Thursday, July 26, 2012

कायदयाच्या गोष्टी


शेतकरी हा शेतजमिनीला काळी आई मानतो व त्याचे या आईवर अतोनात प्रेम असते. गावठाणामध्ये शाडुची माती आणुन शेकडो वर्षापासुन घर बांधुन राहात असलेले लोकं गावठाणाला पांढरी असे संबोधत  तर प्रत्यक्ष पिके घेत असलेल्या काळया शेतजमिनीला काळीआई असे संबोधत.मी या पांढरीमध्ये जन्माला आलो आणि काळया आईमध्येच मरणार असं म्हणणा-या शेतक-यांच्या कित्येक पिढया शेतीमध्येच गेल्या आहेत.  शेतजमिन आणि शेतकरी यांच्यातील अतुट नाते लोक साहीत्य, संत साहीत्य, ग्रामीण कथा व कविता यामधुन प्रकट झालेले आहे.
 
 स्वातंत्र्यानंतर धरणे, तलाव, औद्योगिक वसाहती, नागरी वसाहती , विकास प्रकल्प, गृहनिर्माण प्रकल्प,  सेझ अशा अनेक कारणांमुळे शेतकरी विस्थापित होत आहेत. मुंबई, पुणे , नाशिक, औरंगाबाद, नागपुर, अमरावती, अशी वाढती महानगरे आणि जवळपास सर्व महानगरपालीका व नगरपालीका क्षेत्राच्या जवळ घरांच्या गरजेमुळे जमिनी बिगरशेतीकडे  व घरे बांधण्याकडे वर्ग होत आहे.  अशा जमिनीपोटी लाखो रुपये हातात येणारा शेतकरी सुध्दा थोडयाच वर्षात कफल्लक झाल्याची सुध्दा राज्यात असंख्य उदाहरणे आहेत. मोठया प्रमाणावर अचानक हाती आलेला हा पैसा मुलत: चैनीवर, मोटार गाडयांवर व अनावश्यक वस्तुंवर खर्च केल्यामुळे जमिन पण गेली व पैसा पण संपला अशी विचित्र अवस्था झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जागतिकीकरण व वाढते शहरीकरण या पार्श्वभुमीवर शेतकऱ्याला आपल्या जमीनीबद्दल व आपल्या कुटुंबाबद्दल निर्णायक भुमिका ठरवावी लागेल.
 
गेल्या ५० - ६० वर्षात जनजीवनामध्ये प्रचंड व वेगाने बदल झाला आहे. शेतीचे क्षेत्र सुध्दा त्यास अपवाद नाही. १९५०-६० च्या दशकात अपुऱ्या साधनांसह जुनाट कृषि अवजारे वापरणारा, रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करणारा, मोटेने पाणी काढणारा शेतकरी मधल्या ५० वर्षात बदलुन आता अत्याधुनिक ट्रॅक्टर वापरणारा, ड्रीप इरीगेशन करणारा, अति रासायनिक वापरामुळे पुन्हा संेद्रीय शेतीच्या वळणावर उभा असलेला , प्रचंड भांडवली गुंतवणुक करावी लागलेला शेतकरी आता अधिकच गोंधळलेला वाटतो. पिढयानपिढया शेती करणारा व शेतीतुन प्रचंड आनंद मिळविणारा शेतकरी प्रचंड भांडवली खर्चाची झालेली ही शेती टिकणे शक्य नाही अशी मनोमन खात्री पटल्यामुळे, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे संपुष्टात आल्यामुळे, नव्या पिढीची शेती सोडुन अन्य क्षेत्राकडे चालु असलेली वाटचाल स्पष्ट दिसत असल्यामुळे अधिक हळवा झाला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे इतर अनेक कारणांबरोबरच शेतकऱ्यांच्या मनातील ही घालमेल हे सुध्दा एक कारण असावे.
 
दररोजच्या वृत्तपत्रात आपण ज्या बातम्या वाचतो त्यामध्ये जमिनीवरुन झालेली भांडणे, त्यावरुन      झालेले खुन, मारामा-या इत्यादी, अशा प्रकारच्या बातम्यांचा मोठया प्रमाणावर समावेश असतो. त्याचबरोबर सर्वसामान्य माणुस “ कायदा गाढव आहे ” हे वाक्य सर्रास वापरतांना आपण पाहतो. शेतक-यांमध्ये जमिनीवरुन होणा-या भांडणाची संख्या फार मोठी आहे व गेली शेकडो वर्षे हे वाद चालु आहेत. या सर्व वादांच्या मागे मानवाच्या महत्वाकांक्षा, इर्षा, विरोध, लोभ या मुलभूत प्रवृत्ती दडलेल्या आहेत. गेल्या २० वर्षात मी उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी म्हणुन काम करीत असतांना    शेतक-यांमधील वादांच्या ३-४ हजारावर केसेसमध्ये निकाल दिलेले आहेत. लहानलहान मुद्यांवरुन सुरु होणारी ही भांडणे माणसांचे संपुर्ण आयुष्य, वेळ व पैसा खर्च करणारी तर आहेतच पण संपुर्ण जीवनच एखाद्या खटल्यामुळे वाया गेलेली सुध्दा हजारो कुटूंबे आज आपल्याला पहायला मिळतात.

संपुर्ण भारतात आज सुमारे ४ कोटी खटले वेगवेगळया न्यायालयात चालू आहेत. या प्रत्येक खटल्यामध्ये सर्वसाधारणपणे पाच ते दहा पक्षकार असतात. किमान दोन पक्षकार आहेत असे गृहीत धरले तरी या देशातील ८ कोटी पक्षकारांना व त्यांच्या कुटुंबाना खटल्याची झळ बसली आहे. प्रत्येक कुटुंबातील सरासरी ५ माणसे सदर खटल्यात गुंतलेली धरली तर सुमारे ४० कोटी माणसांचा संबंध कोणत्या ना कोणत्या तरी खटल्याशी निश्चितच येतो. याचा अर्थच असा की, भारताच्या लोकसंख्येच्या १/३ लोक हे सकाळी उठल्यापासुन वकील, कागदपत्रे, पोलिस स्टेशन, दिवाणी / फोजदारी / महसूली व इतर  न्यायालये, रेकॉर्डरुम या सगळयात गुंतलेले आहेत.
 
अशा परिस्थितीत आपल्याला प्रचंड आनंद दिलेली शेती पुढच्या पिढीकडे सुरक्षितपणे कशी सुपुर्द करता येईल व त्यासाठी त्याने कोणती कायदेशीर काळजी घेतली पाहीजे,  हे कायदयाच्या गोष्टींच्या द्वारे सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे .
 
शेखर गायकवाड

No comments:

Post a Comment