Friday, July 6, 2012

पाणी आले दारी

उन्हाळ्यात नदी-नाले कोरडे पडल्यावर विहिरीच्या पाण्याची पातळीदेखील खालावते.अशावेळी काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याचे स्त्रोत नसल्याने नळाद्वारे पाणीपुरवठ्यालाही मर्यादा येतात. बाहेरच्या गावातून टँकरद्वारे पाणी पुरवावे लागते. रत्नागिरी जिल्ह्यातील शीर गावातील नागरिकांनी मात्र लोकसहभागातून केलेली नळयोजना यशस्वीपणे राबवून पाण्याच्या नियोजनाचे उत्तम उदाहरण प्रस्तूत केले आहे.

शीर गावातून अन्नपूर्णा नदी वाहते. ग्रामस्थांनी यापूर्वीच नदीवर वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचा उपक्रम गेली काही वर्षे राबविला आहे. त्याचा गावाला लाभ झाल्याने गावात आता सात ठिकाणी कृषी विभागाच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्याच्या बाजूला विहिर तयार करून त्याद्वारे गावातील विविध वाड्यामध्ये पाणी योजना राबविण्यात आली आहे. एकच मोठी योजना हाती घेतल्याने नियंत्रण करणे कठीण होते हा अनुभव असल्याने लहान योजना करण्यावर गावाने भर दिला. एक किंवा दोन वाड्यांचे लहान युनिट करून जवळील स्त्रोताच्या माध्यमातून योजना करण्यात येत आहे. स्त्रोताला पाणी राहण्यासाठी नदीवर बंधारे उभारण्यात आले आहेत.

गावात लोकसहभागातून नळपाणी योजना राबविण्यास १५ वर्षापूर्वी सुरूवात झाली. गावातील ठोंबरेवाडीत नळाने पाणी पुरवठा सुरू झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सहकार्यानेदेखील पाणी पुरवठा योजना करण्यात आली. मात्र शासनाकडून मिळालेल्या योजनेच्या देखभालीबाबत नागरिक तेवढे गंभीर राहत नाहीत हे लक्षात येताच ग्रामपंचातीने लोकसहभागातून योजना करण्यावर भर दिला आणि त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन सुरू केले. सरपंच शिवराम अंबेकर यांनी ग्रामसभेत नागरिकांना योजना समजावून सांगितली. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

सुरूवातील नदी किंवा विहिरीवरून पाणी आणण्यासाठी महिलांना डोंगरउतारावरून खाली जाऊन पाणी आणावे लागे. गावातील पूर्व मोरेवाडी, फटकरेवाडी, भुवडवाडी, देऊळवाडी अशा वाड्याच्या ग्रामस्थांनी एकविचाराने प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे निधी गोळा केला. विशेष म्हणजे गावातील महिलांनी यात पुढाकार घेतला. 'महिलांनाच पाणी भरण्यासाठी जावे लागत असल्याने आम्ही काही घरातील आणि काही काम करून मिळणारे पैसे गोळा केले' असे मोरेवाडीतील वनिता मोरे यांनी सांगितले. या वाडीत ज्ञानदीप महिला मंडळाने पाणी योजना उभारली आहे. गावातील महिला भातकापणीनंतर बचतगटाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन करून पैसे एकत्र करतात. उर्वरीत रक्कम प्रत्येक कुटुंबाकडून एकत्र केली जाते. वाडीतील नागरीक योजनेची अंमलबजावणी करतांना श्रमदान करीत असल्याने खर्चही कमी होत आहे.

प्रत्येक वाडीत स्त्रोतापासून पाण्याच्या टाकीपर्यंत पंपाद्वारे पाणी आणण्यात आले आहे आणि हे पाणी ग्रॅव्हीटीद्वारे नळांना पुरविण्यात आले आहे. ठराविक अंतरावर दोन नळांचे स्टँडपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पाणी सोडण्यासाठी गावातील युवकालाच महिन्याचे ५०१ रुपये पगार देऊन काम सोपविण्यात आले आहे. दुरूस्ती खर्च आणि वीजबिलासाठी दर महिन्याला प्रत्येक घरातून २० ते ५० रुपयेप्रमाणे शुल्क आकारले जात आहे. वाडीतील प्रत्येक घराला या योजनेचा फायदा असल्याने योजनेची देखभाल आणि टाक्यांची सुरक्षा याकडे संपूर्ण वाडीचे लक्ष असते. वाडीच्या अथवा ग्रामपंचायतीच्या बैठकीत या योजनांची माहिती सर्वांना दिली जात असल्याने त्यात पारदर्शकता राहते.

इतर वाड्यांमधील चांगला अनुभव लक्षात घेता उरलेल्या वाड्यांनीदेखील या कामात रस दाखविला आहे. शासनाकडून कोणत्याही योजनेची मागणी न करता लोकसहभागातून योजना हे या गावातील सूत्र झाले आहे. योजनेवर स्थानिकांचे नियंत्रण असल्याने योजना सुरळीतपणे सुरू आहेत. उन्हाळ्यातही ग्रामस्थांना काही फुट अंतराच्या पलिकडे पाण्यासाठी जावे लागत नाही. काही दिवसातच गावातील सर्व वाड्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील. 'आपले श्रम आपले पाणी' हे सूत्र संपूर्ण गावाने स्विकारले आहे. सिंमेंट बंधाऱ्यामुळे स्त्रोतांनाही चांगले पाणी राहणार आहे. त्यामुळे २१ वाड्यांच्या या गावाला भविष्यात उन्हाळ्यातही टंचाईचा सामना करावा लागणार नाही. गाव टँकरमुक्त असल्याचा गावाला असणारा अभिमानही मनात कायम राहणार आहे.

  • डॉ.किरण मोघे 
  • No comments:

    Post a Comment