Thursday, July 5, 2012

एक मुठ लाखमोलाची...

प्रत्येकाच्या एका मुठीचा वाटा हा कुपोषणाच्या समस्येच्या तुलनेत खारीचा असतो. पण हजारो मुठी एकत्र आल्या तर त्या माध्यमातून मोठा संचय होतो. अशाच अनेक मूठी एकत्र आल्या त्या ग्रामीण भागातील हजारो कुपोषित बालकांच्या मदतीसाठी. अकोला जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी जावेद इनामदार यांनी एक मुठ लाखमोलाची हा अभिनव उपक्रम आपल्या जिल्हयात राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

प्रत्येकाने एक मूठ वळायची, ती कुपोषित बालकांना घास भरविण्यासाठी, एक मुठ लाखमोलाची 
असे आवाहन करीत त्यांनी या उपक्रमाला नोव्हेंबरपासून सुरूवात केली. प्रारंभी आठ गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली ही योजना २०९ गावांमध्ये राबविण्यात आली. आपल्या घरी जे काही धान्य पिकते त्या धान्यातील एक मूठभर धान्य दरमहा प्रत्येकाने अंगणवाडीत जमा करावे. या जमा झालेल्या धान्यापासून अंगणवाडी सेविकांनी विविध पदार्थ तयार करुन मुलांना द्यावे, अशी ही साधी एक मुठ लाखमोलाची या उपक्रमाची कल्पना होती.

आपल्या गावातील ,आपल्याच जवळील कुपोषित मुलांच्या पोषण आहाराकरिता राबविण्यात आलेला हा उपक्रम असल्याने २०९ गावांच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या पाच महिन्यात ३१५ अंगणवाडयांमध्ये ८० क्विंटल धान्य गोळा झाले. धान्याबरोबरच अंडी,मीठ, तसेच वेगवेगळया प्रकारचे साहित्यही नागरिकांनी स्वखुशीने दिले. काही ग्रामस्थांनी रोख रक्कमेच्या स्वरुपातही आपला सहभाग नोंदविला.

धान्यांसह अंगणवाडयांमध्ये एक लाख ८० हजार ४०७ रुपये गोळा झाले. अंगणवाडयांमध्ये येणारा हा मूठभर सहभाग दिवसेदिवस वाढतो आहे. जिल्हयातील कुपोषित मुलांना या मूठभर सहभागाचा लाभ मिळत आहे. मूठभर धान्य आणि अंगणवाडी कर्मचा-यांनी केलेल्या प्रयत्नातून कुपोषित बालकांच्या आकडेवारीत लक्षणीय घट झाली आहे. जिल्हयात एकूण नऊ हजार ९२७ बालके कुपोषित आहेत. यातील एक हजार ४३४ बालके गंभीररित्या कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. 

या उपक्रमामुळे जिल्हयातील २०९ गावे आता कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून आता हा उपक्रम संपूर्ण जिल्हयात राबविण्याचा जिल्हाप्रशासनाचा मानस आहे. या माध्यमातून संपुर्ण जिल्हा कुपोषणमुक्त होईल असा विश्वासही जिल्हा प्रशासनास आहे. 

No comments:

Post a Comment