Tuesday, July 24, 2012

पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाने शेतकरी झाला कोट्यधीश

शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करणे कठीण नाही. मोर्शी येथील कृषी विज्ञान शाखेचे पदवीधर गजानन बारबुद्धे यांनी शेतीमध्ये सरस उत्पादन घेऊन हे सिद्ध केले आहे. त्यांनी शेतात लावलेल्या मिरची, हळद, अद्रक, काकडी, कारली, कापूस, चवळी या पिकांचे एक कोटीपेक्षा अधिक उत्पादन घेऊन विक्रम केला आहे.

याविषयी बोलताना, पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्याने मशागतीचा वायफळ खर्च, श्रम आणि वेळ वाचल्याचे आणि त्यामुळे चांगली शेती करू शकल्याचे गजानन यांनी सांगितले. पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतात उभारणारे ते एकमेव शेतकरी ठरले आहेत. आज अनेकजण नोकरीच्या मागे लागून आणि जमीन विकून भूमिहीन झाले आहेत. आजही ८० टक्के शेतकरी आणि युवक म्हणतात, शेती परवडत नाही. त्यापेक्षा व्यवसाय करुन दुकानदारी थाटणे परवडेल. परंतु यांत्रिक पद्धतीची जोड दिली तर उत्तम शेती करता येऊ शकते, हे गजानन यांनी दाखवून दिले आहे.

गजानन यांनी सहा वर्षापूर्वी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करुन आणि त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसाय सुरू केला. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरणे गरजेचे होते. त्यांनी कपाशी, मिरची ही पिके घेण्यास सुरुवात केली. नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादन भरभराटीला गेले. शेतात मशागतीनंतर साडेतीन चार फूटावर बेड पद्धतीने पिके घेणे सुरू केले. योग्य वेळेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करुन अल्पशा पाण्यावर त्यांनी उत्तम शेती केली. यातून उत्पादनात दरवर्षी वाढ होऊन आता ३८ एकर शेतजमिनीतून एक कोटी रुपयांपर्यंत उत्पादन निघू लागले आहे.

यावर्षी त्यांनी हळद, अद्रक, कपाशी, मिरची, कारली, काकडी, गहू, एरंडी, चवळी ही पिकेसुद्धा १०० टक्के ठिबक सिंचनावर घेतली. शेतामध्ये पिकांचे नियोजन आणि मशागतीसाठी स्वयंचलित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान युनिट उभारले. तापमान नियंत्रण करण्याकरिता फॉगिंग सिस्टिम, खत आणि पाणी नियोजनाकरिता सेन्सर सिस्टिम लावण्यात आली. इलेक्ट्रीक कन्डक्टीव्हीटी आणि पाण्याची घनताही नियंत्रित केली जाते, यामुळे पिकांना योग्य वेळी प्रमाणबद्ध खत आणि पाणी मिळते.

यावर्षी ४८८४ जातीची आणि सिजेन्टा १२ या जातीच्या मिरचीची चार एकर जमिनीत पाच फूट बाय एक फूट या अंतरावर लागवड केली. मिरचीच्या झाडाची उंची आता पाच फुटांपेक्षाही अधिक असून यातून भरघोस उत्पादन निघाले आहे. मिरचीसाठी प्रती किलोमागे सहा रुपये खर्च केला असून आता १८ रुपये प्रती किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे.

ठिबक सिंचन पद्धतीतून मिरचीबरोबरच हळद, अद्रक, कापूस, गहू, कारली, काकडी आदी पिकांचे भरघोस उत्पादन निघाले आहे. शेतात नेट हाऊस उभारून ॲन्टीव्हायरल नेट लावून कोठलेही कीटकनाशक न वापरता टॉमेटोचे पीक घेण्यात आले आहे. केवळ उत्पादन घेऊन गजानन शांत बसले नाहीत तर राज्यात विविध बाजारपेठेत विविध उत्पादनांना योग्य भाव मिळतो, त्याचाही त्यांनी लाभ घेतला.

एकंदरित आधुनिक प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि मेहनत यातून भरघोस उत्पादन घेणाऱ्यांपैकी गजानन हे एक युवा शेतकरी असून स्वयंचालित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान युनिट उभारल्याने श्रम, वेळ आणि पैसा वाचल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.


  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment