Thursday, July 5, 2012

माती परिक्षणाची फिरती प्रयोगशाळा...

शेतकऱ्यांना जिल्हा पातळीवर येऊन माती परिक्षण करुन घेणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार मातीमधील नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शीयम, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म लक्षात येत नाहीत व त्यासाठी काय करावे हे ही समजत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने फिरती माती परिक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे. माती परिक्षणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या शेतावर मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत. 

शासन नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक सेवांचे विकेंद्रीकरण करीत आहे. सगळया सेवा नागरिकांना घरबसल्या देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासनाचे अनेक विभाग यात यशस्वीही झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी माती परिक्षण थेट शेतात जाऊन करण्याची सुविधा मात्र उपलब्ध नव्हती. ती सुविधा प्रथम उपलब्ध करुन देण्यात नांदेड जिल्हा यशस्वी ठरला आहे. मानव विकास मिशनअंतर्गत मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरीता राज्यातील १२ अतिमागास जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. अशा अतिमागास जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनवाढीसाठी माती परिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार फिरती माती परिक्षण प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

माती परिक्षणाची सोय जिल्हास्तरावरच आहे. या माध्यमातून आतापर्यंत २३ हजार ९७४ माती नमुने तपासण्यात आले. तसेच जवळपास १४० गावातील मातीची सुपिकता निर्देशांक तयार करुन त्या गावांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. या कृषी विभागाच्या प्रयत्नांना आता फिरत्या प्रयोगशाळेमुळे अधिक बळ मिळणार आहे. या प्रयोगशाळेचा लाभ जिल्ह्यातील ९ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. 

मोठया आधुनिक बसमध्ये साधारण ३५ लाख रुपये खर्च करून ही प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. यात सर्वप्रकारची माती व पाणी परिक्षणाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. तसेच एक संगणक व वातानुकुलित यंत्रणाही आहे. ही प्रयोगशाळा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन त्यांच्या शेतातील मातीचे व पाण्याचे परिक्षण करुन संगणकीकृत आरोग्यपत्रिका देते. त्या आरोग्यपत्रिकेच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार खताची किती मात्रा देणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये मातीची सुपिकता दर्शविणारी ही आरोग्य पत्रिका शेतक-यांसाठी अत्यंत लाभदायी ठरेल यात शंकाच नाही. 

या फिरत्या माती परिक्षण प्रयोग शाळेचे उद्घाटन पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते नांदेड येथे झाले. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आरोग्य पत्रिका दिल्यानंतर त्या शिफारशीचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याचीही माहिती कृषी विभागाने घ्यावी अशी सुचनाही पालकमंत्री सावंत यांनी यावेळी केली. 

जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पडवळ यांनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत नांदेडची ही फिरती प्रयोगशाळा राज्यात पहिलीच असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पोखर्णी येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. याशिवाय आणखी एक फिरती प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहे. तिचाही उपयोग काही भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. प्रयोगशाळा फिरती असल्याने व माती परिक्षणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या शेतावर मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

भविष्यात नक्कीच शेतकरी या संधीचे सोने करतील आणि आपल्या शेतातील उत्पन्नवाढीचा उच्चांक गाठतील हीच अपेक्षा आहे. 
  • अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 
  • No comments:

    Post a Comment