांचा समावेश करण्याचा पडघणे यांचा मानस आहे.

  • अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
  • No comments:

    Post a Comment